Hyderabad vs Chennai : चेन्नईच्या विजयाला धोनीचा फिनिशिंग टच

Hyderabad vs Chennai : चेन्नईच्या विजयाला धोनीचा फिनिशिंग टच
Published on
Updated on

हैदराबाद सनरायझर्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज ( Hyderabad vs Chennai ) यांच्यातील सामना सीएसकेने 6 गडी राखून जिंकला. हैदराबादचे 135 धावांचे आव्हान चेन्नईने शेवटच्या षटकापर्यंत झुंज देत पार केले. सीएसकेचा कर्णधार महेंद्र सिंह धोनीने आपल्या जुन्या फिनिशिंग टचने संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. धोनीने 3 चेंडूत 2 धावांची गरज असताना षटकार ठोकला.

हैदराबाद सनरायझर्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज ( Hyderabad vs Chennai ) यांच्यातील सामन्यात हैदराबादने ठेवलेल्या 135 धावांचे आव्हान पार करताना सलामीवीर ऋतुराज गायकवाड आणि फाफ ड्युप्लेसिस यांनी सावध सुरुवात केली. या दोघांनी 10 षटकात 75 धावांची सलामी दिली.

होल्डरमुळे सीएसकेचे धाबे दणाणले ( Hyderabad vs Chennai )

अखेर होल्डरने 45 धावांवर खेळत असलेल्या गायकवाडला बाद करुन ही जोडी फोडली. त्यानंतर ड्युप्लेसिस आणि मोईन अलीने सीएसकेला शंभरी पार करुन दिली. मात्र राशिद खानने मोईन अलीला 17 धावांवर बाद केले. यानंतर सीएसकेची धावगती थोडी मंदावली.

आता ड्युप्लेसिसला साथ देण्यासाठी सुरेश रैना क्रिजवर आला होता. मात्र होल्डरने त्याला अवघ्या 2 धावांवर पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. सामना बॉल टू रन आल्यामुळे सीएसके दबावात आले होते. त्यातच होल्डरने रैनाला बाद केलेल्या षटकातच सेट झालेल्या फाफ ड्युप्लेसिसला 41 धावांवर बाद केले.

धोनीचा जुना फिनिशिंग टच

सामना बॉल टू रन आल्यानंतर धोनी आणि रायडू क्रिजवर होते. मात्र हैदराबादच्या गोलंदाजांची टिच्चून मारा करत धावा आणि चेंडूतील अंतर वाढवण्यास सुरुवात केली. अखेरची तीन षटके राहिली असताना रायडूने मोठे फटके मारण्यास सुरुवात केली. त्याने सामना 12 चेंडूत 16 धावा असा आणला.

19 वे षटक टाकण्यासाठी आलेल्या भुवनेश्वरला दुसऱ्याच चेंडूवर रायडूने षटकार मराला. त्याच षटकात धोनीनेही चौकार मारत सामना आवाक्यात आणला. मात्र हैदराबादच्या गोलंदाजांनी हार न मानता टिच्चून मारा करत सामना 3 चेंडूत 2 धावा असा अवघड केले होता. मात्र धोनीने आपल्या जुन्या स्टाईलमध्ये षटकार मारत सामना फिनिश केला. धोनीने 11 चेंडूत नाबाद 14 धावा केल्या. यात एक षटकार आणि एक चौकाराचा समावेश होता. तर रायडूने 13 चेंडूत 17 धावांची उपयुक्त खेळी केली.

हैदराबादकडून जेसन होल्डरने सर्वाधिक 27 धावा देत 3 विकेट घेतल्या.

तत्पूर्वी, आयपीएलमध्ये हैदराबाद सनरायझर्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज ( Hyderabad vs Chennai ) यांच्यातील सामन्यात चेन्नईने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. हैदराबादचा सलामीवीर वृद्धीमान साहाने आक्रमक सुरुवात केली. मात्र जेसन रॉयला हेजलवूडने 2 धावांवर बाद करत हैदराबादला पहिला धक्का दिला.

रॉय बाद झाल्यानंतर आलेल्या केन विल्यमसन आणि साहाने भागीदारी रचण्यास सुरुवात केली. या दोघांनी पॉवर प्लेपर्यंत हैदराबादला 41 धावांपर्यंत पोहचवले. मात्र यानंतर ब्राव्होने हैदराबादला हादरे देण्यास सुरुवात केली. त्याने विल्यमसनला 11 धावांवर माघारी धाडले.

युवा फलंदाजांकडून निराशा ( Hyderabad vs Chennai )

त्यानंतर आलेल्या प्रियम गर्गलाही फार काही करता आले नाही. तो ब्रोव्होला पूल मारण्याच्या नादात 7 धावात बाद झाला. दरम्यान, वृद्धीमान साहाने डाव सावरण्यास सुरुवात केली. तो आपल्या अर्धशतकाच्या जवळही पोहचला होता. मात्र रविंद्र जडेजाने त्याला 44 धावांवर बाद करत हैदराबादला मोठा धक्का दिला.

साहा बाद झाला  त्यावेळी हैदराबादच्या 13 षटकात 4 बाद 74 धावा झाल्या होत्या. आता सर्व मदार अभिषेक शर्मा आणि अब्दुल समाद या युवा फलंदाजांवर होती. मात्र या दोन्ही युवा फलंदाजांनी निराशा केली. या दोघांनाही हेजलवूडने प्रत्येकी 18 धावांवर बाद केले. पाठोपाठ शार्दुल ठाकूरने जेसन होल्डरलाही 5 धावांवर माघारी धाडले.

अखेर राशिद खानने 17 धावांची खेळी करत हैदराबादला 20 षटकात 7 बाद 134 धावांपर्यंत पोहचवले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news