

गोल्ट कास्ट; वृत्तसंस्था : भारत आणि ऑस्ट्रेलिया महिला संघात सुरू असलेल्या एकमेव दिवस-रात्र कसोटी सामन्यात शनिवारी तिसर्या दिवशी ऑस्ट्रेलिया संघ 234 धावांनी पिछाडीवर आहे. तिसर्या दिवशी ऑस्ट्रेलिया संघाने 4 बाद 143 धावांपर्यंत मजल मारली आहे.
सामन्याच्या दुसर्या दिवशी भारताच्या स्मृती मानधनाने ऐतिहासिक शतक करत दिवस गाजवला. दुसर्या दिवशी भारतीय संघाने 5 बाद 275 धावा केल्या होत्या.
तिसर्या दिवशी फलंदाजीस उतरलेल्या भारतीय संघाने 8 बाद 377 धावांवर डाव घोषित केला आणि ऑस्ट्रेलिया संघासमोर मजबूत आव्हान ठेवले. पूजा शर्मा हिने दमदार अर्धशतक झळकावले.
तिने 167 चेंडूंचा सामना करत 66 धावा केल्या, त्यामध्ये तिने 8 चौकार लगावले. त्यानंतर आलेल्या तानिया भाटिया हिनेही 22 धावा करत भारताच्या धावसंख्येत भर घातली. ऑस्ट्रेलियाकडून इलिस पेरी आणि मोलिनिक्स यांनी प्रत्येकी दोन विकेटस् घेतल्या.
त्यानंतर ऑस्ट्रेलियन संघ मैदानात उतरला. सलामीवीर अॅलिसा हेली आणि बेथ मूनी फलंदाजीस उतरल्या. मूनी हिला चार धावांवर त्रिफळाचित करत भारताची वेगवान गोलंदाज झुलन गोस्वामी हिने ऑस्ट्रेलियाला पहिला धक्का दिला.
त्यानंतर आलेल्या मेग लन्निगने आणखी पडझड होऊ न देता बचावात्मक फलंदाजी केली. अॅलिसा हेलीला 29 धावांवर बाद करत झुलनने दुसरी विकेट घेतली. त्यानंतर तहिला मॅक्रथने 26 धावांची उपयुक्त खेळी केली.
आजच्या दिवसाचा खेळ संपला त्यावेळी ऑस्ट्रेलियाने 4 विकेटस्च्या मोबदल्यात 143 धावा केल्या आहेत. इलिस पेरी 27, तर गार्डनर 13 धावांवर खेळत आहे. भारताकडून झुलन गोस्वामी आणि पूजा वस्त्राकर यांनी प्रत्येकी दोन विकेटस् घेतल्या.