DC vs MI : पराभवाची हॅट्ट्रिक टाळण्याचे मुंबई इंडियन्सपुढे आव्हान | पुढारी

DC vs MI : पराभवाची हॅट्ट्रिक टाळण्याचे मुंबई इंडियन्सपुढे आव्हान

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : सलग तीन पराभवामुळे निराश झालेला दिल्ली कॅपिटल्सचा संघ आज मुंबई इंडियन्सविरुद्ध होम ग्राऊंडवर खेळण्यास उतरेल तेव्हा त्यांच्यापुढे विजयाचे खाते उघडण्याचे लक्ष्य असणार आहे. त्याचवेळी पाच चषकांचा मानकरी असलेल्या मुंबई इंडियन्सला यंदाच्या आयपीएलमध्ये पराभवाची हॅट्ट्रिक टाळण्याचे आव्हान असेल. गुणतालिकेत तळात असणार्‍या दोन्ही संघांना अजूनही आपले योग्य संघ संतुलन सापडलेले नाही. (DC vs MI)

दिल्ली कॅपिटल्सला आपला जिगरबाज कर्णधार यष्टिरक्षक ऋषभ पंत याची कमतरता स्पष्टपणे जाणवू लागली आहे. कार अपघातात जखमी झालेला पंत स्पर्धेला मुकला आहे. त्याच्या गैरहजेरीत संघाकडे वेगवान खेळ करणारा खेळाडू मिळेना झाला आहे. याशिवाय यष्टीमागेही त्यांना अडचणी येत आहेत.

संघाने मधल्या फळीत सर्फराज, मिशेल मार्श, रोव्हमॅन पॉवेल, रिली रोसो, मनीष पांडे, अमन हकीम खान, ललीत यादव यांना अजमावले आहे; परंतु यापैकी कोणीच मॅचविनिंग खेळी करू शकलेले नाही. मुंबई विरुद्ध यांच्याकडून प्रभावी कामगिरीची अपेक्षा आहे. याशिवाय गोलंदाजीतही त्यांची म्हणावी तशी धार दिसत नाही. खलील अहमद, मुकेेश कुमार, चेतन सकारिया, कुलदीप यादव आणि अक्षर पटेल यापैकी कोणालाही प्रतिस्पर्ध्याच्या उरात धडकी भरवता आलेली नाही.

दिल्लीप्रमाणेच मुंबई इंडियन्सचा संघही फलंदाजी व गोलंदाजीत अपयशी ठरला आहे. संघाकडे फलंदाजीत रोहित शर्मा, इशान किशन, सूर्यकुमार यादव, कॅमेरून ग्रीन यांसारखे दिग्गज असूनही त्यांची फलंदाजी फ्लॉफ ठरली आहे. फक्त एन. तिलक वर्मा यानेच आरसीबीविरुद्ध एकहाती 84 धावा केल्या होत्या. इतर फलंदाजांपैकी कोणी लढण्याची हिंमत दाखवताना दिसत नाही. जसप्रीत बुमराह नसल्याचा परिणाम आणखी किती दिवस संघावर दिसणार हे समजत नाही. त्याच्या जागी आलेला जोफ्रा आर्चर आरसीबीविरुद्ध अपयशी ठरला, तर चेन्नईविरुद्ध खेळलाच नाही. जेसन बेहरेडॉर्फ, अर्शद खान, पीयुष चावला यांनाही फारसे काही करता आलेले नाही.

संघ यातून निवडणार : (DC vs MI)

दिल्ली कॅपिटल्स : डेव्हिड वार्नर (कर्णधार), पृथ्वी शॉ, मिचेल मार्श, सर्फराज खान, अमन हाकिम खान, अभिषेक पोरेल, अक्षर पटेल, खलील अहमद, कुलदीप यादव, रोव्हमॅन पॉवेल, रिली रोसो, एन्रिक नोर्त्जे, मुस्तफिजूर रहमान, चेतन सकारिया, मुकेश कुमार, फिल सॉल्ट, लुंगी एन्गिडी, प्रवीण दुबे, ललित यादव, रिपल पटेल, विक्की ओस्तवाल, इशांत शर्मा, मनीष पांडे, कमलेश नागरकोटी, यश धूल.

मुंबई इंडियन्स : रोहित शर्मा (कर्णधार), सूर्यकुमार यादव, टिम डेव्हिड, डेवाल्ड ब्रेविस, तिलक वर्मा, इशान किशन, ट्रिस्टन स्टब्स, विष्णू विनोद, कॅमरून ग्रीन, अर्जुन तेंडुलकर, रमनदीप सिंह, शम्स मुलानी, रिले मेरेडिथ, नेहाल वढेरा, ऋतिक शौकीन, अर्शद खान, डुआन जेनसन, पीयूष चावला, कुमार कार्तिकेय, राघव गोयल, जोफ्रा आर्चर, जेसन बेहरेनडॉर्फ आणि आकाश मढवाल.

Back to top button