IPL 2023 Schedule Announced : IPL चे वेळापत्रक जाहीर! धोनी विरुद्ध पंड्यामध्ये पहिला सामना रंगणार | पुढारी

IPL 2023 Schedule Announced : IPL चे वेळापत्रक जाहीर! धोनी विरुद्ध पंड्यामध्ये पहिला सामना रंगणार

पुढारी ऑनलाईन डेस्क : IPL 2023 Schedule Announced : इंडियन प्रीमियर लीगच्या 16 व्या हंगामाचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. लीगचा 16वा हंगाम 31 मार्चपासून सुरू होणार आहे. पहिला सामना गुजरात टायटन्स म्हणजेच हार्दिक पांड्याचा संघ आणि एमएस धोनीच्या नेतृत्वाखालील सीएसके यांच्यात होणार आहे. हा सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला जाणार आहे.

स्पर्धेची 16 वी आवृत्ती 31 मार्चपासून सुरू होईल आणि शेवटचा साखळी सामना 21 मे रोजी खेळवला जाईल. तथापि, बीसीसीआयने अद्याप आयपीएल 2023 च्या प्लेऑफ सामन्यांच्या तारखा उघड केलेल्या नाहीत. टीम इंडियाचे खेळाडू आणि आयपीएल खेळणाऱ्या ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंना सुमारे आठ दिवसांचा ब्रेक मिळेल आणि त्यानंतर आयपीएल सुरू होईल.

आयपीएल 2023 च्या हंगामात 10 संघांमध्ये एकूण 70 साखळी सामने खेळवले जाणार आहेत. या दरम्यान चाहत्यांना 18 डबल हेडर सामने पाहायला मिळतील.

गतवेळचा उपविजेता राजस्थानचा सामना 2 एप्रिलला

IPL 2022 मध्ये गुजरात टायटन्सने विजेतेपद पटकावले. हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखाली जीटी संघाने अंतिम सामन्यात संजू सॅमसनच्या राजस्थान रॉयल्सचा दणदणीत पराभव केला. यावेळी फक्त गुजरातच स्पर्धेतील सलामीचा सामना खेळणार असून राजस्थानचा संघ पहिला सामना 2 एप्रिलला खेळणार आहे. ते सनरायझर्स हैदराबादला सलामी सामन्यात भिडतील.

IPL 2023 च्या हंगामातील पहिले 5 सामने

चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध गुजरात टायटन्स, 31 मार्च
पंजाब किंग्स विरुद्ध कोलकाता नाइट रायडर्स, 1 एप्रिल
लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स, 1 एप्रिल
सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध राजस्थान रॉयल्स, 2 एप्रिल
रॉयल चॅलेंजर्स बंगलोर विरुद्ध मुंबई इंडियन्स, 2 एप्रिल

सर्व 10 संघ दोन गटात विभागले गेले आहेत. ग्रुप स्टेजमध्ये प्रत्येक संघ 14-14 सामने खेळेल. या दरम्यान, प्रत्येक संघाला त्यांच्या घरी 7 सामने खेळावे लागतील, तर उर्वरित 7 सामने विरोधी संघाच्या घरी खेळावे लागतील. अशा प्रकारे प्रत्येक संघ 7 होम आणि 7 अवे सामने खेळेल.

आयपीएल 2023 चे गट

गट-अ : मुंबई इंडियन्स, कोलकाता नाइट रायडर्स, राजस्थान रॉयल्स, दिल्ली कॅपिटल्स, लखनौ सुपर जायंट्स.

गट-ब : चेन्नई सुपर किंग्ज, पंजाब किंग्ज, सनरायझर्स हैदराबाद, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, गुजरात टायटन्स.

Back to top button