शेष भारत संघाचा इराणी चषकावर कब्जा | पुढारी

शेष भारत संघाचा इराणी चषकावर कब्जा

ग्वाल्हेर, वृत्तसंस्था : मध्य प्रदेश आणि शेष भारत यांच्यातील इराणी चषक कसोटी सामना पार पडला. या सामन्यात शेष भारत संघाने चमकदार कामगिरी करत 238 धावांच्या फरकाने मोठा विजय मिळवला. सामन्यात शेष भारताने सुरुवातीपासूनच वर्चस्व राखत मध्य प्रदेशच्या युवा संघाचा पराभव केला. 437 धावांच्या विशाल लक्ष्याचा पाठलाग करताना मध्य प्रदेशचा संघ दुसर्‍या डावात 198 धावांत आटोपला.

शेष भारताने 30 व्यांदा हे विजेतेपद पटकावले आहे. या सामन्यात यशस्वी जैस्वालने द्विशतक आणि एका शतकासह दोन्ही डावांत एकूण 357 धावा केल्या. त्याला सामनावीर म्हणून गौरवण्यात आले. मध्य प्रदेश संघाने दिवसाची सुरुवात 2 बाद 81 धावांवरून केली. प्रथमच इराणी चषक जिंकण्यासाठी त्यांना आणखी 356 धावांची गरज होती, पण कालचा नाबाद फलंदाज हिमांशू मंत्री त्याच्या 51 धावसंख्येमध्ये कोणतीही भर न घालता बाद झाला. शेष भारताकडून सौरभ कुमारने तीन तर मुकेश कुमार आणि पुलकित नारंगने प्रत्येकी दोन बळी घेतले.

तत्पूर्वी, भारतीय संघात स्थान मिळवण्यासाठी प्रबळ दावेदार असलेल्या यशस्वी जैस्वालने आपला उत्कृष्ट फॉर्म कायम ठेवला. त्याने दुसर्‍या डावातही शतक झळकावले. पहिल्या डावात 213 धावा करणार्‍या जैस्वालने दुसर्‍या डावात 144 धावांचे योगदान दिले, ज्यामुळे शेष भारताला या डावात 246 धावा करता आल्या.

शेष भारताने पहिल्या डावात 484 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात मध्य प्रदेश 194 धावांवर संपुष्टात आला. या सामन्यात स्टार फलंदाज जैस्वालने नवा इतिहास रचला. आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्सकडून खेळणार्‍या यशस्वीने या सामन्यात एकूण 357 धावा केल्या. दुसर्‍या डावात त्याने 132 चेंडूंत 15 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने नाबाद 144 धावा केल्या. तत्पूर्वी, पहिल्या डावातही 259 चेंडूंत 30 चौकार आणि 3 षटकारांच्या मदतीने 213 धावांची शानदार खेळी केली होती.

Back to top button