IND vs AUS : होळकर मैदानावर टीम इंडियाचे वर्चस्व | पुढारी

IND vs AUS : होळकर मैदानावर टीम इंडियाचे वर्चस्व

इंदूर, वृत्तसंस्था : भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यातील तिसरा कसोटी सामना 1 मार्चपासून इंदूरमध्ये खेळवला जाणार आहे. पहिले दोन सामने टीम इंडिया जिंकले आहेत. या विजयाच्या जोरावर रोहित सेनेने चार सामन्यांच्या या मालिकेत 2-0 अशी आघाडी घेतली आहे. आता टीम इंडियाचे टार्गेट हे इंदूर कसोटी जिंकून विजयाची हॅट्ट्रिक पूर्ण करणे आणि मालिकेवर कब्जा मिळवणे हेच आहे.

तिसर्‍या कसोटीत कांगारूंचा पराभव झाल्यास टीम इंडिया डब्ल्यूटीसी गुणतालिकेतही पहिले स्थान मिळवून स्पर्धेची अंतिम फेरी गाठेल. त्यामुळे इंदूर कसोटी भारतासाठी अनेक अर्थांनी खास ठरणार आहे.

इंदूर मैदानात भारताचे वर्चस्व (IND vs AUS)

इंदूरच्या होळकर स्टेडियमवर टीम इंडियाने आतापर्यंत केवळ दोन कसोटी सामने खेळले असून दोन्ही सामन्यांमध्ये टीम इंडियाने मोठा विजय नोंदवला आहे. 2016 मध्ये भारताने न्यूझीलंडचा 321 धावांच्या मोठ्या फरकाने पराभव केला होता. यानंतर 2019 मध्ये टीम इंडियाने बांगला देशवर एक डाव आणि 130 धावांनी विजय मिळवला. या दोन्ही सामन्यांत टीम इंडिया ऑलआऊट झाली नाही, इथे खेळलेले तिन्ही डाव टीम इंडियाने घोषित केलेले आहेत.

विराट कोहली आणि मयंक अग्रवाल यांची द्विशतके

इंदूरच्या मैदानावर केवळ दोनच खेळाडूंनी द्विशतक झळकावले आहे. हे दोन्ही खेळाडू भारतीय आहेत. विराट कोहलीने न्यूझीलंडविरुद्ध 211, तर मयंक अग्रवालने बांगला देशविरुद्ध 243 धावा फटकावल्या. दुसरीकडे या मैदानावर एकाही परदेशी फलंदाजाला 100 धावांचा टप्पाही पार करता आलेला नाही.

रोहित मायदेशात 2000 कसोटी धावांचा टप्पा पार करणार (IND vs AUS)

इंदूर कसोटीत कर्णधार रोहित शर्माही एक मोठा विक्रम आपल्या नावावर करू शकतो. तो सध्या उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या कसोटीत त्याने नागपूरच्या मैदानावर 120 धावांची शानदार खेळी केली होती. कोणत्याही गोलंदाजीचा मुकाबला करण्याची क्षमता त्याच्यात आहे. त्याने मायदेशात आतापर्यंत 22 कसोटी सामने खेळले असून 71.96 च्या प्रभावी सरासरीने 1,943 धावा केल्या आहेत. तिसर्‍या कसोटीत रोहितने आणखी 57 धावा केल्या तर तो मायदेशात 2000 कसोटी धावा पूर्ण करेल. रोहित शर्मा हा स्फोटक फलंदाजीत माहीर खेळाडू आहे. जगातील स्फोटक सलामीवीरांमध्ये त्याची गणना होते. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या कसोटीत शतक झळकावताच तिन्ही फॉरमॅटमध्ये शतक झळकावणारा तो भारताचा पहिला कर्णधार ठरला. याशिवाय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्याच्या नावावर 523 षटकारांची नोंद झाली आहे.

Back to top button