RCB IPL 2023 : आरसीबीच्या अडचणीत वाढ, ‘हे’ दोन दिग्गज खेळाडू पहिल्याच सामन्यातून बाहेर! | पुढारी

RCB IPL 2023 : आरसीबीच्या अडचणीत वाढ, ‘हे’ दोन दिग्गज खेळाडू पहिल्याच सामन्यातून बाहेर!

पुढारी ऑनलाईन डेस्क : RCB IPL 2023 : इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) 16व्या हंगामाला सुरुवात होण्यापूर्वी रॉयल चॅलेंजर्स बंगळूर (आरसीबी)च्या चाहत्यांसाठी एक वाईट बातमी समोर आली आहे. ग्लेन मॅक्सवेल आणि जोश हेझलवूड पूर्णपणे तंदुरुस्त नसल्याने ते सुरुवातीच्या सामन्यांना मुकणार आहेत. आरसीबीचा पहिला सामना मुंबई इंडियन्सविरुद्ध आहे.

ग्लेन मॅक्सवेल अद्याप गेल्या वर्षीच्या दुखापतीतून पूर्णपणे सावरलेला नाही. मॅक्सवेलने या महिन्यात भारताविरुद्धच्या टी-20 मालिकेत भाग घेतला होता, मात्र मालिकेतील शेवटचे दोन सामने तो खेळू शकला नाही. तर हेझलवूड हा गेल्या काही महिन्यांपासून दुखापतग्रस्त आहे. पायाच्या दुखापतीमुळे तो बॉर्डर-गावस्कर कसोटी मालिकेतून बाहेर पडला होता. त्यानंतर भारताविरुद्धच्या वनडे मालिकेदरम्यान तो एकही सामना खेळला नाही. आरसीबी संघात सामील होण्यापूर्वी हेझलवूड क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या वैद्यकीय पथकाशी सल्लामसलत करणार असल्याचे समजते आहे.

अहवालानुसार, हेजलवूड आयपीएलच्या दुस-या टप्प्यातील सामन्यांमध्ये खेळेल अशी अपेक्षा आहे. दुसरीकडे, ग्लेन मॅक्सवेल आरसीबीच्या पहिल्या सामन्यात खेळण्याची शक्यता कमी आहे. फाफ डू प्लेसिसच्या नेतृत्वाखालील बंगळूर संघ 2 एप्रिल रोजी मुंबई इंडियन्सविरुद्ध पहिला सामना खेळणार आहे. मॅक्सवेल अद्याप त्याच्या जुन्या दुखापतीतून सावरला नसल्याचे सांगण्यात येत आहे. आरसीबीसाठी स्पर्धेच्या सुरुवातीच्या सामन्यांमध्ये या दोन प्रमुख खेळाडूंचे बाहेर पडणे मोठा धक्का मानला जात आहे.

वनिंदू हसरंगा हा आरसीबीचा आणखी एक महत्त्वाचा खेळाडू देखील संघाच्या पहिल्या दोन सामन्यांसाठी उपलब्ध राहणार नाही. आंतरराष्ट्रीय सामन्यांमुळे तो 8 एप्रिलनंतरच आरसीबी संघात सामील होऊ शकेल. अशा स्थितीत संघाला पहिल्या काही सामन्यांमध्ये प्रमुख खेळाडूंशिवाय खेळावे लागणार आहे. आता कर्णधार कोणत्या खेळाडूंना प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

रॉयल चॅलेंजर्स बंगळूरने एकदाही आयपीएलचे विजेतेपद जिंकलेले नाही. हा संघ तीन वेळा अंतिम फेरीत पोहोचला असला तरी त्यांना विजेतेपदावर नाव कोरता आलेले नाही. गेल्या वेळीही आरसीबीने प्लेऑफपर्यंतचा प्रवास केला होता. पुन्हा एकदा संघाकडून खूप अपेक्षा व्यक्त केल्या जात आहेत आणि स्पर्धेदरम्यान कामगिरी कशी होते हे पाहणे मनोरंजक असेल.

आरसीबीचा संघ :

विराट कोहली, ग्लेन मॅक्सवेल, मोहम्मद सिराज, फाफ डू प्लेसिस, हर्षल पटेल, वानिंदू हसरंगा, दिनेश कार्तिक, शाहबाज अहमद, रजत पाटीदार, अनुज रावत, आकाश दीप, जोश हेझलवूड, महिपाल लोमरोर, फिन ऍलन, सुयश प्रभुदेसाई, कर्ण शर्मा, सिद्धार्थ कौल, डेव्हिड विली, रीस टोपले, हिमांशू शर्मा, मनोज भंडगे, राजन कुमार, अविनाश सिंग, सोनू यादव, मायकल ब्रेसवेल

Back to top button