Ranji Trophy Final : उनाडकटने बंगालला लोळवले, सौराष्ट्रने रणजी ट्रॉफीवर पुन्हा एकदा नाव कोरले | पुढारी

Ranji Trophy Final : उनाडकटने बंगालला लोळवले, सौराष्ट्रने रणजी ट्रॉफीवर पुन्हा एकदा नाव कोरले

पुढारी ऑनलाईन डेस्क : रणजी ट्रॉफी २०२३ च्या अंतिम सामन्यात सौराष्ट्रने बंगालचा ९ विकेट्सने धुव्वा उडवला. सौराष्ट्रचा संघ मागील ३ हंगामामध्ये दुसऱ्यांदा चॅम्पियन बनला आहे. अंतिम सामन्यात जयदेव उनाडकटने दमदार कामगिरी करत सौराष्ट्रला विजय मिळवून दिला. अंतिम सामन्यात बंगालने पहिल्या डावात १७४ धावा केल्या होत्या. याच्या प्रत्युत्तरात सौराष्ट्रने ४०४ धावा केल्या. तर बंगालचा संघ दुसऱ्या डावात केवळ २४१ धावाच करु शकला. यानंतर सौराष्ट्रने दुसऱ्या डावात १४ धावा करुन अंतिम सामन्यात विजय मिळवला. सौराष्ट्रचा कर्णधार उनाडकटने पटकावलेल्या ९ विकेट्सच्या जोरावर सौराष्ट्रने हा विजय मिळवला. जयदेव उनाडकटच्या नेतृत्वात सौराष्ट्रने दुसऱ्यांदा रणजी ट्रॉफी जिंकली आहे. (Ranji Trophy Final)

सौराष्ट्रचा कर्णधार जयदेव उनाडकटने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेत चांगली सुरुवात केली. चेतन सकारिया आणि उनाडकटने दोघांनी बंगालला सुरुवातीचे झटके दिले. यानंतर बंगालच्या संघाच्या सातत्याने विकेट्स पडत राहिल्या. बंगालने ६५ धावांवर ६ विकेट्स गमावल्या होत्या. यानंतर शाहबाज अहमद आणि अभिषेक पोरेलने १०१ धावांची भागिदारी करत डाव सावरला. बंगालच्या तीन फलंदाजांना भोपळाही फोडता आला नाही. बंगालने पहिल्या डावात १७४ धावा केल्या. सौराष्ट्रकडून जयदेव उनाडकट आणि चेतन सकारियाने प्रत्येकी ३ विकेट्स काढल्या. तर चिराग जनी आणि धर्मेंद सिंह जडेजाने प्रत्येकी २ विकेट पटकावल्या.

बंगालने १७४ धावा केल्यानंतर सौराष्ट्रनेही दमदारा फलंदाजी केली. हार्विक देसाई, जॅक्सन वसवदा आणि चिराग जनीने अर्धशतक झळकावले. कर्णधार उनाडकट, जय गोहिल आणि चेतन सकारिया १० चा आकडाही पार करु शकले नाहीत. सांघिक फलंदाजीच्या जोरावर सौराष्ट्रने ४०४ धावा केल्या आणि पहिल्या डावानंतर निर्णायक आघाडी घेतली. (Ranji Trophy Final)

दुसऱ्या डावात बंगालने २४१ धावा केल्या. अनुस्तुप मजूमदार आणि कर्णधार मनोज तिवारीने अर्धशतक झळकावले. मात्र, तरिही बंगालला सामन्यात पुनरागमन करता आले नाही. जयदेव उनाडकट आणि चेतन सकारियाने सातत्याने विकेट्स पटकावल्याने बंगालला मोठी धावसंख्या उभारता आली नाही. Ranji Trophy Final) चौथ्या दिवशी सौराष्ट्रसमोर केवळ १४ धावांचे आव्हान होते. सौराष्ट्रने १ विकेट गमावत बंगालच्या १४ धावांच्या आव्हानाचा सहजरित्या पाठलाग केला.

हेही वाचलंत का?

Back to top button