Virat Kohli : न्यूझीलंडच्या कॉमेंट्रेटरचा विराटवर गंभीर आरोप; म्हणाला, “त्याला फक्त रेकॉर्डची चिंता” | पुढारी

Virat Kohli : न्यूझीलंडच्या कॉमेंट्रेटरचा विराटवर गंभीर आरोप; म्हणाला, "त्याला फक्त रेकॉर्डची चिंता"

पुढारी ऑनलाईन डेस्क : आयपीएलच्या १५ व्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळूरला लखनौ सुपर जायंट्सविरुद्ध पराभवाचा सामना करावा लागला. आरसीबीचा तीन सामन्यांतील हा दुसरा पराभव होता. सामन्यादरम्यान कॉमेंट्री करताना न्यूझीलंडचा माजी खेळाडू आणि कॉमेंट्रेटर सायमन डूलने विराट कोहलीवर गंभीर आरोप केला. कोहलीला फक्त त्याच्या रेकॉर्डची काळजी आहे, असे सायमनने कोहलीच्या अर्धशतकाचा हवाला देत म्हटले आहे.

रॉयल चॅलेंजर्स बंगळूरला कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध पराभव पत्करावा लागला होता. तर मुंबई इंडियन्सविरुद्ध एकमेव विजय मिळाला. विराट कोहलीने लखनौविरुद्ध अर्धशतक झळकावले, पण त्याचा संघ विजय मिळवू शकला नाही. कोहलीने लखनौ विरुद्ध ३५ चेंडूंत अर्धशतक ठोकले. त्याने २५ चेंडूत ४२ धावा केल्या होत्या. यानंतर पुढच्या आठ धावांसाठी त्याने १० चेंडू घेतले. त्याने लखनौ सुपर जायंट्सविरुद्ध ४४ चेंडूंत ६१ धावा केल्या. या सामन्यादरम्यान कॉमेंट्री करताना सायमन डूलने विराटवर आरोप केला.

काय म्हणाले सायमन डूल?

सायमन डूल म्हणाला की, कोहलीची सुरुवात एखाद्या हायस्पीड ट्रेनसारखी झाली. तो वेगवान फटके मारत होता. पण नंतर ४२ वरून ५० धावसंख्येपर्यंत पोहोचण्यासाठी त्याने १० चेंडू घेतले. असे वाटत होते की त्याला त्याच्या विक्रमाची काळजी होती. पण अशा सामन्यात या गोष्टींना महत्व नसते. विकेट शिल्लक असताना वेगाने धावा करणे गरजेचे असते, असे डूल याने म्हटले आहे.

काय घडलं मॅचमध्ये?

आरसीबीने प्रथम फलंदाजी करताना २ बाद २१२ धावा केल्या. प्रत्युत्तरात लखनौने नऊ गडी गमावून २१३ धावा केल्या आणि अखेरच्या चेंडूवर सामना जिंकला. या विजयासह लखनौचे चार सामन्यांतून सहा गुण झाले असून हा संघ गुणतालिकेत अव्वल स्थानावर आला आहे. या सामन्यात आरसीबीकडून विराट कोहलीने ४४ चेंडूत ६१ धावा केल्या, ग्लेन मॅक्सवेलने २९ चेंडूत ५९ आणि कर्णधार फाफ डुप्लेसिसने ४६ चेंडूत नाबाद ७९ धावा केल्या. त्याचवेळी लखनौकडून मार्कस स्टॉइनिसने ३० चेंडूत ६५ आणि निकोलस पूरनने १९ चेंडूत ६२ धावा केल्या होत्या.

Back to top button