रोहित शर्मा फिट; अफवांना पूर्णविराम | पुढारी

रोहित शर्मा फिट; अफवांना पूर्णविराम

मुंबई : आयपीएल स्पर्धेला प्रारंभ होण्यापूर्वी मुंबई इंडियन्स संघाची चिंता वाढली होती. रोहित शर्मा हा आजारी असल्याचे गुरुवारी समोर आले होते. आजारी असल्यामुळेच रोहित शर्मा हा आयपीएलपूर्वी झालेल्या कर्णधारांच्या फोटोशूटमध्ये सहभागी होऊ शकला नव्हता. त्यामुळे रोहित शर्मा हा आयपीएलच्या पहिल्या मॅचमध्ये खेळणार की नाही, याबाबत जोरदार चर्चा झाली; पण आता मुंबई इंडियन्सच्या संघाने एक व्हिडीओ सोशल मीडियावर अपलोड केला असून त्यामध्ये त्यांनी याबाबत अपडेट दिली आहे.

मुंबई इंडियन्सच्या संघातील सूत्रांनी रोहित आजारी असल्याचे सांगितले होते. त्यामुळे रोहित जर आजारी असेल तर तो पहिल्या सामन्यातही खेळणार नाही का, हा प्रश्न चाहते विचारत होते, पण या प्रश्नाला आता मुंबई इंडियन्सने व्हिडीओ पोस्ट करत उत्तर दिले आहे.

मुंबई इंडियन्सच्या या व्हिडीओमध्ये रोहित शर्मा हा फलंदाजी करताना दिसत आहे. रोहितला यावेळी मुंबईच्या संघात नव्याने परतलेला जोफ्रा आर्चर हा गोलंदाजी करत असल्याचे पाहायला मिळत आहे. रोहितने यावेळी काही चेंडू उत्तम पद्धतीने खेळण्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे रोहित पूर्णपणे फिट दिसत असून तो पहिल्या सामन्यात खेळू शकतो, असे या व्हिडीओमधून स्पष्ट होत आहे.

जसप्रीत बुमराहच्या जागी संदीप वॉरियर

नवी दिल्ली : मुंबई इंडियन्सचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह यंदाचा हंगाम खेळणार नाही हे स्पष्ट झाले होते, पण त्यानंतर बुमराहच्या जागी संघात कोणाला संधी द्यायची, हा प्रश्न मुंबई इंडियन्स आणि चाहत्यांनाही पडलेला होता, पण आता मुंबई इंडियन्सने आपल्या चाहत्यांना एक आनंदाची बातमी दिली आहे. कारण बुमराहच्या जागी आता मुंबई इंडियन्सच्या संघात संदीप वॉरियर या गोलंदाजाला संधी देण्यात आलेली आहे. संदीपकडे चांगला अनुभव आहे. त्याने आतापर्यंत 262 विकेटस् मिळवले आहेत. संदीपने 2021 साली भारतीय संघात पदार्पण केले होते. त्यानंतर संदीपला आता ही मोठी संधी मिळाली आहे. मुंबईची पहिली लढत 2 एप्रिलला आरसीबीविरुद्ध होणार आहे.

Back to top button