Hyderabad vs Royal Challengers : आरसीबीचे टार्गेट ‘टॉप-२’चे | पुढारी

Hyderabad vs Royal Challengers : आरसीबीचे टार्गेट ‘टॉप-२’चे

अबुधाबी; वृत्तसंस्था : (Hyderabad vs Royal Challengers) ‘प्ले ऑफ’मधील आपली जागा निश्चित केल्यानंतर रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (आरसीबी) संघाचा प्रयत्न आता गुणतालिकेत अव्वल दोन स्थानांत पोहोचण्याचे असणार आहे. यासाठी त्यांना सनरायझर्स हैदराबाद संघाविरुद्ध विजय मिळवावा लागेल.

आपले पहिले आयपीएल जेतेपद मिळवण्याच्या इराद्याने खेळत असलेली आरसीबी 12 सामन्यांत 16 गुणांसह तिसर्‍या स्थानी आहे. दिल्ली कॅपिटल्स संघाचे 20 गुण असून, ते पहिल्या स्थानी आहेत. तर, त्यानंतर चेन्नई सुपर किंग्जचा (18 गुण) क्रमांक लागतो.

सनरायझर्स संघाविरुद्ध विजय मिळवल्यास शुक्रवारी दिल्लीविरुद्ध होणार्‍या शेवटच्या सामन्यापूर्वी आरसीबीचा आत्मविश्वास दुणावेल. आरसीबीने आपले दोन्ही सामने जिंकल्यास त्यांचे 20 गुण होतील. त्यामुळे त्यांना अव्वल दोन संघांत स्थान मिळवण्याची संधी आहे.

दुसर्‍या सत्राच्या सुरुवातीला चेन्नई सुपर किंग्ज आणि कोलकाता नाईट रायडर्स संघाकडून पराभूत झाल्यानंतर आरसीबीने चांगले पुनरागमन केले व सलग तीन सामने जिंकत ‘प्ले ऑफ’मध्ये स्थान मिळवले. विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली संघ आपला हाच फॉर्म कायम ठेवण्याचा प्रयत्न करेल.

कोहलीला मोठी खेळी करता आली नसली तरीही त्याला लय सापडली आहे. त्याला युवा सलामीवीर देवदत्त पडिक्ककलचीदेखील चांगली साथ मिळाली आहे. अष्टपैलू खेळाडू ग्लेन मॅक्सवेलने चमकदार कामगिरी केली. त्याने गेल्या लढतीत तिसरे अर्धशतक झळकावले.

ए. बी. डिव्हिलीयर्सला या सत्रात अधिक संधी मिळाली नाही; पण तो ही चांगली कामगिरी करण्यास उत्सुक असेल. आरसीबीच्या गोलंदाजांनी चांगली कामगिरी केली आहे. मोहम्मद सिराज, जॉर्ज गार्टन, हर्षल पटेल, युजवेंद्र चहलने गोलंदाजीत चमक दाखवली.

दुसरीकडे सनरायझर्स हैदराबाद संघाने या सत्रात निराशाजनक कामगिरी केली. सलग पराभवामुळे संघ यापूर्वीच ‘प्ले ऑफ’च्या शर्यतीतून बाहेर पडला आहे. त्यांना 12 सामन्यांत केवळ दोनच विजयाची नोंद करता आली आणि त्यामुळे ते गुणतालिकेत शेवटच्या स्थानी आहेत. दुसर्‍या सत्रातील पाच सामन्यांत केवळ राजस्थान रॉयल्स संघाविरुद्ध त्यांना विजय मिळवता आला. फलंदाजी ही सनरायझर्स संघाची कमकुवत बाजू म्हणून समोर आली आहे.

जॉनी बेअरस्टोच्या अनुपस्थितीत संघाला आणखीन फटका बसला. गोलंदाजीत जेसन होल्डरने आपली भूमिका चोखपणे पार पाडली. मात्र, भुवनेश्वर कुमार व सिद्धार्थ कौल यांनी निराशा केली. त्यामुळे सनरायझर्सचा प्रयत्न उर्वरित दोन सामन्यांत चांगली कामगिरी करीत शेवट गोड करण्याचा असेल.

दोन्ही संघ यातून निवडणार :(Hyderabad vs Royal Challengers )

रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर : विराट कोहली (कर्णधार), नवदीप सैनी, ग्लेन मॅक्सवेल, डॅन ख्रिस्टियन, रजत पाटीदार, दुष्मंथा चमीरा, पवन देशपांडे, मोहम्मद सिराज, हर्षल पटेल, मोहम्मद अजहरुद्दीन, सचिन बेबी, वानिंडू हसरंगा, जॉर्ज गार्टन, युजवेंद्र चहल, शाहबाज अहमद, देवदत्त पडिक्कल, काईल जेमिन्सन, सुयश प्रभुदेसाई, के. एस. भरत, टीम डेव्हिड, आकाश दीप, ए. बी. डिव्हिलीयर्स.

सनरायझर्स हैदराबाद : केन विल्यम्सन (कर्णधार), डेव्हिड वॉर्नर, मनीष पांडे, शेरफेन रुदरफोर्ड, वृद्धिमान साहा, श्रीवत्स गोस्वामी, राशीद खान, विजय शंकर, मोहम्मद नबी, अभिषेक शर्मा, भुवनेश्वर कुमार, सिद्धार्थ कौल, खलील अहमद, बासिल थंपी, संदीप शर्मा, शाहबाज नदीम, अब्दुल समद, जे. सुचित, जेसन होल्डर, विराट सिंह, प्रियम गर्ग, केदार जाधव, मुजिब-उर-रहमान, जेसन रॉय.

Back to top button