अत्यंत चुरशीच्या आणि अटीतटीच्या सामन्यात पंजाबने कोलकातावर (Kolkata vs Punjab) शेवटच्या षटकात षटकार ठोकून थाटात विजय नोंदवला. ५ गडी राखून कोलकाता विरुद्धचा हा सामना जिंकत पंजाबने अंक तालिकेत मुंबईला देखिल मागे टाकले. या विजयाने पुन्हा एकदा चौथ्या क्रमांकासाठीची चुरस पुन्हा वाढली आहे. तसेच अजूनही पंजाबला प्ले ऑफ मध्ये जाण्याची संधी निर्माण झाली आहे. या विजयाने मुंबई समोरील आव्हान देखिल वाढले आहे. कोलकाता बरोबर पंजाब देखिल प्ले ऑफ साठी पुन्हा सज्ज झाला आहे.
आयपीएलच्या १४ व्या पर्वातील ४५ वा सामना कोलकाता नाईट रायडर्स आणि पंजाब किंग्स (Kolkata vs Punjab) या संघामध्ये दुबईच्या आंतरराष्ट्रीय मैदानावर खेळवला गेला. पंजाबने कोलकाता विरुद्ध नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. तर पंजाबचे निमंत्रण स्विकारुन कोलकाताने पंजाबला १६६ धावांचे आव्हान दिले. या आव्हानाचा पाठलाग करताना पंजाबने सावध सुरुवात केली.
सलामीवीर कर्णधार केएल राहूल आणि मयंक अग्रवाल या जोडीने पहिल्या षटकात ७, दुसऱ्या षटकात १३ अशा सावध धावा करत ५ व्या षटकापर्यंत नाबाद ३३ धावा केल्या. यानंतर मयंक अग्रवाल याने आक्रमक भूमिका घेत चौफेर फटकेबाजी करण्यास सुरुवात केली. केएल राहूलने मयंकला संयमी साथ दिली. या जोडीने ७ व्या षटकात पंजाबला पंन्नाशीच्या पार पोहचवले. आठव्या षटकात ८ व्या ६३ धावा बोर्डवर लावल्या. नवव्या षटकातील पाचव्या चेंडूवर गोलंदाज वरुन चक्रवर्ती याने मयंक अग्रवाल याला झेल बाद केले. मयंकने आपल्या आक्रमक खेळीत २७ चेंडूत ४० धावांची खेळी केली. त्याने ३ चौकार आणि ३ षटकारांची आतषबाजी केली. राहूल मयंकच्या सलामी जोडीने ७० धावांची भागिदारी केली.
मयंक बाद झाल्यावर केलएल राहूलने डावाची सुत्रे हाती घेतली. त्याला साथ देण्यासाठी निकोलस पुरन आला. निकोलसने येताच मोठे फटके मारायला सुरुवात केली. यात त्याने एक षटकार ठोकला पण दुसऱ्याच चेंडूवर तो झेल बाद झाला. पुरनला ११ व्या षटकातील ४ थ्या चेंडूवर पुन्हा वरुन चक्रवर्तीने झेलबाद केले. पुरनने ७ चेंडूत १२ धावा केल्या. यानंतर राहूला साथ देण्यासाठी एडेन मार्करम आला. मार्करम याने राहूलला चांगली साथ दिली. या जोडीने १३ व्या षटकात संघाला शंभरी पार पोहचवले.
पंधराव्या षटकातील ४ चेंडूवर षटकार खेचत कर्णधार केएल राहूल याने थाटात अर्धशतक पूर्ण केले. यानंतर १६ व्या षटकातील ४ चेंडूवर गोलंदाज सुनील नारायण याने एडेन मार्करम याला झेलबाद केले. मार्करम याने १६ चेंडूत १८ धावा केल्या. राहूल आणि मार्करम यांच्या जोडीने ४५ धावांची भागिदारी केली. मार्करम यांच्या नंतर दीपक हुड्डा आला पण तो फारचा खेळपट्टीवर तग धरु शकला नाही. मोठा फटका मारण्याचा नादात तो शिवम मावीच्या गोलंदाजीवर झेलबाद झाला. हुड्डा याने चार चेंडूत फक्त ३ धावा केल्या.
