NZ vs SL Test : न्यूझीलंडच्या विजयाची शेवटची ‘थरारक ओव्हर’! विल्यमसनने पलटवली बाजी(Video) | पुढारी

NZ vs SL Test : न्यूझीलंडच्या विजयाची शेवटची ‘थरारक ओव्हर’! विल्यमसनने पलटवली बाजी(Video)

पुढारी ऑनलाईन डेस्क : NZ vs SL Test Last Over : ख्राईस्टचर्च येथे खेळल्या गेलेल्या कसोटी सामन्यात टीम साऊदीच्या नेतृत्वाखालील न्यूझीलंड संघाने श्रीलंकेचा दोन विकेट राखून पराभव केला. याचबरोबर दोन सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. न्यूझीलंडच्या या विजयाचा नायक केन विल्यमसन ठरला. त्याने संघाला विजय मिळवून देण्यासाठी आपले सर्वस्व पणाला लावले. उजव्या हाताच्या फलंदाजाने 121 धावांची नाबाद खेळी केली. या खेळीच्या जोरावर विल्यमसन न्यूझीलंडसह भारताचा हिरो ठरला. वास्तविक, न्यूझीलंडच्या या विजयासह भारताने सलग दुसऱ्यांदा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे.

शेवटच्या 3 षटकांचा थरार

कसोटी सामन्याच्या शेवटच्या दिवशी शेवटच्या सत्रात आणि शेवटच्या 3 षटकात न्यूझीलंडला विजयासाठी 20 धावांची गरज होती. म्हणजे त्यांना 18 चेंडूत 20 धावा करायच्या होत्या. न्यूझीलंडने 68 व्या षटकात एक विकेट गमावून 5 धावा जमवल्या. 69 व्या षटकातही असेच घडले. न्यूझीलंडने 7 धावा केल्या आणि एक विकेट गमावली.

आता शेवटच्या षटकात न्यूझीलंडला 8 धावांची गरज होती आणि त्यांच्याकडे फक्त 3 विकेट शिल्लक होत्या. शतकवीर केन विल्यमसन क्रीजवर होता. त्याने असिथा फर्नांडोच्या पहिल्या चेंडूचा सामना केला. या चेंडूवर त्याने एकेरी धाव पूर्ण केली. दुसरी धाव घेण्यासाठी तो वळताच तो घसरला आणि दुसरी धाव त्याला घेता आली नाही.

दुस-या चेंडूवर मॅट हेन्रीने एकच धाव घेतली. त्यामुळे तिसरा चेंडू खेळण्यासाठी पुन्हा केन विल्यमसन आला. हा चेंडू किवींच्या माजी कर्णधाराने फटकावला आणि त्यावर दोन धावा घेण्याचा प्रयत्न केला. पण हेन्री नॉन-स्ट्राइक एंडला धावबाद झाला. अशा प्रकारे आता 3 चेंडूत 5 धावा हव्या होत्या. विल्यमसन पुन्हा असिथाच्या चेंडूचा सामना करण्यासाठी स्टाईकवर होता. त्याने पॉइंटच्या गॅपमधून चेंडू बाऊंड्रीकडे फटकावला. याचबरोबर सामना बरोबरीत आला. अजून दोन चेंडू बाकी होते आणि जिंकायला एक धाव काढायची होती.

असिथा फर्नांडोने विल्यमसनला पाचवा चेंडू बाऊन्सर टाकला, जो खूप उंच होता. सर्वांना वाटले की ते वाइड दिला जाईल, परंतु पंचानी वन बाऊन्स इशारा दिला. अशा प्रकारे पाचवा चेंडू डॉट गेला. अखेर सामन्याचा निकाल शेवटच्या चेंडूवर येऊन ठेपला. सहव्या चेंडूवर विल्यमसन एक धाव काढतो की चेंडू डॉट घालवण्यात असिथा यशस्वी ठरतो याची उत्सुकता शिगेला पोहली होती.

असिथाने शेवटचा चेंडू फेकला. ज्याला उसळी मिळाली. विल्यमसनने पुल शॉट खेळण्याचा प्रयत्न केला. पण चेंडू बॅटला लागला नाही आणि यष्टीरक्षकाच्या हातात गेला. क्षणाचाही विलंब न करता विल्यमसन धाव घेण्यासाठी पळाला. त्याचवेळा नॉन स्टाईकर नील वॅगनरही धावला. यष्टीरक्षकाने चेंडू थ्रो केला. पण बॅटींग एंडच्या विकेटवर न लागता तो गोलंदाजाच्या हातात गेला. असिथाने गिरकी घेऊन क्षणार्धात चेंडू नॉन स्ट्रायकर एंडच्या विकेटवर फेकला. ज्याने विकेटचा यशस्वी वेध घेतला. त्याचवेळी विल्यमसनने क्रिजमध्ये झेप घेतली होती. श्रीलंकेच्या खेळाडूंनी जोरदार अपील करण्यात आले. अखेर मैदानी पंचांनी तिस-या पंचांची मदत मागितली. यानंतर रिप्लेमध्ये विल्यमसन चेंडू विकेटवर आदळण्यापूर्वी क्रिजमध्ये पोहचल्याचे स्पष्ट दिसले. ज्यामुळे त्याला नाबाद म्हणून घोषीत करण्यात आले. याचबरोबर विजयी धाव पूर्ण करून किवींनी सामना 2 विकेटने खिशात टाकला.

NZ vs SL कसोटीचे शेवटचे षटक

69.1 : केन विल्यमसनने एक धाव घेतली.
69.2 : मॅट हेन्रीने एक धाव घेतली
69.3 : केन विल्यमसनने एक धाव घेतली. पण दुसरी धाव घेताना मॅट हेन्री धावबाद झाला
69.4 : केन विल्यमसनने चौकार मारला.
69.5 : डॉट बॉल
69.6 : केन विल्यमसनने 1 विजयी धाव घेत सामना खिशात टाकला

Back to top button