Meg Lanning : मेग लॅनिंग दिल्ली कॅपिटल्सची कर्णधार, रॉड्रिग्ज उपकर्णधार | पुढारी

Meg Lanning : मेग लॅनिंग दिल्ली कॅपिटल्सची कर्णधार, रॉड्रिग्ज उपकर्णधार

पुढारी ऑनलाईन डेस्क : Meg Lanning : दिल्ली कॅपिटल्स संघाने महिला प्रीमियर लीग सुरू होण्याच्या दोन दिवस आधी कर्णधाराच्या नावाची घोषणा केली. ऑस्ट्रेलियाला महिला टी-20 विश्वचषक स्पर्धेत चॅम्पियन बनवणा-या कर्णधार मेग लॅनिंगकडे (meg lanning) संघाचे नेतृत्व सोपवण्यात आले आहे. त्याचबरोबर भारताची फलंदाज जेमिमाह रॉड्रिग्जची (jemimah rodrigues) संघाच्या उपकर्णधारपदी निवड करण्यात आली आहे.

महिला प्रीमियर लीग (WPL)चा पहिला हंगाम 4 मार्चपासून सुरू होणार आहे. त्याआधी दिल्ली कॅपिटल्स (DC)ने मेग लॅनिंगची कर्णधारपदी निवड जाहीर केली आहे. लॅनिंग ऑस्ट्रेलियाच्या महिला संघाची यशस्वी कर्णधार आहे. तिच्या नेतृत्वाखाली कांगारू संघाने अलीकडेच महिला टी-20 विश्वचषक विजेतेपद पटकावले आहे.

लॅनिंग यशस्वी कर्णधार

लॅनिंगच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियाने महिला टी-20 विश्वचषकाच्या अंतिम फेरीत दक्षिण आफ्रिकेचा पराभव केला. कर्णधार म्हणून सर्वाधिक आयसीसी जेतेपदे जिंकण्याचा विक्रम तिच्या नावावर आहे. लॅनिंगच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियाने 5 वेळा आयसीसी विजेतेपदावर कब्जा केला आहे. या यादीत तिच्यापाठोपाठ रिकी पाँटिंगचा क्रमांक लागतो. ज्याच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियाच्या पुरुष संघ 4 वेळा आयसीसी स्पर्धांमध्ये चॅम्पियन बनला आहे. तर महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली भारताने 3 वेळा आयसीसी विजेतेपद पटकावले आहे.

100 टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये लॅनिंग एकमेव कर्णधार

लॅनिंगने यंदाच्या महिला टी-20 विश्वचषकाच्या अंतिम फेरीत आणखी एक मोठी कामगिरी केली. 100 टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये संघाचे नेतृत्व करणारी ती पहिली क्रिकेटर ठरली. तिच्या पाठोपाठ भारतीय कर्णधार हरमनप्रीत कौरचा क्रमांक लागतो, जिने 96 सामन्यांमध्ये कर्णधारपद भूषवले आहे. पुरुषांमध्ये ऑस्ट्रेलियाचा माजी फलंदाज अॅरॉन फिंच (76 टी-20)च्या नावावर सर्वाधिक टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये संघाचे नेतृत्व करण्याचा विक्रम आहे.

लॅनिंग : सर्वाधिक धावा करणारी दुसरी खेळाडू

लॅनिंग ही टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारी दुसरी खेळाडू आहे. लॅनिंगने आतापर्यंत 132 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले असून 36.61 च्या सरासरीने आणि 116.37 च्या स्ट्राइक रेटने 3,405 धावा केल्या आहेत. यात 2 शतके आणि 15 अर्धशतकांचा समावेश आहे. नाबाद 133 ही तिची सर्वोच्च धाचसंख्या आहे. तिच्यापुढे फक्त न्यूझीलंडची सुझी बेट्स आहे. तिने 143 सामन्यांत 3,820 धावा केल्या आहेत.

असा आहे दिल्लीचा संघ :

फलंदाज : जेमिमाह रॉड्रिग्ज, मेग लॅनिंग, शेफाली वर्मा, लॉरा हॅरिस, जसिया अख्तर आणि स्नेहा दीप्ती.
गोलंदाज : तिता साधू, तारा नॉरिस आणि पूनम यादव.
यष्टिरक्षक : तान्या भाटिया आणि अपर्णा मंडल.
अष्टपैलू : राधा यादव, शिखा पांडे, मारिजन कॅप, अॅलिस कॅप्सी, मिन्नू मणी, अरुंधती रेड्डी आणि जेस जोनासेन.

Back to top button