IND vs AUS : मालिका विजयासाठी भारत सज्ज | पुढारी

IND vs AUS : मालिका विजयासाठी भारत सज्ज

विशाखापट्टणम, वृत्तसंस्था : भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यातील दुसरा वन-डे सामना आज विशाखापट्टणम येथे खेळला जाणार आहे. पहिल्या एकदिवसीय सामन्यात टीम इंडियाने ऑस्ट्रेलियावर पाच गडी राखून शानदार विजय मिळविला होता. दुसर्‍या एकदिवसीय सामन्यात सर्वांच्या नजरा टीम इंडियाच्या प्लेईंग-11 वर असणार आहे. कर्णधार रोहित शर्मा दुसर्‍या वन-डेसाठी संघात सामील होणार असल्याने भारतीय संघात बदल होणे निश्चित आहे.

रोहित पहिल्या सामन्यात कौटुंबिक कारणांमुळे खेळू शकला नाही, त्याच्या अनुपस्थितीत हार्दिक पंड्याने संघाची धुरा सांभाळली होती. रोहितच्या पुनरागमनामुळे प्लेईंग-11 मधून कोणता खेळाडू बाहेर पडणार हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

सूर्यकुमार यादव किंवा इशान किशन या दोघांना दुसर्‍या वन-डेसाठी प्लेईंग-11 मधून बाहेर बसावे लागेल असे दिसते. सूर्या बाहेर बसण्याची अधिक शक्यता आहे. कारण तो एकदिवसीय क्रिकेटमध्ये सतत फ्लॉप राहिला आहे. असे असले तरी इशान किशन मधल्या फळीतही फलंदाजीत माहीर आहे आणि त्याने काही महिन्यांपूर्वी एकदिवसीय क्रिकेटमध्ये द्विशतकही झळकावले होते. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात सूर्यकुमार यादवला खातेही उघडता आले नाही. तो पहिल्याच चेंडूवर मिचेल स्टार्कच्या हातून पायचित झाला. तसे सलामीवीर इशान किशनची कामगिरीही निराशाजनक होती. तीन धावांच्या वैयक्तिक स्कोअरवर इशानला मार्कस स्टॉइनिसने पायचित केले.

सूर्यकुमार यादवने टी-20 क्रिकेटमध्ये जबरदस्त खेळ दाखवला आहे, पण 50 षटकांचा फॉरमॅट त्याच्यासाठी काही खास ठरत नाही. सूर्याने आतापर्यंत 21 एकदिवसीय सामन्यांच्या 19 डावांमध्ये 27.06 च्या सरासरीने 433 धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याच्या बॅटमधून दोन अर्धशतके झळकली. शेवटच्या 10 डावांमध्ये सूर्याला चार वेळा दुहेरी आकडा गाठता आला.

भारताच्या वेगवान गोलंदाजांनी वानखेडेवर चोख कामगिरी बजावली आणि ऑस्ट्रेलियाला मोठी धावसंख्या उभी करण्यापासून रोखले. फक्त चायनामन गोलंदाज कुलदीप यादव जास्त प्रभाव पाडू शकला नाही, त्याने पहिल्या दोन षटकांत जास्त धावा दिल्या. असे असले तरी गोलंदाजीत कोणतेही बदल होण्याची शक्यता नाही.

पावसाची शक्यता (IND vs AUS)

दुसर्‍या वन-डेमध्ये पावसाचा धोका निर्माण झाला आहे. वास्तविक भारतातील अनेक राज्यांमध्ये हवामानात अचानक बदल झाला आहे. पण दिल्ली, मध्य प्रदेश आणि आंध्र प्रदेशसह अनेक राज्यांतील काही शहरांमध्ये जोरदार पाऊस झाला. विशाखापट्टणमची स्थितीही अशीच आहे. रविवारी येथे मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. अ‍ॅक्युवेदर या हवामान अ‍ॅपने दिलेल्या माहितीनुसार रविवारी विशाखापट्टणममध्ये पावसाची 80 टक्के शक्यता आहे. दिवसभर ढगाळ वातावरण राहील. रविवारी सकाळी पावसाची शक्यता जास्त आहे. अशा स्थितीत ओल्या मैदानामुळे नाणेफेक होण्यास विलंब होऊ शकतो. दिवसभर ढगाळ वातावरण राहील. सायंकाळी 4 ते 6 दरम्यान मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. पाच वाजणेच्या सुमारास जवळपास 51 टक्के पाऊस पडण्याची शक्यता आहे.

संघ यातून निवडणार : (IND vs AUS)

भारत : रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, लोकेश राहुल (यष्टिरक्षक), इशान किशन, हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, वाशिंग्टन सुंदर, यजुवेंद्र चहल, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमरान मलिक, शार्दुल ठाकूर, अक्षर पटेल, जयदेव उनाडकट.

ऑस्ट्रेलिया : स्टीव्ह स्मिथ (कर्णधार), डेव्हिड वार्नर, ट्रेविस हेड, मार्नुस लॅबुशेन, मिशेल मार्श, मार्कस स्टॉइनिस, ग्लेन मॅक्सवेल, कॅमेरून ग्रीन, जोश इंग्लिस, सीन एबॉट, एश्टन एगर, मिचेल स्टार्क, नॅथन एलिस, एडम झम्पा.

Back to top button