ind vs aus odi : टीम इंडियाचा सलग सातवा वनडे विजय, राहुल-जडेजाच्या शतकी भागिदारीने तारले | पुढारी

ind vs aus odi : टीम इंडियाचा सलग सातवा वनडे विजय, राहुल-जडेजाच्या शतकी भागिदारीने तारले

पुढारी ऑनलाईन डेस्क : केएल राहुल (91 चेंडूत नाबाद 75 धावा) आणि रविंद्र जडेजा (69 चेंडूत नाबाद 45 धावा) यांनी सहाव्या विकेटसाठी केलेल्या नाबाद शतकी भागिदारीच्या जोरावर टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाविरुद्धची पहिली वनडे जिंकली. भारताने 39.5 षटकांत पाच गडी गमावून 191 धावा केल्या. मुंबईच्या वनखेडे स्टेडियमवरील या विजयानंतर भारताने तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली आहे.

कांगारूंनी दिलेल्या 189 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारतीय संघाची फलंदाजांची दमछाक झाली. इशान किशन (3), विराट कोहली (5), सूर्यकुमार यादव (0), शुबमन गिल (20), हार्दिक पंड्या (25) हे पाच फलंदाज शंभरीच्या आतच तंबूत परतले. पण राहुलने एका बाजूने मैदान लढवत मिळालेल्या संधीचे सोने केले आणि भारताच्या विजयीरथाचे सारथ्य यशस्वीरित्या पार पाडले. त्याने 73 चेंडूत आपल्या वनडे कारकिर्दीतील 13 वे अर्धशतक पूर्ण केले. राहुल-जडेजा जोडीने 108 धावांची नाबाद भागिदारी केली. टीम इंडियाचा हा यंदाच्या वर्षातील सलग सातवा वनडे विजय ठरला.

तत्पूर्वी भारतीय संघाने टॉस जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. टीम इंडियाच्या गोलंदाजांनी कर्णधार हार्दिक पंड्याचा हा निर्णय योग्य ठरत पाहुण्या ऑस्ट्रेलियाचा 35.4 षटकांत केवळ 188 धावांत ऑलआऊट केला. अशा प्रकारे भारताला विजयासाठी 189 धावांचे लक्ष्य मिळाले. मोहम्मद शमी आणि मोहम्मद सिराजने 3-3 बळी घेतले.

ऑस्ट्रेलियाला पहिला धक्का ट्रॅव्हिस हेडच्या रूपाने अवघ्या 5 धावांवर बसला. यानंतर मार्शने कर्णधार स्टीव्ह स्मिथसोबत दुसऱ्या विकेटसाठी 72 धावांची भागीदारी केली. चांगल्या लयीत दिसणाऱ्या स्मिथला मोठी खेळी करता आली नाही आणि 22 धावा करून तो तंबूत परतला. त्यानंतर मार्नस लबुशेन (15) आणि जोश इंग्लिश (26) यांना क्रिजवर स्थिरावता आले नाही.

एकवेळ ऑस्ट्रेलियाची धावसंख्या 19.3 षटकांत 2 बाद 129 अशी होती. त्यानंतर मिचेल मार्श आणि मार्नस लबुशेन क्रीजवर होते. रवींद्र जडेजाने मार्शला बाद केले आणि त्यापुढे संघाने 59 धावांत आठ विकेट गमावल्या. तर संपूर्ण संघ 35.4 षटकांत गारद झाला. ऑस्ट्रेलियाकडून मिचेल मार्शने सर्वाधिक धावा केल्या. त्याने 65 चेंडूत 81 धावांची धमाकेदार खेळी केली. डावाची सुरुवात करण्यासाठी आलेल्या मार्शने अप्रतिम फलंदाजी केली. एकाबाजून विकेट पडत असताना त्याने एक टोक धरून ठेवले आणि वनडे कारकिर्दीतील 14वे अर्धशतक 51 चेंडूत पूर्ण केले. त्याने 65 चेंडूत 81 धावांची जलद खेळी खेळली. या खेळीत त्याने 10 चौकार आणि 5 षटकार मारले.

