RCB vs KKR : कोण होणार एलिमिनेट? | पुढारी

RCB vs KKR : कोण होणार एलिमिनेट?

शारजाह; वृत्तसंस्था : आपले पहिले जेतेपद मिळवण्याच्या इराद्याने उतरणार्‍या (RCB vs KKR) रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघासमोर इंडियन प्रीमिअर लीगच्या एलिमिनेटरमध्ये कोलकाता नाईट रायडर्स संघाचे आव्हान असणार आहे. या सामन्यातील विजेता संघ क्वालिफायर 1 मधील पराभूत संघाविरुद्ध अंतिम फेरीत जाण्यासाठी दोन हात करेल, तर हरणारा संघ आयपीएलमधून बाहेर पडेल.

विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली आरसीबी 2016 मध्ये फायनलमध्ये पोहोचली होती. यासोबत संघाने 2015 आणि 2020 मध्ये देखील ‘प्ले ऑफ’मध्ये धडक मारली होती. मात्र, त्याच्या ट्रॉफीचे कपाट रिकामेच राहिले. दुसरीकडे केकेआर संघाने गौतम गंभीरच्या नेतृत्वाखाली दोन वेळा जेतेपद मिळवले आहे; पण त्यानंतर त्यांना चांगली कामगिरी करता आली नव्हती. मॉर्गनपुढे आता संघाला गमावलेली प्रतिष्ठा मिळवून देण्याचे आव्हान असेल. (RCB vs KKR)

दोन्ही संघ मजबूत दिसत असले तरीही आकड्यांच्या बाबतीत कोलकाताचे पारडे जड दिसत आहे. दोन्ही संघांत खेळलेल्या 28 सामन्यांमध्ये 15 सामने कोलकाताने जिंकले आहेत. आरसीबीने आपल्या साखळी सामन्यांच्या अंतिम लढतीत दिल्ली कॅपिटल्स संघाविरुद्ध शेवटच्या चेंडूवर षटकार मारत विजय मिळवला होता. त्यामुळे संघाचा आत्मविश्वास दुणावला असेल.

कोलकाता नाईट रायडर्स संघाने दुसरीकडे पहिल्या सत्रातील निराशाजनक कामगिरीनंतर यूएईच्या सत्रातील सात पैकी पाच सामने जिंकले आणि 14 गुणांसह चौथे स्थान मिळवले. मॉर्गनच्या संघाने राजस्थान रॉयल्स विरुद्ध 86 धावांनी विजय मिळवत ‘प्ले ऑफ’मध्ये आपली जागा निश्चित केली आणि आपला हाच फॉर्म कायम ठेवण्याचा त्यांचा प्रयत्न असणार आहे.

आरसीबीमध्ये कोहलीशिवाय ए. बी. डिव्हिलीयर्स, ग्लेन मॅक्सवेल आणि देवदत्त पडिक्कलसारखे फलंदाज आहेत. श्रीकर भरतने चांगली कामगिरी करीत चमक दाखवली. भरतने गेल्या सामन्यात 52 चेंडूंत नाबाद 78 धावा केल्या आणि शेवटच्या चेंडूवर षटकार मारत संघाला विजय मिळवून दिला. ग्लेन मॅक्सवेलने या सत्रात 498 धावा केल्या आहेत. गोलंदाजीत आरसीबीकडून हर्षल पटेलने 14 सामन्यांत 30 विकेटस् मिळवल्या आहेत. युजवेंद्र चहलने 16 विकेटस् घेत छाप पाडली आहे.

कोलकाता नाईट रायडर्स संघाकडूनदेखील गोलंदाजांनी चमकदार कामगिरी केली आहे. लॉकी फर्ग्युसन आणि शिवम मावीसह फिरकीपटू वरुण चक्रवर्ती, सुनील नारायण आणि शाकिब-अल-हसन यांनी चमक दाखवली. फलंदाज शुभमन गिल, व्यंकटेश अय्यर, राहुल त्रिपाठी आणि नितीश राणा यांनी चांगली कामगिरी केली. मात्र, शारजाहच्या धीम्या खेळपट्टीवर पटेल आणि चहलचा ते कसा सामना करतात हे पाहणे औत्सुकतेचे असेल.

Back to top button