Virat Kohli 100 : विराट कोहलीचे शतक! अहमदाबाद कसोटीत ‘रन मशिन’ सुसाट | पुढारी

Virat Kohli 100 : विराट कोहलीचे शतक! अहमदाबाद कसोटीत ‘रन मशिन’ सुसाट

पुढरी ऑनलाईन डेस्क : Virat Kohli 100 :टीम इंडियाचा रन मशिन विराट कोहलीने अहमदाबाद कसोटीत शानदार शतक झळकावून इतिहास रचला. त्याने 241 चेंडूत 100 धावा पूर्ण केल्या. त्याचे हे कसोटी कारकिर्दीतील 28 वे शतक आहे. या डावात कोहलीने आपल्या फलंदाजीच्या शैलीत बदल केला आणि अतिशय संथ गतीने शतकी मजल मारण्यात यशस्वी झाला.आपल्या शतकी खेळीत त्याने 80 धावा पळून काढल्या तर केवळ 5 चौकारांच्या सहाय्याने त्याने 20 धावा जमवल्या. संपूर्ण खेळीदरम्यान त्याने आपले लक्ष विकेटवर टिकून राहण्यावर दिले आणि संघाची धावसंख्या 400 पार पोहचवली.

विराट कोहलीने अहमदाबाद कसोटीच्या तिसऱ्या दिवसाच्या शेवटच्या सत्रापासून एक टोक खंबीरपणे सांभाळले. त्याने जवळपास 40 च्या स्ट्राइक रेटने फलंदाजी केली. तीन अर्धशतकी भागिदारी रचल्या. सोमवारी, विराटने शुभमन गिल (128) सोबत तिसऱ्या विकेटसाठी 58, तर रविवारी रवींद्र जडेजा (28) सोबत चौथ्या विकेटसाठी 64 आणि केएस भरतच्या साथीने पाचव्या विकेटसाठी 84 धावांची भागिदारी रचली. (Virat Kohli 100)

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्याचे 75 वे शतक

विराटने 23 नोव्हेंबर 2019 रोजी कोलकाता येथे बांगलादेशविरुद्धच्या डे-नाईट कसोटीत शेवटचे शतक झळकावले होते. आता 3 वर्षे 3 महिने 17 दिवसांच्या (1204 दिवस) प्रतीक्षेनंतर विराटच्या बॅटने तीन आकडी धावसंख्येचा टप्पा पूर्ण केला आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धचे सातवे तर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्याचे 75 वे शतक आहे.

अहमदाबाद येथे सुरू असलेल्या चौथ्या कसोटीत टीम इंडियाने कांगारूंना चोख प्रत्युत्तर दिले आहे. चौथ्या दिवशी उपाहारापर्यंत भारतीय फलंदाजांनी सुरुवातीच्या 5 विकेटसाठी 50 किंवा त्याहून अधिक धावांची भागिदारी रचली. टीम इंडियाने कसोटीच्या एका डावात पहिल्या 5 विकेटसाठी 50 किंवा त्याहून अधिक धावांची भागीदारी करण्याची ही तिसरी वेळ आहे.

1993 आणि 2007 मध्येही झाला होता असा पराक्रम

भारताने 1993 मध्ये पहिल्यांदा असा पराक्रम केला होता. मुंबईत खेळल्या गेलेल्या त्या सामन्यात भारतीय फलंदाजांनी इंग्लंडविरुद्ध पहिल्या 5 विकेटसाठी 50 हून अधिक धावांची भागीदारी केली. यानंतर 2007 मध्ये बांगलादेशविरुद्ध मीरपूर कसोटीत अशी किमया घडली होती. मीरपूर कसोटीत पहिल्या 3 विकेटसाठी भारताकडून 100 हून अधिक धावांची भागीदारी झाली होती.

चाहते झाले होते नाराज

या आधीच्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्ये त्याला धावा करता आल्या नव्हत्या. सुरुवातीच्या तीन सामन्यांच्या पाच डावांमध्ये त्याच्या बॅटमधून केवळ 111 धावा आल्या होत्या. अशातच आता मालिकेतील चौथ्या कसोटीच्या चौथ्या दिवशी शतकी खेळी साकारून त्याने चाहत्यांना खुश केले आहे.

कोहलीला मार्च 2022 पासून त्याला कसोटीत एकही अर्धशतक झळकावता आले नव्हते. त्याने शेवटचे अर्धशतक जानेवारी 2022 मध्ये द. आफ्रिकेविरुद्ध केले होते. कर्णधार म्हणून ती त्याची शेवटची कसोटी होती. कर्णधारपद सोडल्यापासून विराटच्या बॅटने एकही अर्धशतक झळकले नाही. पण त्याने आता थेट शतक फटकावून टीकाकारांना आपल्या बॅटमधून उत्तर दिले आहे. (Virat Kohli 100)

कोहलीने आपल्या कारकिर्दीतील पहिल्या 13 डावांनंतर 24 जानेवारी 2012 रोजी अॅडलेड कसोटीत पहिले कसोटी शतक झळकावले. यानंतर त्याने कधीच मागे वळून पाहिले नाही. पुढील सात वर्षांत म्हणजे 22 नोव्हेंबर 2019 पर्यंत त्याने आणखी 26 शतके झळकावली. गेल्या 41 डावांमध्ये कोहलीच्या बॅटमधून एकही कसोटी शतक झळकलेले नव्हते. पण अहमदाबाद कसोटीत 42वा डाव खेळताना त्याने शतकाचा दुष्काळ संपवला. (Virat Kohli 100)

Back to top button