MIvsDC IPL 2021: दिल्लीचा रोहित सेनेवर विजय, मुंबई ‘प्लेऑफ’मधून बाहेर | पुढारी

MIvsDC IPL 2021: दिल्लीचा रोहित सेनेवर विजय, मुंबई ‘प्लेऑफ’मधून बाहेर

शारजाह : वृत्तसंस्था : विजयासाठी मुंबई इंडियन्सच्या 130 धावांचा माफक आव्हानाचा पाठलाग करत दिल्ली कॅपिटल्स संघाने आरामात विजय मिळवला. कर्णधार रिषभ पंतची 26 धावांची खेळी संघाच्या विजयात मोलाची कामगिरी ठरली. दिल्लीने सहा गड्यांच्या बदल्यात मुंबईवर विजय मिळवला.

मुंबईच्या विजयाने दिल्लीने गुणतालिकेत आपले तिसरे स्थान कायम राखले आहे. श्रेयस अय्यरने नाबाद 33 धावांची खेळी करत संघाला विजयी मार्गावर नेले. त्याला रविचंद्रन अश्‍विनने नाबाद 20 धावा करत साथ दिली.

तत्पूर्वी, मुंबई इंडियन्स संघाने प्रथम फलंदाजी करत दिल्ली कॅपिटल्ससमोर विजयासाठी 130 धावांचे माफक आव्हान ठेवले. प्लेऑफमधील स्थान टिकवण्यासाठी मुंबईसाठी हा सामना महत्त्वाचा असताना मुंबईच्या फलंदाजांनी पुरती निराशा केली.

फॉर्मात असलेला मुंबईचा कर्णधार रोहित शर्मा याला 7 धावांवर बाद करत आवेश खान याने मुंबईला पहिला धक्‍का दिला. त्यानंतर क्‍विंटन डिकॉक आणि सूर्यकुमार यादव यांनी संयमी फलंदाजी करत संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला.

डिकॉक 19 आणि सूर्यकुमार यादव याने 33 धावा केल्या. त्यानंतर आलेल्या मुंबईच्या फलंदाजांनी मैदानावर केवळ हजेरी लावली. सौरभ तिवारी 15, हार्दिक पंड्या 17 आणि कृणाल पंड्याने 13 धावा करत संघाच्या धावसंख्येत भर घालण्याचा प्रयत्न केला. अन्य फलंदाजांनी मात्र पूर्ण निराशा केली.

आवेश खान आणि अक्षर पटेल यांनी प्रत्येकी 3 विकेटस् घेत दिल्लीकडून चांगली कामगिरी केली. आवेश खान आणि अक्षर पटेलच्या गोलंदाजीसमोर मुंबई इंडियन्सच्या फलंदाजांना फार काही करता आले नाही.

संक्षिप्‍त धावफलक

मुंबई इंडियन्स : (20 षटकांत 8 बाद 129) सूर्यकुमार यादव 33
डिकॉक 19, आवेश खान 3/15, अक्षर पटेल 3/21.
दिल्ली कॅपिटल्स (19.1 षटकांत 6 बाद 132) श्रेयस अय्यर नाबाद 33, रिषभ पंत 26. रविचंद्रन अश्‍विन नाबाद 20.

मुंबई इंडियन्स (प्लेइंग इलेव्हन): रोहित शर्मा (c), क्विंटन डी कॉक (wk), सूर्यकुमार यादव, सौरभ तिवारी, हार्दिक पंड्या, किरॉन पोलार्ड, कृणाल पंड्या, नॅथन कुल्टर-नाईल, जयंत यादव, जसप्रीत बुमराह, ट्रेंट बोल्ट

दिल्ली कॅपिटल्स (प्लेइंग इलेव्हन): पृथ्वी शॉ, शिखर धवन, स्टीव्हन स्मिथ, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत (w/c), शिमरॉन हेटमायर, अक्षर पटेल, रविचंद्रन अश्विन, कागिसो रबाडा, आवेश खान, एनरिक नॉर्टजे

Back to top button