IND vs AUS : कांगारूंसाठी भारताचा खास प्लॅन

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यातील चार कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या सामन्यास 9 फेब्रुवारीपासून सुरुवात होत आहे. हा सामना नागपूरच्या विदर्भ क्रिकेट असोसिएशनच्या मैदानावर खेळविला जाणार आहे.
दरम्यान, कांगारूंना पुन्हा एकदा पराभवाचा धक्का देण्यासाठी रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाने चांगलाच घाम गाळण्यास सुरुवात केली आहे. प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी सराव शिबिराशी संबंधित काही गोष्टी उघड केल्या आहेत. याचा व्हिडीओ बीसीसीआयच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. यामध्ये राहुल द्रविडने सांगितले की, येथील खेळपट्टी अत्यंत चांगली आहे. सध्या आम्ही क्षेत्ररक्षणावर काम करत आहोत. यामध्ये झेल पकडण्यास प्राधान्य देत आहोत. विशेषकरून स्लीप कॅचिंगवर भर देत आहोत.
द्रविडने पुढे सांगितले की, कोेचिंग स्टाफसाठी हा एक रोमांचक अनुभव होता. तसे पाहिल्यास सरावादरम्यान अशा गोष्टींसाठी जास्त वेळ मिळत नाही. तरीही याची सुरुवात अत्यंत चांगल्या पद्धतीने झाली असून आम्ही पूर्ण परिश्रमपूर्वक यशस्वीपणे ते संपवणारही आहोत.
भारताचे लक्ष्य वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलचे (IND vs AUS)
2017 नंतर प्रथमच ऑस्ट्रेलियन संघ कसोटी मालिका खेळण्यासाठी भारतात आला आहे. यापूर्वी 2004-05 मध्ये ऑस्ट्रेलियाने भारताला पराभूत केेले होते. त्यानंतर मायदेशी झालेल्या सर्व कसोटी मालिकांमध्ये भारतानेच बाजी मारली होती. मात्र, यावेळी विजय मिळविण्याचा प्रयत्न पॅट कमिन्सच्या नेतृत्वाखालील ऑस्ट्रेलियन करणार आहे. याउलट रोहित ब्रिगेडची नजर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलवर आहे. ही फायनल खेळावयाची असल्यास टीम इंडियाला कोणत्याही परिस्थितीत ऑस्ट्रेलियाला पराभूत करावेच लागणार आहे.