IPL 2023 : आयपीएलमध्ये 2017 नंतर पहिल्यांदाच दिसणार 3 विदेशी कर्णधार! | पुढारी

IPL 2023 : आयपीएलमध्ये 2017 नंतर पहिल्यांदाच दिसणार 3 विदेशी कर्णधार!

पुढारी ऑनलाईन डेस्क : क्रिकेटमधील सर्वात मोठी लीग इंडियन प्रीमियर लीग (IPL 2023) 31 मार्चपासून सुरू होत आहे. पहिला सामना चेन्नई सुपर किंग्ज (CSK) आणि गुजरात टायटन्स (GT) यांच्यात होणार आहे. 2017 नंतर पहिल्यांदाच 3 विदेशी कर्णधार आयपीएलमध्ये दिसणार आहेत. यापूर्वी 2017 मध्ये ग्लेन मॅक्सवेलने पंजाबचे, स्टीव्ह स्मिथने राजस्थानचे आणि डेव्हिड वॉर्नरने हैदराबादचे नेतृत्व केले होते.

विदेशी कर्णधारांची कामगिरी… (IPL 2023 foreign captains stats)

 

डू प्लेसिस आरसीबीला मिळवून देणार पहिले विजेतेपद?

फाफ डू प्लेसिस रॉयल चॅलेंजर्स बंगळूरचा (RCB) कर्णधार असेल. विराट कोहलीने कॅप्टनसी सोडल्यानंतर आरसीबीने फाफ डू प्लेसिसला आपला कर्णधार बनवले. गेल्या मोसमात त्याने संघाला प्ले-ऑफमध्ये पोहचवले होते. त्याच्या नेतृत्वाखाली संघाने 16 सामने खेळले आणि आरसीबीने 9 सामने जिंकले. संघाला 7 सामन्यात पराभवाला सामोरे जावे लागले. फाफने आयपीएलमध्ये 116 सामने खेळले असून 34.37 च्या सरासरीने 3,403 धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याने 25 अर्धशतके झळकावली आहेत.

एसए 20 गाजवणा-या मार्करामकडे हैदराबादचे नेतृत्व (IPL 2023 foreign captains stats)

दक्षिण आफ्रिकेचा फलंदाज एडन मार्करामची सनरायझर्स हैदराबादने (SRH) कर्णधारपदी निवड केली आहे. त्याने अलीकडेच त्याच्या नेतृत्वाखाली सनरायझर्स इस्टर्न केप संघाला पहिल्या-वहिल्या एसए 20 लीगच्या अंतिम फेरीत विजय मिळवून दिला होता.
आयपीएल 2022 मध्ये हैदराबादची कामगिरी काही खास नव्हती. केन विल्यमसन हा संघाचा कर्णधार होता आणि त्याने 14 पैकी 8 सामने गमावले. आयपीएलमध्ये मार्करामने 20 सामने खेळले असून 40.54 च्या सरासरीने 527 धावा केल्या आहेत.

पंतच्या अनुपस्थितीत वॉर्नर बनला दिल्लीचा कर्णधार

ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर डेव्हिड वॉर्नरला आयपीएलच्या 16 व्या हंगामासाठी कर्णधार असेल. नियमित कर्णधार ऋषभ पंत अपघातात जखमी झाल्याने दिल्ली कॅपिटल्स (DC) फ्रँचायझीने त्याच्याकडे नेतृत्वाची जबाबदारी सोपवली आहे. 2015 मध्ये, वॉर्नर हैदराबाद संघाचा कर्णधार बनला आणि 2016 मध्ये त्याने त्याच्या नेतृत्वाखाली हैदराबादला विजेतेपद मिळवून देण्यात मोठी भूमिका बजावली. वॉर्नरने आयपीएलमध्ये 162 सामने खेळले असून 42.00 च्या सरासरीने आणि 140.69 च्या स्ट्राइक रेटने 5,881 धावा फटकावल्या आहेत.

‘या’ विदेशी कर्णधारांनी जिंकली आयपीएल ट्रॉफी

आयपीएलचा पहिला हंगाम 2008 मध्ये खेळला गेला होता. शेन वॉर्नच्या नेतृत्वाखाली राजस्थानने पहिला हंगाम जिंकला होता. 2009 चा मोसमही परदेशी कर्णधाराने जिंकला होता. अॅडम गिलख्रिस्टच्या नेतृत्वाखाली डेक्कन चार्जर्सने विजेतेपद पटकावले होते. यानंतर 2016 मध्ये वॉर्नरने हैदराबादला विजय मिळवून दिला. याशिवाय भारतीय कर्णधारांनी 12 आयपीएल हंगाम जिंकले आहेत. रोहित शर्माने सर्वाधिक 5 वेळा आणि महेंद्रसिंग धोनीने 4 वेळा आयपीएल ट्रॉफीवर नाव कोरले आहे.

Back to top button