Joginder Sharma Retirement : भारताला टी २० विश्वचषक जिंकवून देणाऱ्या ‘या’ दिग्गज गोलंदाजाची क्रिकेटमधून निवृत्ती | पुढारी

Joginder Sharma Retirement : भारताला टी २० विश्वचषक जिंकवून देणाऱ्या 'या' दिग्गज गोलंदाजाची क्रिकेटमधून निवृत्ती

पुढारी ऑनलाईन डेस्क : भारताला २००७ चा टी २० विश्वचषक जिंकवून देणारा वेगवान गोलंदाज जोगिंदर शर्मा याने क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. त्याने शुक्रवारी (दि.२) ट्वीट करून क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमधून निवृत्ती घेत असल्याची माहिती दिली. ३९ वर्षीय जोगिंदर शर्मा अनेक वर्षांपासून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये खेळला नव्हता. त्याने २००७ मध्ये शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता. दरम्यान, जोगिंदरने बीसीसीआयचे सचिव जय शहा यांना पत्र लिहित निवृत्तीची घोषणा केली.

जोगिंदर शर्माने २००४ मध्ये वनडे क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. मात्र, २००७ च्या टी२० विश्वचषकात त्याने एक वेगळी ओळख निर्माण केली. जोगिंदरने २३ डिसेंबर २००४ ला बांगलादेशच्या विरोधात वनडे क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. तर वनडे क्रिकेटमधील शेवटचा सामना त्याने २००७ मध्ये वेस्टइंडिज विरुद्ध खेळला होता.(Joginder Sharma Retirement)

२००७ च्या टी २० विश्वचषकातील ‘हिरो’

२००७ टी २० विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात जोगिंदर शर्माने घातक गोलंदाजी केली होती. पाकिस्तानला विजयासाठी शेवटच्या षटकामध्ये १३ धावांची गरज होती. या वेळी महेंद्रसिंग धोनीने गोलंदाजी करण्याची जबाबदारी जोगिंदर शर्मावर सोपवली. जोगिंदरनेही ही जबाबदारी यशस्वीरित्या पार पाडली. त्याने केवळ ७ धावा दिल्या आणि भारताने ५ धावांनी हा सामना आपल्या नावावर केला होता. शेवटच्या षटकात जोगिंदरला गोलंदाजी देण्याचा धोनीचा निर्णय भारताला विश्वचषक जिंकवून देणारा ठरला होता. (Joginder Sharma Retirement) जोगिंदरने १९ सप्टेंबर २००७ ला टी२० क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. त्याने पहिला सामना इंग्लंडविरोधात किंग्समीडच्या मैदानावर खेळला होता. तर टी २० क्रिकेटमधील शेवटचा सामना त्याने २४ सप्टेंबर २००७ ला पाकिस्तानविरोधात खेळला होता.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये छोटी कारकीर्द (Joginder Sharma Retirement)

जोगिंदर शर्माची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील कारकीर्द अतिशय छोटी राहिली आहे. त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ४ एकदिवसीय सामने तर ४ टी २० सामने खेळले आहेत. २८ धावा देत १ विकेट ही जोगिंदरची वनडे क्रिकेटमधील सर्वोत्तम कामगिरी आहे. २००७ च्या टी२० विश्वचषकात त्याने २० धावा देत २ विकेट पटकावल्या होत्या. ही त्याची टी २० क्रिकेटमधील सर्वोत्तम कामगिरी होती. जोगिंदरने आयपीएलमध्ये १६ सामने खेळत १२ विकेट्स पटकावल्या आहेत. आयपीएलमध्ये तो चेन्नई सुपर किंग्ज आणि गुजरात जायंट्स कडून खेळला होता. (Joginder Sharma Retirement)

हेही वाचंलत का?

Back to top button