Harmanpreet Kaur : ‘स्ट्राइक रोटेट’वरून हरमनप्रीत कौर चिंतेत, म्हणाली… | पुढारी

Harmanpreet Kaur : ‘स्ट्राइक रोटेट’वरून हरमनप्रीत कौर चिंतेत, म्हणाली...

पुढारी ऑनलाईन डेस्क : स्ट्राइक रोटेट करण्यात भारतीय फलंदाजांची असमर्थता हे ‘चिंतेचे’ लक्षण असल्याचे खुद्द कर्णधार हरमनप्रीत कौरने (Harmanpreet Kaur) कबूल केले आहे. भारताने सोमवारी डकवर्थ लुईस नियमानुसार आयर्लंडचा पाच धावांनी पराभव केला आणि महिला टी-20 विश्वचषक स्पर्धेची उपांत्य फेरी गाठली. या विजयानंतर हरमनने माध्यमांसमोर आपले मत व्यक्त केले.

स्ट्राईक रोटेट करणे ही भारतीय संघाची मोठी समस्या आहे. डिसेंबरमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेदरम्यान आणि टी-20 विश्वचषकापूर्वी तिरंगी मालिकेत संघाला स्ट्राइक रोटेट करताना अडचणींचा सामना करावा लागला. सध्या सुरू असलेल्या टी-20 विश्वचषक स्पर्धेत भारताने इंग्लंड आणि आयर्लंडविरुद्ध ग्रुप स्टेज सामन्यांत अनुक्रमे 51 आणि 41 चेंडू डॉट घालवले.

सामन्यानंतर पत्रकार परिषदेत हरमनप्रीत (Harmanpreet Kaur) म्हणाली, ‘उपांत्य फेरीत भारताला पाच वेळच्या विश्वविजेत्या ऑस्ट्रेलियाशी सामना करावा लागणार आहे. अशातच चेंडू डॉट घालवण्याची समस्या आम्हाला त्रासदायक आहे. पुढील सामन्यात आम्हाला यात सुधारणा करणे आवश्यक आहे. इंग्लंडविरुद्ध आम्ही ब-याच चेंडूवर धावा न करता डॉट घालवले. ही समस्या कशी सोडवायची यावर संघ व्यवस्थापन चर्चा करत आहे,’ असे हरमनप्रीत स्पष्ट केले.

संबंधित बातम्या

हरमनप्रीत (Harmanpreet Kaur) पुढे म्हणाली, ‘कधीकधी जेव्हा इतर संघ चांगली गोलंदाजी करत असतो तेव्हा या विकेट्सवर 150 ही स्पर्धात्मक धावसंख्या असते. आयर्लंडविरुद्ध भारतीय फलंदाज धावगती वाढवण्यात अपयशी ठरत होते. एकाक्षणी भारताला प्रति षटकात सातच्या सरासरीनेही धावा करण्यात अडचण येत होती. पण चार जीवदान मिळालेल्या स्मृती मानधानाने डावाच्या दुसऱ्या टप्प्यात काही आकर्षक शॉट्स खेळून धावगती वाढवली. ज्याचा फायदा संघाला झाला.’

‘सामना जिंकल्यानंतर समाधान वाटणे सहाजिकच आहे. पण मला वाटते की काही क्षेत्रांमध्ये, विशेषत: फलंदाजीत आम्हाला पुढील सामन्यात कसे खेळायचे आहे याबद्दल चर्चा करणे आवश्यक आहे,’ असाही तिने सल्ला दिला.

Back to top button