ODI World Cup : श्रीलंकेने वनडे वर्ल्डकपचे तिकीट गमावले! 44 वर्षांत प्रथमच खेळवी लागणार पात्र फेरी | पुढारी

ODI World Cup : श्रीलंकेने वनडे वर्ल्डकपचे तिकीट गमावले! 44 वर्षांत प्रथमच खेळवी लागणार पात्र फेरी

पुढारी ऑनलाईन डेस्क : ODI World Cup : श्रीलंका क्रिकेट संघाला मोठा झटका बसला आहे. न्यूझीलंड विरुद्धची वनडे मालिका 2-0 ने गमावल्यानंतर श्रीलंकेने 2023 च्या वनडे वर्ल्डकपसाठी थेट पात्र होण्याची संधी गमावली आहे. आता त्यांना या प्रतिष्ठेच्या स्पर्धेत स्थान मिळवण्यासाठी पात्रता फेरी (क्वालीफायर) खेळावी लागणार आहे. त्यातील यशस्वी कामगिरीनंतरच श्रीलंकेला विश्वचषक स्पर्धेसाठी पात्र होता येणार आहे. 44 वर्षात पहिल्यांदाच श्रीलंकेचा संघ विश्वचषकात स्थान मिळवण्यासाठी क्वालिफायर खेळताना दिसणार आहे.

तिसरी वनडे 6 विकेटने गमावली

हॅमिल्टन येथे झालेल्या सामन्यात श्रीलंकेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. श्रीलंकेची सुरुवात खराब झाली आणि 20 धावांच्या आतच 3 फलंदाज पॅव्हेलियनमध्ये परतले. काही वेळातच श्रीलंकेचा निम्मा संघ अवघ्या 70 धावांवर बाद झाला. पथुम निसांकाने एक टोक सांभाळले आणि अर्धशतक पूर्ण केले. पण तो 57 धावा करून धावबाद झाला. शेवटच्या काही षटकांमध्ये दासुन शनाका (31) आणि चमिका करुणारत्ने यांनी फटकेबाजी करून संघाची धावसंख्या 41.3 षटकांत 157 पर्यंत पोहचवली. न्यूझीलंडकडून हेन्री, शिपले आणि डॅरिल मिशेल यांनी 3-3 बळी घेतले.

158 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना न्यूझीलंडची सुरुवात खराब झाली. चाड वोझ आणि टॉम ब्लंडेल यांना डावाच्या दुसऱ्याच षटकात लाहिरू कुमाराने पॅव्हेलियनमध्ये पाठवले. कसून राजिताने डॅरिल मिशेल आणि टॉम लाथनला दासून शनाकाने बाद करून श्रीलंकेचे शानदार कमबॅक करून दिले. मात्र, यानंतर विल यंगने (नाबाद 86) हेन्री निकोल्सच्या (नाबाद 44) साथीने डाव सांभाळला. या जोडीने किवी संघाला 103 चेंडू आणि 6 विकेट शिल्लक असताना 32.5 व्या षटकात विजय मिळवून दिला.

श्रीलंका टॉप-8 मधून बाहेर (ODI World Cup)

आयसीसी वनडे वर्ल्डकप सुपर लीगमध्ये श्रीलंकेला 24 पैकी फक्त 7 सामने जिंकता आले. त्यामुळे या संघाला 81 गुणांसह नवव्या स्थानावर समाधान मानावे लागले आहे. श्रीलंका संघाला आता तीन महिन्यांनंतर पात्रता फेरी खेळण्यासाठी झिम्बाब्वेला जावे लागेल. तिथे 10 पैकी 2 संघ पात्रता फेरीद्वारे वनडे वर्ल्डकप स्पर्धेत आपले स्थान निश्चित करण्याचा प्रयत्न करतील.

