Khelo India Games : संयुक्ता काळेचा सुवर्ण ‘चौकार’

जबलपूर, प्रतिनिधी : गतसत्रातील पाच सुवर्णपदक विजेत्या आंतरराष्ट्रीय खेळाडू संयुक्ता काळेने रविवारी मध्य प्रदेशमध्ये सुरू असलेल्या खेलो इंडिया युथ गेम्समध्ये सुवर्णपदकांचा चौकार मारला. जिम्नॅस्टिकमध्ये आपले वर्चस्व कायम ठेवत तिने यंदा चार सुवर्णपदकांचा बहुमान पटकावला. र्हिदमिकमध्ये संयुक्ता हिने आज रिबन, हूप, क्लब व चेंडू प्रकारात सोनेरी यश संपादन केले. काल तिला एक रौप्यपदकही मिळाले होते. किमया कार्ले हिने तीन कांस्यपदकांची कमाई केली. संयुक्ता हिने गतवेळी झालेल्या खेलो इंडिया स्पर्धेत पाच सुवर्णपदके जिंकली होती.
महाराष्ट्राची सुवर्ण कन्या असलेल्या संयुक्ता काळे हिने नोंदवलेल्या सुवर्णपदकाच्या चौकारासह महाराष्ट्राने जिम्नॅस्टिक्समध्ये निर्विवाद वर्चस्व गाजविले. त्यांनी सात सुवर्ण, पाच रौप्य व सहा कांस्य अशी एकूण अठरा पदकांची कमाई केली. या स्पर्धेतील कलात्मक प्रकारात आर्यन दवंडे याने एक सुवर्ण, एक रौप्य व दोन कांस्य पदके जिंकली तर सार्थक राऊळ व मान कोठारी यांनी प्रत्येकी एक रौप्यपदक जिंकले. मुलींमध्ये सारा राऊळ व उर्वी वाघ यांनी प्रत्येकी एक सुवर्ण तर रिया केळकर हिने एक रौप्यपदक पटकाविले. शताक्षी कुमारी हिला एक कांस्यपदक मिळाले.
संयुक्तामुळे महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा : आयुक्त दिवसे
आंतरराष्ट्रीय खेळाडू संयुक्ता काळेमुळे राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. सोनेरी यशाची कामगिरी कायम ठेवत तिने महाराष्ट्राला चार सुवर्णपदके मिळवून दिली. निश्चितपणे ही खेळाडू आंतरराष्ट्रीय स्तरावर महाराष्ट्राचे नावलौकिकास साजेशी चमकदार कामगिरी करत आहे. त्यामुळे ती निश्चितपणे आगामी काळात ऑलिम्पिक स्पर्धेत महाराष्ट्राकडून खेळताना दिसणार आहे, असा विश्वास क्रीडा आयुक्त सुहास दिवसे यांनी व्यक्त केला.
ऑलिम्पिक स्पर्धेत सहभागी होण्याची दावेदार : कोच सुर्वे
आंतरराष्ट्रीय खेळाडू संयुक्तामध्ये प्रचंड गुणवत्ता आहे. त्यामुळेच सध्या ती राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सोनेरी यशाचा पल्ला गाठत आहे. आगामी काळात निश्चितपणे ती ऑलिम्पिक स्पर्धेत देशाचे प्रतिनिधित्व करताना दिसणार आहे. ऑलिम्पिकचे तिकीट मिळवण्याची क्षमता तिच्यामध्ये आहे. त्यामुळे तिला या जागतिक दर्जाच्या स्पर्धेसाठी दावेदार मानले जात आहे, अशा शब्दांत मुख्य प्रशिक्षक पूजा सुर्वे आणि मानसी सुर्वे यांनी चॅम्पियन संयुक्तावर कौतुकांचा वर्षाव केला.
महाराष्ट्राला आघाडी मिळवून दिली : पथकप्रमुख कांबळे
जिम्नॅस्टिकमध्ये नेत्रदीपक कामगिरी करत युवा खेळाडू संयुक्ताने चार सुवर्णपदके जिंकले. त्यामुळे महाराष्ट्र संघाला पुन्हा एकदा पदकतालिकेमध्ये मोठी आघाडी घेता आली आहे. याच सोनेरी यशामुळे महाराष्ट्र संघाने पुन्हा पदकतालिकेत अव्वल स्थान गाठले. या युवा खेळाडूची या स्पर्धेतील ही कामगिरी लक्षवेधी ठरलेली आहे, अशा शब्दांत सहसंचालक चंद्रकांत कांबळे यांनी पदक विजेत्या संयुक्ताचे कौतुक केले.
पदकतालिकेत महाराष्ट्र पुन्हा अव्वल
भोपाळ : संयुक्ता काळेच्या सुवर्ण चौकारामुळे महाराष्ट्राने खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेत पुन्हा एकदा पदकतालिकेत आघाडी घेतली. महाराष्ट्राची आता 26 सुवर्ण, 29 रौप्य आणि 24 ब्राँझ अशी 79 पदके झाली आहेत. हरियाणा 22, 16, 15 अशा एकूण 53 पदकांसह दुसर्या स्थानावर आहेत. मध्य प्रदेश 21, 13, 19 अशा एकूण 53 पदकांसह तिसर्या स्थानी आहे. महाराष्ट्राला आता सोमवारपासून सुरू होणार्या वेटलिफ्टिंग प्रकारातून चांगल्या यशाची अपेक्षा आहे. त्याचवेळी कुस्तीतही महाराष्ट्र यश मिळवेल, अशी आशा आहे. मात्र, या दोन्हीत महाराष्ट्राला हरियाणाच्या आव्हानाचा सामना करावा लागणार आहे. या दोन खेळाबरोबरच जलतरणातील पदकावर आता पदकतालिकेतील क्रमवारी अवलंबून राहणार आहे.