चेल्सी प्रशिक्षक ग्रॅहम पॉटर यांच्या उचलबांगडीने फुटबॉल विश्वात खळबळ | पुढारी

चेल्सी प्रशिक्षक ग्रॅहम पॉटर यांच्या उचलबांगडीने फुटबॉल विश्वात खळबळ

लंडन, वृत्तसंस्था : इंग्लिश लीगमधील प्रतिष्ठेचा संघ चेल्सीने विद्यमान प्रशिक्षक ग्रॅहम पॉटर यांची तडकाफडकी उचलबांगडी केली असून, यामुळे फुटबॉल विश्वात एकच खळबळ उडाली. आश्चर्याची बाब म्हणजे पॉटर यांची नियुक्ती अवघ्या सहा महिन्यांपूर्वीच झाली होती. रविवारी चेल्सीला अ‍ॅस्टॉन व्हिलाविरुद्ध 0-2 फरकाने पराभवाला सामोरे जावे लागले आणि त्यानंतर काही तासांतच चेल्सी व्यवस्थापनाने पॉटर यांना पदच्युत करत असल्याची घोषणा केली.

अ‍ॅस्टॉन व्हिलाविरुद्ध पराभवानंतर चेल्सीची लीगमध्ये अकराव्या स्थानी घसरण झाली. चेल्सी व्यवस्थापनाने ग्रॅहम पॉटर यांच्या योगदानाबद्दल त्यांचे आभार मानले. एक प्रशिक्षक म्हणून व एक व्यक्ती म्हणून पॉटर यांच्याबद्दल आम्हाला अतीव आदर आहे, असे ते म्हणाले.

चेल्सीची मालकी इंग्लिश समूहाकडे गेल्यानंतर त्यांनी प्रशिक्षकपदात पहिलाच बदल केला; पण तो त्यांच्यावरच उलटल्याचे आता सुस्पष्ट झाले आहे. वास्तविक पॉटर यांच्याकडे एकाही मोठ्या क्लबला प्रशिक्षणाचा अनुभव नव्हता; पण तरीही त्यांच्याकडे ही मोठी जबाबदारी सोपवण्यात आली होती.

या हंगामात चेल्सीचे आणखी 10 सामने बाकी असून, पुढील चॅम्पियन लीगसाठी पात्रता संपादन करणेही त्यांच्यासाठी आव्हानात्मक असणार आहे. आता पॉटर यांच्या गैरहजेरीत त्यांच्या पथकातील एक सदस्य बुनो सॅल्टर हे अंतरिम प्रशिक्षक म्हणून काम पाहतील, असे चेल्सी व्यवस्थापनाने जाहीर केले आहे. ज्युनियर नॅगेल्समन हे चेल्सीचे नवे प्रशिक्षक म्हणून आघाडीवर आहेत.

Back to top button