Kane Williamson | विल्यमसननं द्विशतक ठोकत श्रीलंकेला फोडला घाम, सचिन, वीरेंद्र, रिकी पाँटिंगची केली बरोबरी | पुढारी

Kane Williamson | विल्यमसननं द्विशतक ठोकत श्रीलंकेला फोडला घाम, सचिन, वीरेंद्र, रिकी पाँटिंगची केली बरोबरी

पुढारी ऑनलाईन डेस्क : न्यूझीलंडचा अनुभवी फलंदाज केन विल्यमसन (Kane Williamson) याने आज शनिवारी (दि.१८) श्रीलंका विरोधातील दुसऱ्या कसोटीत (New Zealand vs Sri Lanka, 2nd Test) द्विशतक शकत झळकावले. विल्यमसनने २९६ चेंडूत २३ चौकार आणि २ षटकार ठोकत २१५ धावा केल्या. त्याशिवाय हेन्री निकोल्सने (Henry Nicholls) देखील नाबाद द्विशतक (२०० धावा) केले. या दोघा फलंदाजांच्या द्विशतकांच्या जोरावर न्यूझीलंडने आपला पहिला डाव १२३ षटकांत ४ बाद ५८० धावांवर घोषित केला. केन विल्यमसनने त्याच्या कारकिर्दीतील सहावे द्विशतक केले आहे. तसेच त्याने २८ वे शतक पूर्ण केले आहे.

विल्यमसनच्या या द्विशतकी खेळीने लाल चेंडू क्रिकेटमध्ये सर्वाधिक द्विशतके करणाऱ्या सचिन तेंडुलकर, वीरेंद्र सेहवाग आणि रिकी पाँटिंग या दिग्गज खेळाडूंची बरोबरी केली आहे. कसोटी क्रिकेटमध्ये सर्वांधिक द्विशतके करण्याचा विक्रम सर डॉन ब्रॅडमन यांच्या नावावर आहे. त्यांनी ५२ सामन्यांत १२ वेळा द्विशतकी खेळी केली आहे. या यादीत कुमार संगकारा ११ आणि ब्रायन लारा ९ द्विशतकांसह टॉप ३ मध्ये आहेत. विराट कोहलीच्या नावावर ७ द्विशतके आहेत. कोहली शिवाय महेला जयवर्धने याच्या नावावरदेखील ७ द्विशतके आहेत. केन विल्यमसन, सचिन तेंडूलकर, वीरेंद्र सेहवाग आणि रिकी पॉटिंग यांच्याशिवाय युनिस खान, जावेद मियांदाद आणि मार्वन अटापट्टूने त्याच्या कारकिर्दीत ६-६ द्विशतके केली आहेत.

विल्यमसन- निकोल्स यांची विक्रमी भागीदारी

केन विल्यमसन (२१५ धावा) आणि हेन्री निकोल्स (नाबाद २००) यांनी श्रीलंका विरुद्ध वेलिंग्टनमध्ये सुरु असलेल्या कसोटीत तिसऱ्या विकेटसाठी ३६३ धावांची भागीदारी केली. विल्यमसन- निरोल्स ही न्यूझीलंडची अशी पहिली जोडी आहे ज्यांनी एकाहून अधिक वेळा ३०० आणि त्याहून अधिक धावांची भागीदारी केली आहे. याआधी विल्यमसन आणि निकोल्सने पाकिस्तान विरुद्ध ख्राइस्टचर्चमध्ये चौथ्या विकेटसाठी ३६९ धावांची भागीदारी केली होती.

कसोटी कारकिर्दीत ८ हजार धावा पूर्ण

केन विल्यमसनच्या (Kane Williamson) द्विशतकी खेळीने त्याने कसोटी कारकिर्दीत ८ हजार धावा पूर्ण केल्या आहेत. तो कसोटीत ८ हजारांहून अधिक धावा करणारा न्यूझीलंडचा पहिला फलंदाज बनला आहे. विल्यमसनने ९४ कसोटीत ८,१२४ धावा केल्या आहेत. त्यात २८ शतके आणि ३३ अर्धशतकांचा समावेश आहे. या यादीत दुसऱ्या स्थानी रॉस टेलर आहे. टेलरने ११२ कसोटीत १९ शतके आणि ३५ अर्धशतकांच्या जोरावर ७,६८३ धावा केल्या आहेत.

एकापेक्षा जास्त वेळा सलग तीन शतके

केन विल्यमसन हा न्यूझीलंडचा पहिला फलंदाज आहे ज्याने कसोटी क्रिकेटमध्ये एकापेक्षा जास्त वेळा सलग तीन शतके करण्याची कामगिरी केली आहे. विल्यमसन सध्या चांगल्या फॉर्ममध्ये आहे. गेल्या फेब्रुवारीमध्ये ३२ वर्षीय विल्यमसनने इंग्लंडविरुद्ध १३२ धावा केल्या होत्या. त्यानंतर श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या कसोटीत नाबाद १२१ धावांची सामना जिंकणारी खेळी केली होती. आता त्याने श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत द्विशतक ठोकले आहे. यापूर्वी २०२१ मध्येही त्याने कसोटीत सलग तीन शतके झळकावली होती. त्यानंतर त्याने वेस्ट इंडिज विरुद्ध २५१ धावांची खेळी केली होती आणि त्यानंतर पाकिस्तान विरुद्ध १२९ आणि २३८ धावा केल्या होत्या.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १७ हजार धावा

केन विल्यमसनने आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील १७ हजार धावाही पूर्ण केल्या आहेत. केन विल्यमसन हा न्यूझीलंडचा दुसरा सर्वाधिक आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत धावा करणारा खेळाडू आहे. न्यूझीलंडसाठी सर्वाधिक आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये धावा करण्याचा विक्रम रॉस टेलरच्या नावावर आहे. त्याच्या नावावर १८,१९९ धावा आहेत. तर विल्यमसनच्या नावावर १७,१४२ धावा आहेत.

हे ही वाचा :

Back to top button