हुड्डा नंतर फलंदाजीस शाहरुख खान आला व त्याने केएल राहूलला शेवटपर्यंत साथ दिली. शाहरुख खानने येता क्षणी फटकेबाजी सुरु केली. त्याने पहिल्या चेंडूवर दोन तर दुसऱ्या चेंडूवर शिवम मावीच्या गोलंदाजीवर जोरदार षटकार ठोकला. पंजाबच्या संघाने १७ षटकात ४ बाद १४२ धावांपर्यंत मजल मारली. त्यांनतर १८ व्या षटकानंतर १५१ धावा बनवल्या. आता पंजाबला १२ चेंडूत १५ धावांची आवश्यकता होती.
१९ व्या षटकात शिवम मावीच्या पहिल्या चेंडूवर केएल राहूल याने चौकार मारला. दुसरा चेंडू डॉट गेला. तर तिसऱ्या चेंडूवर राहूलने मोठा फटका मारला व राहूल त्रिपाठीने सीमा रेषेजवळ अफलातून झेल पकडला. पण, चेंडूचा जमिनीला स्पर्श झाल्याच्या कारणाने तिसऱ्या पंचांनी केएल राहूलला नाबाद ठरवले. यामुळे कोलकाताकडे झुकणारा सामना पुन्हा पंजाबकडे गेला. समालोचकांनी या निर्णयावर शंका व्यक्त केली. सामन्यपणे हा झेल योग्य ठरविणे आवश्यक होते पण तिसऱ्या पंचांनी वेगळा निर्णय दिला. या षटकातील शेवटच्या चेंडूवर पुन्हा केएल राहूलने चौकार ठोकत सामना पूर्णपणे पंजाबकडे झुकवला. पंजाबने १९ षटकात ४ बाद १६१ धावा केल्या. आता जिंकण्यासाठी ६ चेंडूत ५ धावांची आवश्यकता होती.
शेवटचे षटक व्यंकटेश अय्यर टाकण्यासाठी आला. पहिल्या चेंडूवर शाहरुख खान याने १ धाव घेतली. दुसऱ्या चेंडूवर मोठा फटका मारायला जावून केएल राहूल सीमा रेषेजवळ शीवम मावीच्या हाती झेल देऊन बाद झाला. राहूलने जबरदस्त कर्णधाराची खेळी केली. त्याने संपूर्ण सामन्यात आपले वर्चस्व राखले तसेच पुन्हा एकदा आपण चांगल्या लयीत असल्याचे दाखवून दिले. केएल राहूल याने ५५ चेंडूत ६७ धावा केल्या. या खेळीत त्याने ४ चौकार व २ षटकार ठोकले. खऱ्या अर्थाने एक विजयी खेळी राहूलने खेळली.
राहूल बाद झाल्यामुळे सामन्यात पुन्हा रंगत आली होती. पण, व्यंकटेशच्या तिसऱ्या चेंडूवर शाहरुखने चेंडू जोरदार फटका मारला चेंडू सिमारेषेजवळ गेला. राहूल त्रिपाठी जवळ झेल घेण्याची संधी होती पण चेंडू हाताला लागून सीमारेषेच्या बाहेर गेला आणि तो षटकार ठरला. या षटकाराच्या जोरावर पंजाबने कोलकाता नाईट रायडर्सला (Kolkata vs Punjab) ५ गडी राखून मात दिली.
या विजयाने पंजाब किंग्ज पाचव्या स्थानी गेली. तर मुंबई इंडियन्स पुन्हा साहव्यास्थानी घसरली. या विजयाने पंजाबचा आत्मविश्वास पुन्हा वाढला आहे. आता पुढील सर्व सामने पंजाबने जिंकले तर तिला प्ले ऑफ मध्ये जाण्याची संधी आहे. शिवाय कोलकाता नाईट रायडर्स हरली असली तरी ती चौथ्या स्थानी विराजमान आहे. कोलकाता आणि पंजाबने १२ सामन्यात ५ विजय नोंदवून १० अंकासह अनुक्रमे चौथ्या व पाचव्या स्थानी आहेत. दोन्ही संघाना अजूनही प्ले ऑफ मध्ये जाण्याची संधी आहे. तर मुंबईकडे ही प्ले ऑफमध्ये जाण्याची संधी आहे. पण या सर्वांना उर्वरीत सर्व सामने जिंकावे लागणार आहे. मुंबईने ११ सामन्यात ५ विजय नोंदवून १० अंकासह सहाव्या स्थानी आहे. आजच्या पंजाबच्या विजयाने मुंबईचा रस्ता अजून खडतर बनविला आहे. तसेच कोलकाता समोर देखिल आव्हान उभे केले आहे.
