Khelo India Games : रिले शर्यतीत कोल्हापुरच्या रिया पाटीलने मारली बाजी

भोपाळ, वृत्तसंस्था : मुलींच्या रिले शर्यतीत मिळविलेल्या सुवर्णपदकासह महाराष्ट्राने खेलो इंडियामधील (Khelo India Games) मैदानी स्पर्धांमध्ये पाच पदकांची कमाई केली. या सुवर्णपदकांखेरीज महाराष्ट्राला सृष्टी रेडेकर व सार्थक शेलार यांनी रौप्यपदक, तर संदीप गोंड याने कांस्यपदक मिळवून दिले. मुलांच्या रिले शर्यतीत महाराष्ट्राला रौप्यपदक मिळाले.
मुलींच्या 4 बाय 100 मीटर्स रिले शर्यतीत रिया पाटील, इशिका इंगळे, गौरवी नाईक व ईशा रामटेके या खेळाडूंनी उत्कृष्ट धाव घेत आणि संयम ठेवीत महाराष्ट्राला सुवर्णपदक मिळवून दिले. त्यांनी 49.07 सेकंद वेळ नोंदविली. मुलांच्या 4 बाय 100 मीटर रिले शर्यतीत मात्र महाराष्ट्राचे सुवर्णपदक हुकले. महाराष्ट्राने हे अंतर 42.41 सेकंदांत पार करीत रौप्यपदक पटकाविले. महाराष्ट्र संघात महेश जाधव, संदीप गोंड, ऋषिप्रसाद देसाई व सार्थक शेलार यांचा समावेश होता. मुलींच्या तीन हजार मीटर्स धावण्याच्या शर्यतीत महाराष्ट्राच्या सृष्टी रेडेकर हिने रुपेरी कामगिरी केली. तिला ही शर्यत पार करण्यासाठी 10 मिनिटे 08.08 सेकंद वेळ लागला. ती कोल्हापूरची असून, तिला अभिजित म्हसकर यांचे मार्गदर्शन लाभले आहे. (Khelo India Games)
मुलांच्या 110 मीटर्स अडथळा शर्यतीत महाराष्ट्राच्या सार्थक शेलार व संदीप गोंड यांनी अनुक्रमे रौप्य व कांस्यपदक मिळविले. कोल्हापूरचा खेळाडू सार्थक याला हे अंतर पार करण्यास 13.82 सेकंद वेळ लागला. तो सुभाष पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करीत आहे. क्रीडा प्रबोधिनीतील खेळाडू संदीप गोंड याने हे अंतर 13.95 सेकंदांत पार केले.