पुढारी ऑनलाईन डेस्क : महेंद्रसिंग धोनी (MS Dhoni)ने सीएसके (CSK)चे कर्णधारपद सोडण्याची धमकी देत पुन्हा एकदा आयपीएलमध्ये खळबळ उडवून दिली आहे. सोमवारी लखनऊ सुपर जायंट्स (LSG) विरुद्धचा सामना अवघ्या 12 धावांनी जिंकल्यानंतरही गोलंदाजांच्या खराब कामगिरीमुळे धोनीचा भडका उडाला. सामना संपल्यानंतर सादरीकरण समारंभात त्याने संतप्त प्रतिक्रिया देत 'मी गोलंदाजांच्या वाईड, नो बॉलला कंटाळलो आहे आणि यामुळे मी सीएसकेचे कर्णधारपद सोडू शकतो,' असे म्हटले.
धोनीची ओळख कॅप्टन कूल अशी आहे. कितीही दबाव असला तरी तो नेहमी शांत राहतो आणि थंड डोक्याने निर्णय घेऊन सामन्याला कलाटणी देतो. पण एलएसजी विरुद्धच्या सामन्यात धोनी रागावलेला दिसला. आयपीएलच्या सहाव्या सामन्यात सीएसकेने 20 षटकांत 7 गडी गमावून 217 धावा केल्या. मात्र, चेन्नईला मोठ्या फरकाने विजय मिळवता आला नाही आणि लक्ष्याचा पाठलाग करताना लखनौने 20 षटकांत सात गडी गमावून 205 धावा केल्या.
चेन्नईच्या वेगवान गोलंदाजांनी भरपूर धावा दिल्या. यात नो बॉल-वाइडचाही मोठा वाटा होता. तुषार देशपांडे, दीपक चहर पुन्हा एकदा महागडे ठरले. देशपांडे हा इम्पॅक्ट प्लेअर म्हणून मैदानात उतरला होता. त्याने तीन नो बॉल टाकले. तर इतर गोलंदाजांनी मिळून गोलंदाजांनी 13 वाईड फेकले. या अतिरिक्त धावांमुळे धोनीला संताप अनावर झाला आणि त्याने CSK चे कर्णधारपद सोडण्याचाच थेट इशारा दिला.
सामन्यानंतर धोनी म्हणाला, आम्हाला वेगवान गोलंदाजीत सुधारणा करावी लागेल. परिस्थितीनुसार मारा कसा करावा याचा अभ्यास करण्याची गरज आहे. प्रतिस्पर्धी संघाचे गोलंदाज काय करत आहेत याकडे आपण लक्ष दिलेच पाहिजे असे नाही. महत्त्वाचे म्हणजे आमच्या गोलंदाजांनी नो बॉल किंवा वाइड टाकल्यास त्यांना नव्या कर्णधाराच्या नेतृत्वाखाली खेळावे लागेल. ही माझी दुसरी चेतावणी आहे,' अशी थेट धमकी देऊन क्रिकेट वर्तुळात खळबळ उडवून दिली.
माही पुढे म्हणाला, 'हा एक उत्कृष्ट हाय-स्कोअरींग सामना झाला. खेळपट्टी कशी असेल असा प्रश्न आम्हा सगळ्यांना पडला होता. मला वाटले की खेळपट्टी खूप संथ असेल, पण तसे झाले नाही. आमच्या फलंदाजांनी चांगली सुरुवात करून चांगल्या धावा फटकावल्या. पण गोलंदाजांची कामगिरी सुमार राहिली.'
दीपक चहरने 4 षटकात एकही विकेट न घेता 55 धावा दिल्या. याशिवाय तुषार देशपांडेने 2 बळी घेतले मात्र 4 षटकात 45 धावा दिल्या. मोईन अली हा सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला ज्याने 4 षटकात 4 बळी घेतले आणि फक्त 26 धावा दिल्या. सीएसकेच्या गोलंदाजांनी सामन्यात दोन लेग बाय, 13 वाइड आणि तीन नो बॉलसह 18 अतिरिक्त धावा दिल्या. तर गुजरात टायटन्सविरुद्धच्या पहिल्या सामन्यात सीएसकेने 12 अतिरिक्त धावा दिल्या होत्या.