शमी सर्वात यशस्वी गोलंदाज

भारताकडून मोहम्मद शमी सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला. त्याने 17 धावांच्या मोबदल्यात इंग्लिश, कॅमेरून ग्रीन आणि मार्कस स्टॉइनिस यांचे बळी मिळवले. सिराजने 5.4 षटकांमध्ये 29 धावा देऊन 3 विकेट घेतल्या. रवींद्र जडेजाने 9 षटके टाकली, ज्यात त्याने 48 धावांत 2 फलंदाजांना माघारी पाठवले. कुलदीप यादवने 8 षटकात 48 धावा दिल्या आणि त्याला 1 बळी मिळाला. शार्दुल ठाकूरने 2 षटके टाकली. ज्यात 6च्या इकॉनॉमीने 12 धावा दिल्या.

भारताचा डाव गडगडला, पण राहुलच्या अर्धशतकाने तारले

शुभमन गिल आणि ईशान किशन यांनी टीम इंडियासाठी सलामी दिली. पण संघाची सुरुवात खराब झाली. संघाला दुस-याच षटकाच्या शेवटच्या चेंडूवर अवघ्या पाच धावांवर पहिला धक्का बसला. ईशान किशन आठ चेंडूंत तीन धावा करून बाद झाला. मार्कस स्टॉइनिसने त्याला पायचीत केले.

यानंतर, मिचेल स्टार्कने डबल धमाका केला. त्याने 5 व्या षटकाच्या चौथ्या आणि पाचव्या चेंडूंवर टीम इंडियाला सलग दोन झटके दिले. स्टार्कने पहिला विराट कोहली आणि त्यानंतर सूर्यकुमार यादवची लागोपाठ शिकार केली. त्याने फेकलेले हे दोन्ही चेंडू ऑफ स्‍टंपवर गुड लेन्थवर पडले जे इनस्विंग झाले. दोन्ही फलंदाजांनी चेंडूचा बचाव करण्यासाठी बॅट पुढे केली पण चेंडू पॅडवर आदळला. पंचांनी विराटविरुद्ध अपील होताच बाद घोषित केले. त्यानंतर तो मान खाली घालून तंबूत परताला. सूर्याविरुद्ध झालेले अपील पंचांनी परतावून लावले होते. पण ऑस्ट्रेलियन गोलंदाजांनी रिव्ह्यू घेतला. त्यांचा हा निर्णय योग्य ठरला. तिस-या पंचांनी सूर्या बाद असल्याचा निर्णय दिला. यावेळी भारताची धावसंख्या 16 होती.

तीन विकेट गमावल्यानंतर गिलने केएल राहुलसह धावफलक हलता ठेवला. दोघांनी ऑस्ट्रेलियन मा-याचा बचाव करण्याचा अटोकाट प्रयत्न केला. मात्र, स्टार्कने पुन्हा जोरदार आक्रमण केले आणि ही जोडी 10.2 व्या षटकात 39 धावसंख्येवर फोडली. त्याने गिलला चौथ्या स्टंपवर चेंडू फेकला. जो गिलने स्क्वेअरच्या गॅपमधून फटकावण्याचा प्रयत्न केला. पण पॉइंटवर उभा असलेल्या लॅबुशेनने डाव्या बाजूला झेपावत एक शानदार झेल घेतला. गिलने तीन चौकारांसह 31 चेंडूत 20 धावा केल्या. पन्नाशीच्या आतच चार विकेट पडल्याने भारताची अवस्था बिकट झाली.

पण, राहुलने नवा कर्णधार हार्दिक पंड्याच्या साथीने किल्ला लढवला. या जोडीने ऑस्ट्रेलियन गोलंदाजांवर प्रतिआक्रमण केले. दोघांनी संघाची धावसंख्या 83 पर्यंत पोहचवली. पण भारताला 20 व्या मार्कस स्टॉइनिसच्या बाउन्सरवर फटका मारण्याच्या नादात पंड्या कॅमेरून ग्रीनकडे झेलबाद झाला. त्याने 31 चेंडूत 25 धावांचे योगदान देऊन केएल राहुलसोबत पाचव्या विकेटसाठी 55 चेंडूत 44 धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी केली.

पाच फलंदाज तंबूत परतल्याने भारतीय संघ बॅकफुटवर गेला होता. मैदानावर राहुल आणि जडेजा होते. या दोघांनी संयमी खेळ करून संघाची धावसंख्या पुढे नेली आणि शेवटपर्यंत नाबाद राहुन संघाच्या विजयात मोलाची भूमिका बजावली.

Back to top button