माझी छाती गर्वाने फुगली..! रिंकू सिंगने आता देशासाठी खेळावे : वडिलांची इच्छा | पुढारी

माझी छाती गर्वाने फुगली..! रिंकू सिंगने आता देशासाठी खेळावे : वडिलांची इच्छा

अहमदाबाद, वृत्तसंस्था : कोलकाता नाईट रायडर्सच्या रिंकू सिंगने शेवटच्या पाच चेंडूंवर पाच षटकार मारून गुजरात टायटन्स संघाविरुद्ध अशक्यप्राय विजय मिळवून दिला. अगदी सामान्य कुटुंबातून पुढे आलेल्या रिंकूची ही कामगिरी कोणालाही अभिमान वाटावी अशीच आहे. त्याच्या परिवारासाठी तर ही गोष्ट आभाळापेक्षा मोठी आहे. मुलाच्या कामगिरीने सुखावलेल्या त्याच्या आई-वडिलांना त्याने आता देशासाठी खेळावे, असे वाटते आहे. एलपीजी गॅस सिलिंडर वितरण कंपनीत काम करणारे त्याचे वडील खानचंद्र्र सिंग म्हणाले, त्याला 5 षटकार मारताना पाहून मला खूप आनंद झाला. माझी छाती गर्वाने फुगली. मला त्याला भारतासाठी खेळताना बघायचे आहे.

गुजरात आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात रविवारी झालेल्या आयपीएल सामन्यात रिंकू सिंगने आपल्या धडाकेबाज खेळीच्या बळावर कोलकाता नाईट रायडर्सला 3 गडी राखून विजय मिळवून दिला. छोट्या कुटुंबातून आलेल्या रिंकू सिंगची कहाणी खूप विचित्र आहे. रिंकू सिंगचे वडील खानचंद्र्र सिंग हे एलपीजी गॅस सिलिंडर वितरण कंपनीत काम करायचे. खानचंद्र्र सिंग आणि बिनादेवी यांच्या 6 मुलांमध्ये रिंकू सिंग तिसरा आहे. रिंकू सिंगला पाच भाऊ आणि एक बहीण आहे. 24 वर्षीय रिंकू सिंगने आपल्या आयुष्यात मोठा संघर्ष पाहिला आहे. त्याने वडिलांना घरोघरी सिलिंडर पोहोचवताना पाहिले आहे आणि त्याचा मोठा भाऊ ऑटो चालवतो. मैदानावर बॅट फिरवून षटक ठोकण्यापूर्वी त्याने स्वतः झाडू देखील लावला आहे.

रिंकूचे कुटुंब त्याच गॅस गोडावूनच्या एका छोट्या क्वार्टरमध्ये राहत होते. रिंकूला लहानपणापासूनच क्रिकेटची आवड होती. अलीगडमधील छोट्या मैदानात क्रिकेट खेळणारा रिंकू हळूहळू मोठ्या स्पर्धांमध्ये खेळू लागला. त्यानंतर त्याची यूपी संघात निवड झाली. गेल्या 5 वर्षांच्या आयपीएल कारकिर्दीत त्याने दुखापतीपासून ते बीसीसीआयच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी निलंबनाचा सामना करावा लागला आहे. पण, तो डगमगला नाही. रिंकूने खेळात वेळ वाया घालवू नये, असे वडिलांना वाटत होते; पण रिंकूला हे मान्य नव्हते, त्यामुळे अनेकदा त्याने वडिलांचा मारही खाल्ला, पण आता रिंकूच्या यशाने त्याचे कुटुंब खूप खूश आहे. रिंकूची आई बिनादेवी यांनी सांगितले की, त्याने रविवारी जे केले त्याने मला खूप आनंद झाला. मी कधीच विचार केला नव्हता. रविवारी जेव्हा त्याने संघाला विजय मिळवून दिला तेव्हा खूप चांगले वाटले.

रिंकूचे वडील खानचंद्र यांनी सांगितले की, तो त्यांचा तिसरा मुलगा आहे. सुरुवातीला तो क्रिकेट खेळायचा. मी त्याला मनाई करायचो की तो क्रिकेट मॅच खेळून काय करेल. काही करायचे असेल तर अभ्यास कर. शिक्षणाकडे त्याचे लक्ष नव्हते.

रिंकूचे वडील पुढे म्हणाले, ‘जेव्हा त्याने चांगल्या धावा केल्या तेव्हा सर्वांनी सांगितले की तुमचा मुलगा चांगला खेळतो. तेव्हा मी त्याला सांगितले की आता तुला काम करण्याची गरज नाही, तू क्रिकेट खेळ. मी गॅस सिलिंडर वितरणाचे काम करतो. मी कधीही असा विचार केला नव्हता की तो इतका पुढे जाईल. त्याने माझ्यासोबतही काम केले आहे. जेव्हा मला गरज पडत होती तेव्हा तो सिलिंडरचे काम करायला माझ्यासोबत यायचा.’

रिंकूचे नशीब चमकले

2017 मध्ये केकेआरने रिंकूला आयपीएलसाठी विकत घेतले, त्यानंतर रिंकू सिंगचे नशीब उजळले. शाहरूख खानच्या कोलकाता नाईट रायडर्सने त्याला 80 लाख रुपयांना 2018 मध्ये आयपीएलसाठी साईन केले. तेव्हा रिंकू सिंगला कोणीही ओळखत नव्हते. मात्र, उत्तर प्रदेशकडून देशांतर्गत क्रिकेटमध्ये त्याची कामगिरी सुधारू लागली.

रिंकूचा पगार यश दयालपेक्षा कमी

आयपीएल 2023 च्या 13 सामन्यांत कोलकाता नाईट रायडर्स संघाने गुजरात टायटन्सचा त्यांच्या घरच्या मैदानावर झालेल्या काटेरी लढतीत तीन गडी राखून पराभव केला. कोलकाताला विजय मिळवून देणारा रिंकूला आयपीएलमध्ये खूपच कमी मानधन मिळते. त्याने 5 षटकार ठोकलेल्या यश दयालला त्याच्यापेक्षा सहा पट जास्त पैसे मिळतात. रिंकू आयपीएलमध्ये ज्या प्रकारची कामगिरी करत आहे. त्यावरून त्याला चांगले पैसे मिळत असतील, असा अंदाज बांधला जात आहे. मात्र, बाकीच्या खेळाडूंच्या तुलनेत रिंकूला केकेआरकडून खूप कमी पैसे मिळतात. 2018 च्या मेगा ऑक्शनमध्ये केकेआरने रिंकूला 80 लाख रुपयांना विकत घेतले. मात्र त्याला फारशी संधी मिळाली नाही. आयपीएल 2021 च्या पहिल्या सहामाहीत दुखापत झाल्यामुळे या खेळाडूंना संपूर्ण हंगामातून बाहेर काढण्यात आले. नंतर आयपीएल 2022 च्या मेगा लिलावात केकेआरने त्याला 55 लाख रुपयांत विकत घेतले आणि 2023 च्या आयपीएलमध्ये त्याला या संघाने कायम ठेवले आहे. त्याला सध्या 55 एका सिझनचे फक्त 55 लाख रुपयेच मिळत आहेत.

महत्त्वाचे म्हणजे रिंकूने ज्याला धू-धू धुतले त्या यश दयालपेक्षा कमी पैसे मिळतात. यशला गुजरात टायटन्स 3.20 कोटी रुपये इतका पगार देते.

Back to top button