2023 मध्ये भारतात होणार्‍या एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत एकूण 10 संघ सहभागी होतील. वर्ल्ड कप 2023 सुपर लीग अंतर्गत, पॉइंट टेबलवरील पहिल्या 8 संघांना थेट प्रवेश मिळाला आहे. भारत या स्पर्धेचा आयोजक देश असल्याने टीम इंडिया थेट वर्ल्डकपसाठी पात्र ठरला आहे. यासह ऑस्ट्रेलिया, पाकिस्तान, न्यूझीलंड, इंग्लंड, बांगलादेश आणि अफगाणिस्तान हे संघही वर्ल्डकपसाठी पात्र ठरले आहेत. आता वेस्ट इंडिज आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात आठव्या स्थानासाठी लढत होईल.

एकेकाळचा वर्ल्डकप विजेता संघ… (ODI World Cup)

श्रीलंकेचा क्रिकेट संघ आतापर्यंत तीन वेळा वनडे वर्ल्डकपच्या अंतिम फेरीत पोहोचला आहे. 1996 मध्ये अर्जुन रणतुंगाच्या नेतृत्वाखाली लंकन संघाने प्रथमच अंतिम फेरी गाठली आणि आणि ऑस्ट्रेलियाचा पराभव करून विजेतेपद पटकावले. त्यानंतर 2003 च्या वर्ल्डकप स्पर्धेत श्रीलंकेने उपांत्य फेरी गाठली होती. तर 2007 आणि 2011 च्या वनडे वर्ल्डकपमध्ये फायनलमध्ये धडक मारली होती. मात्र, या दोन्ही वेळी त्यांना उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले होते. तर 2015 च्या स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरीत जागा मिळवण्यात त्यांना यश आले होते.

दक्षिण आफ्रिका, वेस्ट इंडीज, आयर्लंडमध्ये झुंज

सध्या सुरू असलेल्या विश्वचषक सुपर लीगमधील वेस्ट इंडिज आणि श्रीलंका यांच्यातील सर्व सामने पूर्ण झाले आहेत. श्रीलंका 81 गुणांसह 9 व्या स्थानावर आहे. तर वेस्ट इंडिज 88 गुणांसह 8 व्या स्थानावर आहे. दुसरीकडे, दक्षिण आफ्रिकेला (78 गुण) नेदरलँड्सविरुद्ध दोन सामने खेळायचे आहेत. तर आयर्लंडचा संघही या शर्यतीत आहे, ज्यांचे 68 गुण आहेत आणि त्यांना 9 ते 14 मे दरम्यान बांगलादेशविरुद्ध तीन एकदिवसीय सामने खेळायचे आहेत. आता या उरलेल्या सामन्यांनुसार समीकरण काढले तर दक्षिण आफ्रिकेला आपल्या आशा जिवंत ठेवण्यासाठी नेदरलँडविरुद्धचे दोन्ही सामने जिंकावे लागतील.

…तर आयर्लंड होईल पात्र

जर आयर्लंडच्या संघाने बांगलादेशविरुद्धचे तिन्ही सामने जिंकले तर द. आफ्रिका आणि आयरिश संघाचे 98-98 गुण होतील. दुसरीकडे, द. आफ्रिकेने एकही सामना गमावला आणि आयर्लंडने तिन्ही सामने जिंकले, तर आयर्लंड पात्र होईल. अन्यथा द. आफ्रिका आणि आयर्लंड या दोन्ही संघांच्या पराभवामुळे वेस्ट इंडिजसाठी संधी खुल्या होतील. याचाच अर्थ ही शर्यत खूपच रोमांचक झाली आहे. श्रीलंका आता बाहेर आहे आणि 18 जूनपासून सुरू होणाऱ्या पात्रता फेरीत इतर नऊ संघांचा सामना करतील. या फेरीनंतर एकूण दोन संघ मुख्य फेरीत जाणार आहेत. त्यानंतर 10 संघांमध्ये स्पर्धा सुरू होईल.

Back to top button