

पुढारी ऑनलाईन डेस्क : महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखालील चेन्नई सुपर किंग्जने शनिवारी रात्री मुंबई इंडियन्सवर 7 गडी राखून विजय नोंदवत स्पर्धेतील दुसरा सामना जिंकला. या विजयानंतर धोनीने आपल्या संघातील खेळाडूंचे जोरदार कौतुक केले. प्रथम फलंदाजी करताना मुंबईने सीएसकेसमोर विजयासाठी 158 धावांचे लक्ष्य ठेवले होते, ही धावसंख्या अजिंक्य रहाणेने आपल्या झंझावाती खेळीच्या जोरावर सोपी केली. रहाणेने 27 चेंडूंत 7 चौकार आणि 3 गगनचुंबी षटकारांच्या मदतीने 61 धावांची खेळी साकारली.
अजिंक्य रहाणेने पॉवरप्लेमध्ये धावांचा पाऊस पाडला. त्याने आपल्या वैयक्तीक 61 पैकी 53 धावा पॉवरप्लेमध्ये वसूल केल्या. मुंबई इंडियन्सविरुद्ध पॉवरप्लेमध्ये कोणत्याही फलंदाजाने केलेल्या या सर्वाधिक धावा आहेत.
सामन्यानंतर धोनीने रहाणेच्या या खेळीचे गुपीत उघड केले. 'यंदाचा आयपीएल हंगाम सुरू होण्यापूर्वी सुरुवातीला जिंक्स (रहाणे) आणि माझे बोलणे झाले होते. त्यावेळी मी त्याला त्याच्या ताकदीनुसार आणि क्षेत्ररक्षकांच्या गॅपमधून धावा करण्याच्या क्षमतेनुसार खेळ करण्याचा सल्ला दिला होता,' असे सांगितले.
धोनी पुढे म्हणाला की, 'मी रहाणेला खेळाचा आनंद घे, टेन्शन घेऊ नकोस. तुला सुरुवातीच्या सामन्यांमध्ये संधी मिळणार नाही पण जेव्हा केव्हा गरज पडेल तेव्हा आम्ही तुझे समर्थन करू,' असे सांगितले होते.