अव्वल स्थान भूषविणे हीच माझी महत्त्वाकांक्षा : नोव्हाक जोकोविच | पुढारी

अव्वल स्थान भूषविणे हीच माझी महत्त्वाकांक्षा : नोव्हाक जोकोविच

378 आठवडे सतत अव्वल क्रमांकावर विराजमान, 93 एकेरीचे विजेतेपद, त्यातील 22 ग्रँड स्लॅम मुकुट, अशी अद्वितीय कामगिरी केलेला, ज्याच्या रॅकेटची जादू आणि कोर्टवरील पदलालित्य आणि जोरकस अचूक फटके यावर जगातील लाखो टेनिस रसिक फिदा आहेत असा सर्बियाचा महान, दिग्गज खेळाडू नोव्हाक जोकोविच दुबई टेनिस स्पर्धेचे विजेतेपद पटकावण्यासाठी सज्ज झाला आहे.

दुबई टेनिस स्पर्धेच्या महिलांच्या सामन्यांची सांगता झाल्यानंतर 28 तारखेपासून पुरुषांची स्पर्धा सुरू होत आहे. त्याच्या पूर्वसंध्येस बलाढ्य जोकोविचने क्रीडा समीक्षकांशी मनमोकळेपणाने वार्तालाप साधला.

नोव्हाक जोकोविच म्हणाला, माझे ध्येय अत्युच्च असते. अजूनही सर्वोच्च पातळीचे सामने खेळतोय हे माझे भाग्य आहे. व्यावसायिक खेळाडू म्हणून माझी काही उद्दिष्टे आहेत आणि चांगले यश संपादन करतोय म्हणून आनंदी आहे. प्रदीर्घ असा अनुभव जाणीव करून देत असतो की, मी सतत यश मिळवीत राहीन.

दुबई येथे खेळणे मला फार आवडते. 5 वेळा विजेते पदाचा अनुभवदेखील चाखलाय. प्रेक्षक भरपूर पाठिंबा देतात. सर्बियाचे लोकही येथे मोठ्या प्रमाणात आहेत. त्यामुळे धमाल येते. 500 गुण देणारी ही महत्त्वाची स्पर्धा आहे. इथली हॉटेल्स, रेस्टॉरंटस्, हवामान सगळे भन्नाट आहे. आणि महत्त्वाचे म्हणजे दुबई टेनिस प्रशिक्षणाचे मुख्य केंद्र बनले आहे. स्वतःच्या दुखापती आणि खेळाबाबत जोकोविच पुढे म्हणाला, ऑस्ट्रेलियन ओपन नंतर मी जरा साशंक होतो; परंतु कोणत्याही परिस्थितीत येथे खेळण्यासाठी आतुर होतो. दोन आठवडे टेनिसचा अजिबात सराव केला नाही. पूर्ण लक्ष व्यायामावर दिले. पूर्ण सक्षम, तंदुरुस्त होण्याकडे भर दिला आणि मोठ्या स्पर्धा खेळण्यासाठी सज्ज झालो. अखेरीस नोव्हाकने आत्मविश्वासाचे उद्गार काढले.

Back to top button