Usman Khawaja : आशियाई मैदानांवर 150+ धावा फटकावणारा तिसरा ‘कांगारू’ | पुढारी

Usman Khawaja : आशियाई मैदानांवर 150+ धावा फटकावणारा तिसरा ‘कांगारू’

पुढारी ऑनलाईन डेस्क : अहमदाबाद कसोटीच्या दुसऱ्या दिवशी उस्मान ख्वाजाने (Usman Khawaja) भारतीय गोलंदाजांना जेरीस आणले. त्याने तब्बल 422 चेंडूंचा सामना करत 21 चौकारांच्या मदतीने 180 धावांची मॅरेथॉन खेळी साकारली. यासह त्याने अनेक विक्रम आपल्या नावावर केले आहेत.

ख्वाजाने 10 तासांपेक्षा जास्त वेळ फलंदाजी केली. एका डावात 400 पेक्षा जास्त चेंडूंचा सामना करणारा तो 8 वा विदेशी खेळाडू ठरला. तसेच भारतीय मैदानावर 400 किंवा त्याहून अधिक चेंडू खेळण्याचा विक्रम त्याने आपल्या नावावर केला आहे. त्याच्याआधी ग्रॅहम यॅलॉप, स्टीव्ह स्मिथ, अॅलन बॉर्डर आणि शेन वोर्टसन यांनी एका डावात सर्वाधिक चेंडू खेळले आहेत.

भारतात एका डावात सर्वाधिक चेंडू खेळणारे ऑस्ट्रेलियन खेळाडू

उस्मान ख्वाजा (2023) : 422 चेंडू, अहमदाबाद कसोटी
ग्रॅहम यल्लोप (1979) : 392 चेंडू, कोलकाता कसोटी
स्टीव्ह स्मिथ (2017) : 361 चेंडू, रांची कसोटी
अॅलन बॉर्डर (1979) : 360, चेन्नई कसोटी
शेन वॉट्सन (2010) : 338, मोहाली कसोटी

ख्वाजाने आपल्या डावातील 346व्या चेंडूवर 150 धावा पूर्ण केल्या. ख्वाजा हा मॅथ्यू हेडन (2001)नंतर 150+ धावा करणारा पहिला ऑस्ट्रेलियन सलामीवीर ठरला. भारतातील कसोटीत 150 धावांचा टप्पा पार करणारा तो खेळाच्या इतिहासातील केवळ चौथा ऑस्ट्रेलियन सलामीवीर आहे. भारताविरुद्ध सर्वात मोठी इनिंग खेळण्याचा विक्रम हेडनच्या नावावर आहे. त्याने 2001 मध्ये चेन्नई कसोटीत 203 धावांची ऐतिहासिक खेळी साकारली होती.

भारतात 150+ धावा करणारे ऑस्ट्रेलियन सलामीवीर

जिम बर्क (1956) : ब्रेबॉर्न स्टेडियमवर 161 धावा
ग्रॅहम यॅलॉप (1979) : ईडन गार्डन्स स्टेडियमवर 167 धावा
मॅथ्यू हेडन (2001) : चेन्नईमध्ये 203 धावा
उस्मान ख्वाजा (2023) : नरेंद्र मोदी स्टेडियमवर 180 धावा

सध्या सुरू असलेल्या बॉर्डर-गावसकर मालिकेत ख्वाजा हा सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहे. त्याने चार कसोटीत आतापर्यंत 300 हून अधिक धावा फटकावल्या आहेत. या बाबतीत तो अव्वल स्थानावर असून त्याच्यानंतर भारताचा कर्णधार रोहित शर्माचा क्रमांक आहे.

ख्वाजा (Usman Khawaja) अहमदाबाद कसोटीत 180 धावांवर बाद झाला. तत्पूर्वी, त्याने 13 मार्च 2022 रोजी पाकिस्तानविरुद्धच्या कराची कसोटीच्या पहिल्या डावात 160 धावा केल्या होत्या. ग्रॅहम यॅलॉप यांनी ऑक्टोबर 1979 मध्ये कोलकात्याच्या ईडन गार्डन्सवर भारताविरुद्धच्या कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात 167 आणि मार्च 1980 मध्ये फैसलाबाद येथे पाकिस्तानविरुद्धच्या कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात 172 धावा केल्या होत्या.

अॅलन बॉर्डरने सप्टेंबर 1979 मध्ये चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर भारताविरुद्धच्या कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात 162 आणि मार्च 1980 मध्ये लाहोर येथे पाकिस्तानविरुद्धच्या कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात नाबाद 150 धावा केल्या होत्या.

ख्वाजा (Usman Khawaja) हा 1 जानेवारी 2022 पासून कसोटीत सर्वाधिक धावा करणारा खेळाडू आहे. त्याने 16 कसोटी सामन्यांच्या 28 डावांमध्ये 72+ च्या सरासरीने 1600 हून अधिक धावा तडकावल्या आहेत. ख्वाजानंतर इंग्लंडचा माजी कर्णधार जो रूटचा क्रमांक लागतो. जो रूटने 1 जानेवारी 2022 पासून 17 कसोटी सामन्यांच्या 31 डावांमध्ये 52.48 च्या सरासरीने 1417 धावा केल्या आहेत.

Back to top button