दुबई ; पुढारी ऑनलाईन : आयपीएलच्या १४ व्या हंगामातील ४९ व्या सामन्यात कोलकात्याने हैदराबादवर (Kolkata vs Hyderabad) मात करत 'प्ले ऑफ' साठी आपली दावेदारी भक्कम केली आहे. हैदराबादने ठेवलेल्या ११६ धावांच्या आव्हानाचा धैर्याने पाठलाग करत कोलकात्याने ६ गडी राखत विजय नोंदवला. हैदराबादने मात्र या हंगामातील निराशाजन कामगिरी या सामन्यातही चालूच ठेवली. या सामन्यात त्यांच्या गोलंदाजांनी सामन्याच्या सुरुवातीला झटपट २ बळी घेऊन पुनरागमन करण्याची संधी निर्माण केली होती. मात्र सामन्याअंती त्यांच्या पदरी अखेर निराशाच हाती आली.
या विजयासाठी कोलकात्याने 'प्ले ऑफ' साठी भक्कम पाऊले टाकले आहे. गुणतालिकेत कोलकाता चौथ्या स्थानी स्थिर असून १३ सामन्यात ६ विजय प्राप्त करत १२ गुण मिळवले आहेत. शिवाय कोलकात्याचा रनरेट प्लस 0.294 आहे. रनरेट हा कोलकात्यासाठी जमेची बाजू ठरणार आहे. पुढील सामना जिंकून कोलकाता 'प्ले ऑफ' मध्ये जाण्याची दाट शक्यता आहे. पण यासाठी कोलकात्याला पुढील सामना जिंकणे अनिवार्य आहे. प्ले ऑफ साठी अद्याप मुंबईला संधी आहे. पण, मुंबईला देखिल पुढील त्याचे दोन्ही सामने जिंकावेच लागतील पण, रनरेटमध्ये सुधारणा करत तो कोलकात्याहून पुढे घेऊन जावे लागेल. या विजयाने कोलकाताने 'प्ले ऑफ' साठी भक्कम दावेदारी दिली. पण, मुंबईसाठी 'प्ले ऑफ' जर तर वरच अवलंबून आहे.
कोलकात्याने हैदराबादच्या (Kolkata vs Hyderabad) आव्हानाचा पाठलाग करताना संत सुरुवात केली होती. पाचव्या आणि सातव्या षटकात कोलकाताने व्यंकटेश अय्यरला ८ धावांवर आणि राहूल त्रिपाठीला ७ धावांवर त्वरीत गमावले. पण, सलामीवीर शुभमन गील याने दमदार फलंदाजी करत कोलकाताला विजयी पथावर नेले. या सामन्यात गीलने ५१ चेंडूत ५७ धावा करुन बाद झाला. या सामन्यात गीलने या हंगामातील आपले पहिले अर्धशतक झळकावले व कोलकात्याच्या विजयात मोलाची भूमिका बजावली. गील याला १७ व्या षटकात सिद्धार्थ कौल याने बाद केले. गीलने आपल्या अर्धशतकी खेळीत १० चौकार ठोकले.
अठराव्या षटकातील शेवटच्या चेंडूवर नितीश राणा ३३ चेंडूत २३ धावा करुन बाद झाला. पण तोपर्यंत गील आणि राणा यांनी सामना कोलकाताच्या बाजूने झुकवला होता. अखेर दिनेश कार्तिक याने १२ चेंडूत १८ धावांची खेळी करत शेवटी चौकार ठोकत कोलकाताच्या विजयावर शिक्का मोर्तब केला. कर्णधार इयॉन मॉर्गन याने २ चेंडूत २ धावा केल्या.
कमी धावसंख्येचा बचाव करताना हैदराबादच्या गोलंदाजांनी टिच्चून गोलंदाजी केली. हैदराबादच्या माऱ्यापुढे कोलकाताची वाटचाल मंदगतीने सुरु होती. हैदराबादने पाचव्या आणि सातव्या षटकात बळी घेऊन कोलकात्याला जोरदार धक्के दिले होते. हैदराबादच्या गोलंदाजांचा शुभमन गील आणि नितीश राणा यांनी धैर्याने सामना केला. पण, हैदराबादच्या गोलंदाजांनी शेवटच्या षटकापर्यंत कोलकाताच्या फलंदाजांना झुंजायला भाग पाडले. हैदराबाद कडून जेसन होल्डर याने २ बळी घेतले तर राशिद खान आणि सिद्धार्थ कौल याने प्रत्येकी १ बळी मिळवला.
हा सामना देखिल गमावून हैदराबादने आपली निराशाजनक कामगिरी चालूच ठेवली. हैदराबाद गुण तालिकेत सर्वात शेवटी असून ती या आयपीएल मधून बाहेर पडणारी पहिली टिम ठरली आहे. संपूर्ण संघानेच आत्मविश्वास गमावल्याने पुढील हंगामासाठी हैदराबादला खूप तयारी करण्याची आवश्यकता आहे. डेव्हीड वॉर्नर, केन विल्यमसनसह अन्य स्टार खेळाडूंना लय सापडणे आवश्यक आहे.
तत्पुर्वी, कोलकाता नाईट रायर्डसच्या (Kolkata vs Hyderabad) टिच्चून गोलंदाजी केल्याने सनरायझर्स हैदराबाद संघाने 116 धावांचे माफक आव्हान त्यांच्यासमोर ठेवले. आयपीएलमधील आव्हान संपुष्टात आलेल्या हैदराबाद संघाने नाणेफेक जिंकून पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.
मात्र, कोलकाताच्या गोलंदाजासमोर हैदराबादचा संघ (Kolkata vs Hyderabad) कोलमडला. वृद्धिमान साहाच्या रूपाने हैदराबादला पहिला धक्का बसला. त्यानंतर जेसन रॉय 10 धावा करून परतला. केन विल्यम्सनचा जम बसला आहे, असे वाटत असताना तो धावचित झाला. त्याने 21 चेंडूंत 26 धावा केल्या. त्याने आपल्या खेळीत चार चौकार लगावले.
11 व्या षटकांत हैदराबादची 4 बाद 53 अशी दयनीय अवस्था झाली होती. ठरावीक अंतराने हैदराबादचे (Kolkata vs Hyderabad) फलंदाज माघारी परतू लागल्याने संघाची धावसंख्याही मंदावली. प्रियम गर्ग 21 धावांची खेळी करून बाद झाला. अब्दुल समदने 25 धावा केल्या.अखेर रडतखडत हैदराबादने 20 षटकांत 8 गड्यांच्या मोबदल्यात 115 धावा केल्या.