WPL : ‘महिला आयपीएल’ला ४ मार्चपासून होणार सुरूवात | पुढारी

WPL : 'महिला आयपीएल'ला ४ मार्चपासून होणार सुरूवात

पुढारी ऑनलाईन डेस्क : महिला प्रिमियर लीगला ४ मार्च पासून सुरुवात होणार आहे. या लीगमधील पहिला सामना मुंबई आणि अहमदाबादच्या संघांमध्ये खेळवला जाईल. महिला प्रिमियर लीगचा पहिला हंगाम २३ दिवसांचा असणार आहे. पहिला सामना ४ मार्चला तर अंतिम सामना २६ मार्चला खेळवण्यात येणार आहे. बीसीसीआयने महिला आयपीएलच्या शेड्युलबाबत संपूर्ण माहिती दिलेली नाही. मात्र, सूत्रांच्या माहितीनुसार, बीसीसीआयने महिला प्रिमियर लीगच्या ओपनिंगचे जोरदार आयोजन केले आहे. (WPL)

महिला आयपीएलमधील पहिल्या सामन्यात मुंबई आणि अहमदाबाद हे संघ आमने-सामने असणार आहेत. मुंबईच्या संघाची मालकी मुकेश अंबानी यांच्याकडे आहे. तर अहमदाबादच्या संघाची मालकी गौतम अदाणी यांच्याकडे आहे. या सामन्यात एक प्रकारे भारतातील दोन मोठे उद्योगपतीच आमने-सामने असणार आहेत. (WPL)

मुंबईच्या डी.वाय.पाटील स्टेडियमवर रंगणार पहिला सामना

महिला प्रिमियर लीगमधील पहिला सामना मुंबईच्या डी.वाय.पाटील स्टेडियमवर खेळवला जाण्यासाठी बीसीआयकडून प्रयत्न सुरू आहेत. ही लीग मुंबईच्या सीसीआय आणि डि.वाय.पाटील स्टेडियमवर आयोजित केली जाऊ शकते. वानखेडे स्टेडियमवर महिला आयपीएलचे सामने खेळवण्यात येणार नाहीत. कारण भारतीय पुरुष संघ याच काळात ऑस्ट्रेलियाविरुद्धचा एकदिवसीय सामना वानखेडे स्टेडियमवर खेळणार आहे. यानंतर एप्रिल महिन्यात आयपीएलचे सामनेही वानखेडे स्टेडियमवर खेळवले जातील. आयपीएलच्या पूर्वी मुंबई इंडियन्सचा संघही याच मैदानावर सराव करेल. (WPL)

उपांत्य फेरीमध्ये एकच सामना खेळवला जाईल (WPL)

सूत्रांच्या माहितीनुसार, पाच किंवा तीन संघ प्लेऑफमध्ये पोहोचतील. गुणतालिकेत पहिल्या क्रमांकावर असणारा संघ अंतिम सामन्यात धडक मारेल. तर दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानी असणा-या संघांमध्ये सेमी फायनल सामना खेळवला जाईल. गुणतालिकेत चौथ्या आणि पाचव्या स्थानी असणारे संघ लीग स्टेजमध्येच बाहेर पडतील. महिला आयपीएलमध्ये एकूण २२ सामने खेळवले जातील. १७ मार्च, १९ मार्च, २२ मार्च, २३ मार्च आणि २५ मार्चला लीगमधील सामने खेळवण्यात येणार नाहीत. (WPL) २१ मार्चला महिला आयपीएलची लीग स्टेज समाप्त होईल. यानंतर २४ मार्चला सेमी फायनल सामना खेळवला जाईल. तर २६ मार्चला महिला आयपीएलचा अंतिम सामना रंगणार आहे.

हेही वाचंलत का?

Back to top button