जर्मनी जगज्जेता; बेल्जियमला हरवून हॉकी विश्वचषकावर कब्जा | पुढारी

जर्मनी जगज्जेता; बेल्जियमला हरवून हॉकी विश्वचषकावर कब्जा

भुवनेश्वर; वृत्तसंस्था : हॉकी विश्वचषक 2023 च्या अंतिम सामन्यात जर्मनीने पेनल्टी शूटआऊटमध्ये बेल्जियमचा 5-4 असा पराभव केला. भुवनेश्वरमध्ये खेळल्या गेलेल्या सामन्यात चमकदार कामगिरी करत जर्मनीने तिसरे विश्वविजेतेपद मिळवले. हा सामना अतिशय रोमांचक झाला. पूर्णवेळपर्यंत दोन्ही संघांनी 3-3 अशी बरोबरी साधली होती. यानंतर पेनल्टी शूटआऊटमध्ये जर्मनीचा 5-4 असा विजय झाला. दुसरीकडे वर्गीकरण सामन्यात भारताने चांगली कामगिरी करत नवव्या स्थानावर स्पर्धा संपवली.

अंतिम सामन्यात बेल्जियमच्या फ्लोरेंट ऑबेलने 10 व्या मिनिटाला पहिला गोल करून स्पर्धेला सुरुवात केली. तर टँग्यु कोसिन्सने काही सेकंदांत बेल्जियमची आघाडी दुप्पट केली. हाफ टाईमच्या हूटरपूर्वी जर्मनीच्या निकलास वेलेनने शानदार गोल करत आघाडी कमी केली. त्यानंतर तिसर्‍या क्वार्टरमध्ये गोन्झालो पेइलाटने पेनल्टी कॉर्नरचे यशस्वीपणे गोल करून जर्मनीला बरोबरी साधून दिली. अंतिम क्वार्टरमध्ये जर्मनीने स्पर्धेत प्रथमच आघाडी घेतली. कर्णधार मॅट ग्रॅम्बुशने डावीकडून बेल्जियमच्या गोलकिपरला चकवले. मात्र, बेल्जियमचा खेळाडू टॉम बूनच्या गोलने गुणसंख्या बरोबरीत आणली. यानंतर पेनल्टी शूटआऊट झाला, ज्यामध्ये जर्मनीने 5 गोल केले, तर बेल्जियम 4 गोल करू शकला.

Back to top button