

पुढारी ऑनलाईन डेस्क : आयपीएलमध्ये आज गुजरात विरुद्धच्मा सामन्यात अखेरच्या षटकात तब्बल ५ षटकार फटकावत रिंकू सिंगने केकेआरला अविस्मरणीय विजय मिळवून दिला. अखेरच्या षटकात केकेआरला विजयासाठी २८ धावांची गरज होती. तर गुजरातला ३ विकेट्स हव्या होत्या. टी-20 क्रिकेटमध्ये होणारा चमत्कार या सामन्यात क्रिकेटप्रेमींना पाहायला मिळाला. अखेरच्या षटकात केकेआरसाठी विजय स्वप्नवत वाटत होता. मात्र रिंकू सिंगने ५ चेंडूत ५ षटकार लगावत अशक्य वाटणारा विजय शक्य केला. दरम्यान, केकेआरला शेवटच्या षटकात विजय मिळवून देणारा रिंकू सिंग कोण आहे? हे जाणून घेऊयात…(Rinku Singh)
रिंकू सिंग हा मूळचा उत्तर प्रदेशच्या अलीगढ येथील एका सर्वसामान्य कुटुंबातील. आयपीएलमध्ये खेळण्याची संधी मिळण्यापूर्वी त्याला मोठा संघर्ष करावा लागला आहे. रिंकूचे वडील घरगुती गॅस सिलिंडर पोहविण्याचे काम करत असत. तर त्याचा मोठा भाऊ रिक्षा चालवत होता. रिंकू सिंग याने शाळेत असतानाच क्रिकेटकडे पूर्णपणे लक्ष केंद्रीत केले. रिंकू हा नववीत असताना नापास झाला होता.. सुरुवातीच्या काळात रिंकू सिंग दिवसरात्र क्रिकेट खेळतो म्हणून त्याचे वडील त्याला मारत होते. मात्र, एका चषकामध्ये रिंकूने मोटारसाइकल जिंकली. त्यानंतर वडिलांचा विरोध कमी झाला.
आयपीएल २०१७ च्या लिलावात प्रथम पंजाब किंग्जने रिंकूला विकत घेतले होते. मात्र, यावर्षी तो एकही सामना खेळू शकला नव्हता. त्यावेळी रिंकूला पंजाबने १० लाखांच्या बेस प्राईसमध्ये पंजाब किंग्जने संघात घेतले होते. यानंतर २०१८ मध्ये केकेआरने रिंकूवर ८० लाख खर्च केले. २०२२ च्या मेगा ऑक्शनमध्ये केकेआरने रिंकूवर ५५ लाखांची बोली लावली होती. (Rinku Singh)
बीसीसीआयने रिंकू सिंगवर ३ महिन्यांचा बॅन लावला होता. २०१९ मध्ये त्याने बीसीसीआयची परवानगी न घेता अबुधाबीमध्ये रमजान टी २० कपमध्ये भाग घेतला होता. त्यामुळे बीसीसीआयने त्याच्यावर ३ महिन्यांची बंदी घालण्याचा निर्णय़ घेतला होता. (Rinku Singh)