१३ व्‍या वर्षी बॉक्सिंग रिंगमध्‍ये उतरली...जाणून घ्या निखतचा प्रेरणादायी प्रवास | पुढारी

१३ व्‍या वर्षी बॉक्सिंग रिंगमध्‍ये उतरली...जाणून घ्या निखतचा प्रेरणादायी प्रवास

पुढारी ऑनलाईन डेस्क : महिलांच्या जागतिक बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये सलग दुसर्‍यांदा भारताची बॉक्सिंगपटू निखत जरीन हिने सुवर्णपदक पटकावले आहे. निखत जरीनने ५० किलो गटात पदक जिंकून देशाचे नाव उंचावले. तिने आजच्या अंतिम फेरीत व्हिएतनामच्या गुयेन थी टॅमचा पराभव केला. निखतचा आजवरचा प्रवास जाणून घेवूया.

कुटुंबाचा भक्‍कम पाठिंबा

निखतने वयाच्या अवघ्या तेराव्‍या वर्षी बॉक्सिंगला सुरुवात केली; पण हे तिच्यासाठी सोपे नव्हते. तिला हिजाब घालण्याची सक्ती केली होती. तिला बॉक्सिंगसाठी लागणारे कपडे घालण्यावरही आक्षेप घेण्यात आला होता. मात्र, निखतला तिच्या कुटुंबाचा पाठिंबा होता. त्यामुळे तिने या सर्व गोष्टींचा सामना करत कठोर सराव सुरू ठेवला. निखतचे वडील जमील अहमद हे स्वतः माजी फुटबॉलपटू आणि क्रिकेटपटू आहेत. त्यामुळे त्यांनी मुलीला खेळात करिअर करण्यासाठी प्रोत्साहन दिले. निखत मुलांसोबत सराव करत होती. त्यावेळेस ती मुलांसोबत खेळत असल्याने तिच्यावर अनेक टीका देखील केल्या जात होत्या पण ती या सर्व गोष्टींकडे दुर्लक्ष करत राहिली.;

निखतने आपले सुरुवातीचे शिक्षण निजामाबाद येथील निर्मला हृदय गर्ल्स हायस्कूलमधून पूर्ण केले. नंतर तिने हैदराबादच्या एव्ही कॉलेजमधून पदवी शिक्षण पूर्ण केले. दरम्यानच्या काळात निखतने बॉक्सिंग शिकणे सुरु ठेवले. निखतचे काका शमशामुद्दीन हे बॉक्सिंग प्रशिक्षक आहेत. त्यांचा मुलगाही बॉक्सर आहे. त्यामुळे निखतला  प्रशिक्षण मिळणे बॉक्सिंग शिकण्यास सुरुवात केली.

कॉलेजमध्येच बॉक्सिंग करिअरला सुरुवात झाली

 एव्ही कॉलेजमधूनच निकतने बॉक्सिंग करिअरला सुरुवात केली. त्याला पहिले यश 2010 मध्ये मिळाले. 15 वर्षीय निखतने राष्ट्रीय सब ज्युनियर मीटमध्ये चमकदार कामगिरी केली. त्यानंतर, 2011 मध्ये, तिने तुर्की येथे झालेल्या महिला ज्युनियर युवा जागतिक बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये फ्लाय वेटमध्ये सुवर्णपदक जिंकले. त्या वर्षी, निखतने आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग फेडरेशन महिला युवा आणि ज्युनियर वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक जिंकून बॉक्सिंगमध्ये तिचे स्थान मजबूत केले. बँकॉक येथे झालेल्या खुल्या आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धेत निखतने रौप्य पदक जिंकले. 2014 मध्ये राष्ट्रीय चषक आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले.

आईच्‍या उपस्‍थितीत ऐतिहासिक सुवर्णपदकावर मोहर

महिलांच्या जागतिक बॉक्सिंग चॅम्पियनशिप स्‍पर्धेतील आज झालेल्‍य अंतिम सामना पाहण्‍यासाठी निखतची आई नवी दिल्‍ली येथील स्‍टेडियमवर उपस्‍थित होती. “पूर्वी माझी आई मी बॉक्सिंग रिंगमध्ये उतरणार या विचारानेच अस्वस्थ होत असे; पण गेल्या वर्ल्ड चॅम्पियनशिपमधील सुवर्णपदकानंतर तिचा आत्‍मविश्‍वास वाढला आहे.” असे तिने सामन्‍यापूर्वीच स्‍पष्‍ट केले होते. निखतला आजच्‍या सामन्‍यात सुवर्णपदक जिंकण्याची खूप इच्छा होती. कारण जिंकलेले सुवर्णपदक आईच्या गळ्यात घालून आणि आपलं स्वप्न पूर्ण करायचे होते. आज खर्‍या अर्थाने तिचे स्वप्न पूर्ण झाले आहे.

निखत जरीनची आतापर्यंतची कामगिरी

2011 : महिला ज्युनियर युथ वर्ल्ड बॉक्सिंग चॅम्पियनशिप विजेती
2014 : युथ वर्ल्ड बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये रौप्य पदक
2014 : नेशन्स कप आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धा विजेती
2015 : वरिष्ठ महिला बॉक्सिंग चॅम्पियनशिप जिंकली
2019 : थायलंड ओपनमध्ये रौप्य आणि स्ट्रान्झा बॉक्सिंग स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले
2022 : स्ट्रेंझा बॉक्सिंग स्पर्धा आणि महिला जागतिक बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक
2022 :  राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदकावर मोहर
2023 : महिला जागतिक बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक जिंकले

हेही वाचा

Back to top button