कोको ग्राफला हरवून इगा स्विआटेक अंतिम फेरीत | पुढारी

कोको ग्राफला हरवून इगा स्विआटेक अंतिम फेरीत

अव्वल स्थानास साजेल अशाच थाटात पोलंडच्या स्विआटेकने कोको ग्राफचा 1 तास 28 मिनिटांत 6-4, 6-2 असा फडशा पाडून महत्त्वाच्या दुबई टेनिस स्पर्धेची अंतिम फेरी गाठली. विजयानंतर अतिशय आनंदी झालेल्या इगा स्विआटेकने क्रीडा समीक्षकांशी संवाद साधला. ती म्हणाली, मी नियोजन केल्यानुसार खेळले. सुरुवात उत्तम झाली. आज माझा खेळ पूर्ण बहरात आहे, याची मला जाणीव होत होती. प्रारंभापासूनचा खेळ पाहता जिंकण्याचा आत्मविश्वास होता. आज जरा खोकल्याचा त्रास होत होता; पण अशा गोष्टींची सवय असते.

गेले काही महिने इगा जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. याबाबत ती म्हणाली, मी प्रचंड मेहनत घेत आहे. सराव आणि अचूक नियोजन हे सर्व जुळून येतेय आणि मी चांगला खेळ करत आहे, याचे समाधान आहे. विजेतेपद पटकावण्यासाठी ती आतुर असल्याचे तिने नमूद केले.

दुसर्‍या उपांत्य फेरीतील लढतीत बार्बोरा क्रेजिकोवाने तिसर्‍या मानांकित जेसिका पेगुला हिला 6-1, 5-7, 6-0 अशी लढत देऊन स्पर्धेबाहेर फेकले. हा निकाल काहीसा धक्कादायक असल्याने स्टेडियममध्ये खळबळ माजली.

संबंधित बातम्या

या स्पर्धेत 2 आणि 3 मानांकन असलेल्या खेळाडूंना पराभूत करून अंतिम फेरीत दाखल झालेली बार्बोरा, सामन्याबाबत बोलताना म्हणाली, आज समोर तगडे आव्हान होते. आव्हान स्वीकारायला मला आवडते. मी उत्तम खेळ करत आहे, असा आत्मविश्वास आहे. प्रत्येक सामन्यागणीक खेळ सुधारत आहे. त्यामुळे आता अंतिम फेरीसाठी आतुर आहे. इगा स्विआटेक आणि बार्बोरा क्रेजिकोवा दोघी अंतिम फेरीत तोडीस तोड खेळ करतील; अर्थातच प्रेक्षकांच्या डोळ्यांचे पारणे फिटेल, यात शंका नाही.

उदय बिनीवाले

Back to top button