Nathan Lyon : लायनने भारताविरुद्ध रचला इतिहास! मुरलीधरनचा ‘हा’ विक्रम मोडला | पुढारी

Nathan Lyon : लायनने भारताविरुद्ध रचला इतिहास! मुरलीधरनचा ‘हा’ विक्रम मोडला

पुढारी ऑनलाईन डेस्क : इंदूर कसोटीच्या दुसऱ्या दिवशी ऑस्ट्रेलियाचा फिरकी गोलंदाज नॅथन लायनने (Nathan Lyon) टीम इंडियाविरुद्ध इतिहास रचला. भारताच्या दुस-या डावात लायनने शुबमन गिलला बाद करताच तो भारताविरुद्धचा सर्वात यशस्वी फिरकी गोलंदाज ठरला आहे. त्याने श्रीलंकेचा माजी दिग्गज फिरकीपटू मुथय्या मुरलीधरनला मागे टाकले.

लायनने (Nathan Lyon) टीम इंडियाविरुद्ध 25 व्या कसोटीत हा मोठा पराक्रम केला. यापूर्वी मुरलीधरन 22 कसोटीत 105 बळी मिळवून आघाडीवर होता. मात्र, लायनने इंदूर कसोटीत भारताच्या दुस-या डावात टीम इंडियाविरुद्धची 106वी विकेट आपल्या खात्यात जमा केली. फिरकी गोलंदाजांव्यतिरिक्त टीम इंडियाविरुद्ध सर्वाधिक विकेट्स घेण्याचा विक्रम इंग्लंडचा अनुभवी वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसनच्या नावावर आहे. त्याने 35 सामन्यांत 139 विकेट घेतल्या आहेत.

भारताविरुद्ध यशस्वी फिरकीपटू

नॅथन लिऑन – 110*
मुथय्या मुरलीधरन – 105
लान्स गिब्स – 63
डेरेक अंडरवुड – 62

भारताविरुद्ध सर्वाधिक बळी घेणारे गोलंदाज

जेम्स अँडरसन – 139
नॅथन लायन – 110*
मुथय्या मुरलीधरन – 105
इम्रान खान – 94
माल्कम मार्शल – 76

गिलला लायनपुढे हिरोगिरी करणे पडले महागात

केएल राहुलच्या जागी संघात स्थान मिळालेल्या शुभमन गिलला संधीचे सोने करता आलेले नाही. इंदूर कसोटीच्या दोन्ही डावात त्याने निराशा केली. दुसऱ्या डावात तर तो अत्यंत खराब शॉट खेळून पॅव्हेलियनमध्ये परतला. नॅथन लायनने त्याचा त्रिफळा उडवला.

भारताविरुद्धच्या तिसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाकडे 88 धावांची आघाडी होती. ज्याच्या प्रत्युत्तरात भारताला लवकरच पहिला धक्का बसला. सलामीवीर शुभमन गिलच्या रुपाने ही मोठी विकेट गमवावी लागली. लायनच्या गोलंदाजीवर क्लीन बोल्ड होऊन तो पॅव्हेलियनमध्ये परतला आहे. क्रिज सोडून पुढे येत मोठा फटका खेळण्याच्या नादात गिलने आपली विकेट कांगारूंना बहाल केली.

डावाच्या 5 व्या षटकाच्या सहाव्या चेंडूवर गिल लायनचा चेंडू स्टेप आऊट होऊन खेळण्याच्या प्रयत्नात होता. त्याला लांब षटकार मारायचा होता. हा चेंडू खेळत असताना गिलने त्याचे डोळे बंद केलेले दिसले. अशातच चेंडू बॅटच्या संपर्कात आला नाही आणि तो क्लिन बोल्ड झाला. कर्णधार रोहितलाही गिलचे अशाप्रकारे बाद होणे पसंत पडले नाही.

Back to top button