सूर्यकुमारने घेतली मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची भेट

पुढारी ऑनलाईन डेस्क : भारत आणि न्यूझीलंड यांच्या लखनौ येथे झालेल्या दुसऱ्या T20 सामन्यात फिरकीपटूंची जादू क्रिकेटप्रेमींनी अनुभवली. या सामन्यात भारताने न्यूझीलंडचा ६ गडी राखून पराभव केला. मात्र हा विजय मिळवण्यासाठी भारतीय फलंदाजांची मेहनत घ्यावी लागली. अखेरच्या षटकातील पाचव्या चेंडूवर भारताने १०० धावांचे लक्ष्य पार केले. या सामन्यात सूर्यकुमार यादव याच्या ३१ चेंडूत २६ धावांच्या खेळी टीम इंडियासाठी महत्त्वपूर्ण ठरली. या विजयानंतर आज ( दि. ३० ) टीम इंडियाचा स्टार फलंदाज सूर्यकुमार यादव याने आज उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची सदिच्छा भेट घेतली. या भेटीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
सूर्यकुमार यादव याने आज उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची त्यांच्या सरकारी निवासस्थानी भेट घेतली. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या भेटीचे फोटो ट्विटरवर शेअर केले आहेत. फोटो शेअर करताना मुख्यमंत्र्यांनी लिहिलं आहे की, “लखनौच्या शासकीय निवासस्थानी तरुण आणि उत्साही स्काय ( मिस्टर ३६०) सोबत.”
रविवारी झालेल्या सामन्यापूर्वी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दोन्ही देशांच्या कर्णधारांचीही भेट घेतली होती. रविवारी झालेल्या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंडने २० षटकांमध्ये ९९ धावा केल्या. भारताच्या गोलंदाजीत अर्शदीप सिंगने दोन तर हार्दिक पंड्या, वॉशिंग्टन सुंदर, चहल, दीपक हुडा आणि कुलदीप यादव यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली. सूर्यकुमार यादवने ३१ चेंडूत २६ धावा केल्या. विशेष म्हणजे त्याच्या या खेळीत केवळ एका चौकाराचा समावेश होता. भारताने १९.५ षटकांमध्ये १०० धावांचे लक्ष्य साध्य करत मालिकेत बरोबरी साधली आहे.
Cricketer Suryakumar Yadav paid a courtesy call to Uttar Pradesh CM Yogi Adityanath at the CM’s official residence in Lucknow. pic.twitter.com/uAIxOhVhVP
— ANI UP/Uttarakhand (@ANINewsUP) January 30, 2023
With young and energetic SKY (Mr. 360°) at official residence, Lucknow.@surya_14kumar pic.twitter.com/hHGB2byHcu
— Yogi Adityanath (@myogiadityanath) January 30, 2023