हर्षल पटेल बुमराहला मागे टाकत बनला हंगामात सर्वाधिक विकेट घेणारा भारतीय | पुढारी

हर्षल पटेल बुमराहला मागे टाकत बनला हंगामात सर्वाधिक विकेट घेणारा भारतीय

अबु धाबी : पुढारी ऑनलाईन

आयपीएल २०२१ मध्ये आरसीबीचा हर्षल पटेल धुमाकूळ घालत आहे. आपल्या वेगवान गोलंदाजीने हर्षल पटेलने भल्या भल्या संघांना पाणी पाजले आहे. आज ( दि. ६ ) हैदराबादविरुद्धच्या सामन्यात हर्षल पटेलने ३३ धावात ३ विकेट घेतल्या. याचबरोबर त्याने यंदाच्या आयपीएल २०२१ हंगामात २९ विकेट घेत विक्रम रचला.

हर्षल पटेल आता आयपीएलमध्ये एका हंगामात सर्वाधिक विकेट घेणारा भारतीय गोलंदाज ठरला आहे. त्याने मुंबई इंडियन्सच्या जसप्रीत बुमराहचे एका हंगामात २७ विकेट घेण्याचा विक्रम मागे टाकला. बुमराहने २०२० च्या हंगामात २७ विकेट घेतल्या होत्या.

हेही वाचा : भारतातील टी -२० वर्ल्डकप युएईला गेल्याने त्यांचा खिसा किती गरम होणार?

त्यापूर्वी भुवनेश्वर कुमारने २०१७ च्या हंगामात २६ विकेट घेतल्या होत्या. तर २०१२ मध्ये हरभजन सिंगने हंगामात २४ विकेट घेतल्या होत्या. तसं बघायला गेलं तर आयपीएलच्या इतिहासात एका हंगामात सर्वाधिक विकेट घेण्याचा विक्रम ड्वेन ब्रोव्होच्या नावावर आहे. त्याने २०१३ च्या हंगामात तब्बल ३२ विकेट्स घेतल्या. त्यानंतर २०२० मध्ये कसिगो रबाडाने ३० विकेट घेतल्या होत्या. त्याच्या खालोखाल मलिंगाने २०११ च्या हंगामात २८ विकेट काढल्या होत्या. आता हर्षल पटेल मलिंगाचेही रेकॉर्ड तोडून पुढे गेला आहे.

हर्षल पटेलने आयपीएल २०२१ मध्ये हॅट्ट्रीक घेतली होती. हर्षलच्या या फॉर्ममुळे आरसीबीला चांगला फायदा झाला. आरसीबीने १६ गुण मिळवत प्ले ऑफचे तिकीट बुक केले. त्यामुळे आरसीबी अजून काही सामने खेळणार आहे. जर हर्षल पटेल असाच गोलंदाजी करत राहिला तर तो नक्कीच ब्रोव्होलाही मागे टाकू शकेल.

Back to top button