IND vs AUS : वॉर्नर, हेजलवूड मालिकेतून बाहेर | पुढारी

IND vs AUS : वॉर्नर, हेजलवूड मालिकेतून बाहेर

इंदूर, वृत्तसंस्था : टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात बॉर्डर-गावसकर ट्रॉफी कसोटी मालिकेतील तिसर्‍या कसोटीपूर्वी ऑस्ट्रेलियन संघाला दोन मोठे झटके बसले आहेत. कर्णधार पॅट कमिन्स कौटुंबिक कारणास्तव मायदेशी परतणार असून, स्टार फलंदाज डेव्हिड वॉर्नर आणि वेगवान गोलंदाज जोश हेजलवूड हे दोघेही दुखापतीमुळे मालिकेतून बाहेर पडले आहेत. दोन्ही खेळाडू कर्णधार पॅट कमिन्ससोबत ऑस्ट्रेलियाला रवाना होतील. कमिन्स तिसर्‍या कसोटीपूर्वी भारतात परतेल, असे संघाकडून सांगण्यात आले आहे.

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसरी कसोटी 1 मार्चपासून सुरू होणार आहे. कुटुंबातील सदस्य गंभीर आजारी असल्याने कमिन्स ऑस्ट्रेलियाला जाणार आहे. तो तिसर्‍या कसोटीपूर्वी परतला नाही, तर स्टीव्ह स्मिथकडे संघाचे नेतृत्व दिले जाईल.

डेव्हिड वॉर्नर आणि जोश हेजलवूड दुखापतीमुळे संपूर्ण कसोटी मालिकेतून बाहेर पडले आहेत. वॉर्नर दुसर्‍या कसोटीसाठी संघात होता, त्यावेळीस पहिल्या डावात मोहम्मद सिराजच्या चेंडूवर त्याच्या डोक्याला आणि कोपराला मार लागला होता. त्यामुळे त्याच्या जागी मॅट रेनशॉला खेळवण्यात आले होते. ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज जोश हेजलवूडने या मालिकेत एकही सामना खेळला नाही. मालिकेपूर्वीच तो जखमी झाला होता.

बॉर्डर-गावसकर ट्रॉफीच्या पहिल्या दोन सामन्यांत ऑस्ट्रेलिया संघाला भारताविरुद्ध पराभवाचा सामना करावा लागला आहे. पहिली कसोटी एक डाव आणि 132 धावांनी गमावली आणि दुसरी कसोटी 6 विकेटस्ने गमावली. यासोबतच संघातील स्टार खेळाडूंच्या दुखापतीमुळे संघालाही मोठा फटका बसत आहे.

Back to top button