तत्पुर्वी, पंजाबने कोलकाता (Kolkata vs Punjab) विरुद्ध नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्यातचा निर्णय घेतला. पंजाबचे निमंत्रण स्विकारुन कोलकात्याचे शुभमन गील आणि व्यकटेश अय्यर ही सलामी जोडी मैदानात उतरली. पहिल्या षटकात कोलकाताने १० धावा करुन दमदार सुरुवात केली. दुसऱ्या षटकानंतर कोलकाताने १७ धावा केल्या. पण तिसऱ्या षटकात अर्शदीप सिंग याने दुसऱ्याच चेंडूवर शुभमन गील याचा त्रिफळा उडविला. शुभमन गील याने ७ चेंडूत ७ धावा केल्या.
पहिला बळी लवकर गेल्यावर सलामीवीर व्यंकटेश अय्यर आणि राहूल त्रिपाठी यांनी सावध सुरुवात केली. खेळपट्टीवर जम बसल्यानंतर या जोडीने पंजाबच्या गोलंदाजांचा समाचार घेण्यास सुरुवात केली. या जोडीने ७ व्या षटकात कोलकात्याला ५० धावांवर पोहचवले. यानंतर ही या जोडीने चांगल्या धावा बनविण्याचे सत्र चालू ठेवले. १२ षटकातील ३ चेंडूवर राहूल त्रिपाठी रवी बिश्नोईच्या चेंडूवर झेल बाद झाला. त्रिपाठीने याने २६ चेंडूत ३४ धावा बनविल्या यात त्याने ३ चौकार आणि १ षटकार लगावला. या जोडीने ७२ धावांची भागिदारी रचली.
यानंतर १३ षटकात कोलकाताने १०० धावांचा टप्पा पार केला. व्यंकटेश अय्यर याने आपल्या फाॅर्मला साजेशी खेळी चालूच ठेवली. त्याने १३ षटकातील पहिल्या चेंडूवर आपले अर्धशतक पूर्ण केले. त्यानंतर १५ षटकातील ४ चेंडूवर रवी बिश्नोई याने व्यकटेश याला झेलबाद केले. व्यंकटेश अय्यर याने ४९ चेंडूत ६७ धावा बनवल्या. या खेळीत त्याने ९ चौकार व १ षटकार ठोकला.
व्यंकटेश नंतर नितीश राणा याने खेळाची सूत्रे हाती घेतली. व्यंकटेश नंतर आलेला कर्णधार ईयॉन मॉर्गन याने फक्त हजेरी लावण्याचे काम केले. तो फक्त २ धावा करुन बाद झाला. मॉर्गन बाद झाल्यावर राणा याने कोलकाताच्या गोलंदाजीचा चांगला समाचार घेतला. पण, अठराव्या षटकात अर्शदीप सिंग याच्या गोलंदाजीवर तो झेल बाद झाला. त्याने फक्त १८ चेंडूत ३१ धावा केल्या या खेळीत त्याने २ चौक़ार आणि २ षटकारांची आतषबाजी केली.
राणा बाद झाला तेव्हा कोलकाताने १८ षटकात ५ बाद १५१ धावा केल्या होत्या. राणा नंतर दिनेश कार्तिकने थोडासा प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. तो २० व्या षटकातील शेवटच्या चेंडूवर बाद झाला. तो पर्यंत उर्वरीत दोन षटकात कोलकाताने १४ धावा बनविल्या. कार्तिकने ११ चेंडूत ११ धावा केल्या. तर टीम सेइर्फ्ट याने ४ चेंडूत २ धावा करुन बाद झाला. तर सुनील नारायण ३ चेंडूत ३ धावा करुन नाबाद राहिला. अखेर २० षटकानंतर कोलकाताने १६५ धावांपर्यंत मजल मारली.
पंजाबच्या गोलंदाजांनी कोलकाताच्या फलंदाजांवर शेवटी शेवटी चांगले लगाम लावले. कारण व्यंकटेश अय्यर, राहूल त्रिपाठी आणि नितीश राणा खेळत असताना कोलकाता १८० धावांच्या पुढे मजल मारेल असे वाटत होते. पण, पंजाबच्या गोलंदाजांनी कोलकाताला अवघ्या १६५ धावांवर रोखले.
या खेळीत पंजाबच्या रवी बिश्नोई आणि अर्शदीप सिंग याने चांगली गोलंदाजी केली. रवी बिश्नोई याने ४ षटकात २२ धावा देत २ बळी घेतले. तर अर्शदीप सिंग याने ४ षटकात ३२ धावा देत ३ बळी घेतले. या दोघांना महोम्मद शामीने चांगली साथ देत ४ षटकात २३ धावा देत १ बळी मिळवला.