RCB vs GG WPL 2023 : सोफी डिवाईनने केला आरसीबीचा विजय सोपा | पुढारी

RCB vs GG WPL 2023 : सोफी डिवाईनने केला आरसीबीचा विजय सोपा

मुंबई, वृत्तसंस्था : सोफी डिवाईनच्या नेत्रदीपक अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (RCB vs GG WPL 2023) संघाने स्पर्धेतील दुसर्‍या विजयाची नोंद केली. आरसीबीने गुजरात जायंट्स संघावर 8 विकेटस् आणि 27 चेंडू राखूून विजय मिळवला. सलग पाच पराभवानंतर आरसीबीची गाडी रुळावर आली असून ते आता 4 गुणांसह शेवटून दुसर्‍या क्रमांकावर आले आहेत. गुजरातने प्रथम फलंदाजी करताना 4 गडी गमावून 188 धावा केल्या, सोफी डिवाईनने 36 चेंडूंत 99 धावांची स्फोटक खेळी खेळली. याच्या जोरावर आरसीबीने हे आव्हान 15.3 षटकांत पार केले. मुंबईतील ब्रेबॉर्न स्टेडियमवर सोफीचे शतक एका धावेने हुकल्याची हळहळ चाहते व्यक्त करीत होते.

आरसीबी संघाने 189 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना दमदार सुरुवात केली. सलामी फलंदाज स्मृती आणि सोफीने आक्रमक फलंदाजी करताना पहिल्या विकेटसाठी 125 धावांची भागादारी केली. त्यानंतर कर्णधार स्मृती मानधना 37 धावांवर बाद झाली. तिने आपल्या खेळीत 5 चौकार आणि 1 षटकार लगावला. तिला स्नेह राणाने बाद केले. त्यानंतर आरसीबीच्या सोफी डिवाईनचे शतक हुकले. ती 99 धावांवर बाद झाली. डिवाईनने 36 चेंडूंच्या खेळीत 9 चौकार आणि 8 षटकार ठोकले. तिने 20 चेंडूंत आपले अर्धशतक पूर्ण केले होते. किम गर्थच्या गोलंदाजीवर अश्विनी कुमारीने तिला झेलबाद केले. तिचे शतक हुकले असले तरी तिने संघाला विजयाच्या उंबरठ्यावर पोहोचवले होेते. एलिसा पेरी (19) आणि हिदर नाईट (22) यांनी विजयाची औपचारिकता पूर्ण केली.

तत्पूर्वी, नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीस उतरलेल्या गुजरात जायंटसला सोफी डिवाईनने पहिला धक्का दिला आहे. तिने तिसर्‍या षटकाच्या चौथ्या चेंडूवर सोफिया डंकलीला क्लीन बोल्ड केले. डंकलीने 10 चेंडूंत 16 धावा केल्या. तिने तीन चौकार मारले. प्रीती बोसने गुजरातला दुसरा धक्का दिला. तिने सबिनेनी मेघनाला यष्टिरक्षक रिचा घोषने यष्टिचित केले. मेघनाने 32 चेंडूंत 31 धावा केल्या. तिने आपल्या खेळीत चार चौकार मारले. (RCB vs GG WPL 2023)

लॉरा वोल्वार्डने गुजरात जायंट्ससाठी सर्वाधिक धावांची खेळी साकारली. तिने 42 चेंडूंचा सामना करताना 9 चौकार आणि 2 षटकार लगावत 68 धावांची खेळी केली. तिला श्रेयंका पाटीलने तिला झेलबाद केले. लॉराचा झेल प्रीतीने घेतला. त्यानंतर अ‍ॅश्लेघ गार्डनरने 26 चेंडूंत 41 धावांची खेळी केली. ज्यामध्ये 6 चौकार आणि एक षटकार लगावला. शेवटच्या षटकात हरलीन देओल आणि दयालन हेमलता यांनी तुफानी फलंदाजी केली. दोघींनी मिळून नऊ चेंडूंत 27 धावांची भागीदारी केली. हेमलताने सहा चेंडूंत 16 धावा करून नाबाद राहिली आणि हरलीन देओलने पाच चेंडूंत 12 धावा केल्या. आरसीबीकडून श्रेयंका पाटीलने दोन विकेटस् घेतल्या.

Back to top button