

पुढारी ऑनलाईन डेस्क : टीम इंडियाने महिला टी-20 विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत धडक मारली आहे. पोर्ट एलिझाबेथ येथील सेंट जॉर्ज पार्कवर सोमवारी (दि. 20) रात्री झालेल्या सामन्यात भारतीय संघाने डकवर्थ आणि लुईस नियमाच्या आधारे आयर्लंडचा पाच धावांनी पराभव केला. भारतीय संघाने आयर्लंडला विजयासाठी 156 धावांचे लक्ष्य दिले होते. मात्र आयर्लंडच्या फलंदाजीदरम्यान 8.2 षटकांनंतरच पावसाला सुरुवात झाली. त्यामुळे सामना थांबवावा लागला. आयर्लंडने दोन गड्यांच्या मोबदल्यात 54 धावा केल्या होत्या आणि डीएलएस नियमानुसार ते पाच धावांनी पिछाडीवर होते.
जोरदार पाऊस झाल्याने 8.2 षटकांनंतर पुढे खेळ होऊ शकला नाही. अशा स्थितीत टीम इंडियाला विजयी घोषित करण्यात आले. भारतीय संघाच्या विजयात स्मृती मंधानाने महत्त्वाची भूमिका बजावली. तिने वादळी खेळी करून 56 चेंडूत 87 धावा तडकावल्या. या खेळीत तिने नऊ चौकार आणि तीन षटकार ठोकले. आता उपांत्य फेरीत भारताचा सामना ऑस्ट्रेलियाशी होण्याची शक्यता आहे.
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना स्मृती मानधना आणि शेफाली वर्मा (24 धावा) यांनी टीम इंडियाला धमाकेदार सुरुवात करून दिली. दोघींनी पहिल्या 10 षटकांत 62 धावा जोडल्या. यानंतर शेफालीबाद झाली. तिला कर्णधार डेलेनीला हिने पॅव्हेलियनमध्ये पाठवले.
शेफाली बाद झाल्यानंतर कर्णधार हरमनप्रीत कौर (13) क्रीझवर आली. हरमनप्रीत जिथे धावा काढण्यासाठी धडपडत होती, तिथे स्मृती चेंडू सीमारेषेच्या पलीकडे फटकावत होती. तिने लेगस्पिनर कारा मरेला षटकार खेचून अर्धशतक पूर्ण केले. यानंतर आक्रमक भूमिका घेत तिने जॉर्जिना डेम्पसीविरुद्ध सलग दोन चौकार मारले आणि षटकारही ठोकला.
त्यानंतर डेनेलीने हरमनप्रीत आणि रिचा घोष (0) यांना लागोपाठ चेंडूंवर बाद केले. आयर्लंडने सामन्यात पुनरागमन केले. याचा स्मृतीवर काहीही परिणाम झाला नाही. तिने केलीला दोन चौकार आणि त्यानंतर डेनालीच्या षटकात एक चौकार आणि एक षटकार मारला. आणखी एक मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात तिला प्रेंडरगास्टने बाद केले. पुढच्याच चेंडूवर दीप्ती शर्मा (0)ही पॅव्हेलियनमध्ये परतली. जेमिमा रॉड्रिग्जने अखेरच्या षटकात दोन चौकार मारून संघाची धावसंख्या सहा विकेट्सवर 155 पर्यंत पोहचवली. शेवटच्या चेंडूवर बाद होण्यापूर्वी जेमिमाने 12 चेंडूत तीन चौकारांच्या मदतीने 19 धावा केल्या.
स्मृती मानधानाने आपल्या टी-20 आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील सर्वोत्तम धावसंख्या केली. यापूर्वी तिची सर्वोत्तम धावसंख्या 86 धावा होती. स्मृतीने सर्वाधिक अर्धशतके झळकावण्याच्या बाबतीत वेस्ट इंडिजच्या सारा टेलरला (21) मागे टाकले. महिला टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक अर्धशतक ठोकण्याचा विक्रम सुजी बेट्स (25) हिच्या नावावर आहे.