पुढारी ऑनलाईन डेस्क : IND vs AUS 2nd Test : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सध्या सुरू असलेल्या चार सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरा सामना दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर खेळवला जात आहे. टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या ऑस्ट्रेलियाचा संघ पहिल्या दिवशी पहिल्या डावात 263 धावांवर गारद झाला. प्रत्युत्तरात भारताने पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत विकेट न गमावता 21 धावा केल्या आहेत. रोहित शर्मा (13) आणि केएल राहुल (4) क्रिजवर खेळत आहेत.
ऑस्ट्रेलियाकडून सलामीवीर उस्मान ख्वाजाने 81 धावा केल्या. पीटर हँड्सकॉम्ब 72 धावा करून नाबाद राहिला. भारताकडून मोहम्मद शमीने 4 बळी घेतले. रविचंद्रन अश्विन आणि रवींद्र जडेजाने प्रत्येकी तीन बळी मिळवले. चहापानानंतर पहिल्या दिवसाच्या शेवटच्या सत्रात ऑस्ट्रेलियाने 64 धावा जोडल्या आणि चार विकेट गमावल्या.
भारताला पहिले यश मोहम्मद शमीने 16व्या षटकात डेव्हिड वॉर्नरला बाद करून दिले. वॉर्नर 15 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. ऑस्ट्रेलियाने पहिली विकेट 50 धावांवर गमावली. 23व्या षटकात अश्विनला भारताची दुसरी विकेट मिळाली, त्याने 18 च्या वैयक्तिक स्कोअरवर लबुशेनला एलबीडब्ल्यू आऊट केले. ऑस्ट्रेलियाने 28 व्या षटकात 100 धावा पूर्ण केल्या. 32व्या षटकात शमीने हेडला बाद करत भारताला चौथी विकेट मिळवून दिली. ऑस्ट्रेलियाचा निम्मा संघ 167 धावांवर पॅव्हेलियनमध्ये परतला. ख्वाजाला 81 धावांच्या वैयक्तिक धावसंख्येवर जडेजाने बाद केले. केएल राहुलने एका हाताने ख्वाजाचा अप्रतिम झेल घेतला. पुढच्याच षटकात अश्विनने कॅरीला आपला तिसरा बळी बनवला. चहापानानंतर जडेजाने पॅट कमिन्स आणि मर्फीची शिकार केली. शमीने शेवटच्या दोन विकेट घेत ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव संपुष्टात आणला.
ऑस्ट्रेलियाच्या 263 धावांच्या प्रत्युत्तरात भारताने संयमी सुरुवात केली. रोहित शर्मा आणि लोकेश राहुल या सलामी जोडीने पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत 9 षटकात 21 धावा केल्या. या दरम्यान, रोहित शर्माच्या विरोधात कांगारूंनी सीली पॉईंटवर झेल पकडल्याचे जोरदार अपील केले. त्यावर मैदानावरील पंचांनी आऊटचा निर्णय दिला, परंतु रोहितने विलंब न लावता रिव्ह्यू घेतला. रिप्लेमध्ये रोहित बाद नसल्याचे स्पष्ट दिसले. चेंडू बॅटला न लागता पॅडवर आदळून सीली पॉईंटवरील खेळाडूच्या हाती गेला. यानंतर मैदानी पंचांना आपला निर्णय बदलावा लागला.