

मुंबई, वृत्तसंस्था : महिला प्रीमियर क्रिकेट लीग 2023 च्या अंतिम सामन्यात दिल्ली कॅपिटल्सचे (MI vs DC) आव्हान मोडून काढत मुंबई इंडियन्स संघाने डब्ल्यूपीएलचे पहिले विजेतेपद पटकावले. मुंबईत झालेल्या रोमहर्षक सामन्यात दिल्ली कॅपिटल्सला प्रथम 9 बाद 131 धावांत रोखले. त्यानंतर मुंबईने हे आव्हान 19.3 षटकांत 7 विकेटस् राखून पूर्ण केले. नॅट सिव्हर-ब्रंट हिने नाबाद 60 धावांची खेळी करून मुंबईच्या डोक्यावर विजयाचा मुकुट चढवला.
सलग तीन आठवड्यांपासून सुरू असणारी महिला प्रीमियर लीगचे आज समारोप झाला असून मुंबई इंडियन्सने आम्हीच खरे विजयाचे दावेदार होतो हे सिद्ध केले. दिल्लीवर सात गडी राखून चषकावर नाव कोरले. दिल्लीने ठेवलेल्या 132 धावांचा पाठलाग मुंबईने यशस्वीरीत्या करत मैलाचा दगड पार केला.
दिल्ली कॅपिटल्सने ठेवलेल्या तुटपुंज्या 132 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना मुंबई इंडियन्सची सुरुवात खराब झाली. सलामीवीर हेली मॅथ्यूज आणि यास्तिका भाटिया (यष्टिरक्षक) अवघ्या 23 धावांत बाद झाल्या. मात्र, त्यानंतर आलेल्या नॅट सिव्हर-ब्रंट आणि कर्णधार हरमनप्रीत कौर यांच्यात झालेल्या अर्धशतकी भागीदारीने मुंबईचा डाव सावरला. हरमनप्रीत कौर 39 चेंडूंत 37 धावा करून बाद झाली. मात्र सिव्हर-ब्रंटने एक बाजू लावून शानदार अर्धशतक झळकावले. त्यामुळे मुंबईचा विजय सुकर झाला. ती 60 धावांवर नाबाद राहिली.
तत्पूवी, महिला प्रीमियर क्रिकेट लीग 2023 च्या अंतिम सामन्यात दिल्ली कॅपिटल्सचे जवळपास सर्वच खेळाडू अपयशी ठरले असताना राधा यादव आणि शिखा पांडे यांनी शेवटच्या विकेटसाठी केलेल्या 52 धावांच्या ऐतिहासिक अर्धशतकी भागीदारीमुळे दिल्ली कॅपिटल्सने मुंबई इंडियन्सपुढे 132 धावांचे लक्ष्य ठेवले. दिल्लीकडून कर्णधार मेग लॅनिंगने सर्वाधिक 35 धावा केल्या. (MI vs DC)
मुंबईच्या ब्रेबॉर्न स्टेडियमवर नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना दिल्लीने 20 षटकांत 9 गडी गमावून 131 धावा केल्या. या सामन्यात दिल्लीच्या फलंदाजांनी निराशा केली. कर्णधार मेग लॅनिंग वगळता कोणीही जास्त वेळ क्रीजवर टिकू शकले नाही. लॅनिंगने 29 चेंडूंत 35 धावा केल्या. ती दुर्दैवाने धावबाद झाली. मारिजन कॅपने 18 आणि शेफाली वर्माने 11 धावांचे योगदान दिले. 79 धावांत नऊ गडी गमावल्यानंतर शिखा पांडे आणि राधा यादव यांनी अखेरच्या विकेटसाठी 24 चेंडूंत नाबाद 52 धावांची भागीदारी केली. एकवेळेस असे वाटत होते की, दिल्लीचा संघ 100 धावांचा आकडा पार करू शकणार नाही, पण शिखा पांडे आणि राधा यादवने तुफान अर्धशतकी भागीदारी करत मुंबईला चांगलेच झुंजवले. या भागीदारीने इतिहास रचत आपल्या संघाला सावरण्याचा प्रयत्न केला. महिला टी-20 क्रिकेटमध्ये आतापर्यंत 10 व्या विकेटसाठी इतक्या धावांची भागीदारी कधीही झालेली नाही.
राधाने 12 चेंडूंत नाबाद 27 तर शिखाने 17 चेंडूंत नाबाद 27 धावा केल्या. राधाने आपल्या खेळीत दोन चौकार आणि दोन षटकार मारले. त्याचवेळी शिखाच्या बॅटमधून तीन चौकार बाहेर पडले. तिने एक षटकारही मारला. मुंबईकडून इस्सी वँग आणि हिली मॅथ्यूजने प्रत्येकी तीन बळी घेतले. अमेलिया केरला दोन बळी मिळाले.