भारताविरुद्धच्या मालिकेला मुकणे आयुष्यभर त्रास देईल : ग्लेन मॅक्सवेल | पुढारी

भारताविरुद्धच्या मालिकेला मुकणे आयुष्यभर त्रास देईल : ग्लेन मॅक्सवेल

सिडनी, वृत्तसंस्था : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात 9 फेब्रुवारीपासून 4 सामन्यांची बॉर्डर-गावसकर कसोटी मालिका सुरू होत आहे. या मालिकेत ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू ग्लेन मॅक्सवेल दुखापतीमुळे खेळणार नाही. भारताविरुद्धच्या या महत्त्वाच्या कसोटी मालिकेचा भाग नसल्यामुळे ग्लेन मॅक्सवेलने मोठे वक्तव्य केले आहे. तो म्हणाला की, आगामी भारत दौर्‍यात न खेळणे मला आयुष्यभर त्रास देईल. ‘बिग बॅश लीग’च्या सामन्यादरम्यान ‘फॉक्स क्रिकेट’वर कॉमेंट्री करताना मॅक्सवेलने हे वक्तव्य केले आहे.

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात 9 फेब्रुवारीपासून 4 सामन्यांची बॉर्डर-गावसकर कसोटी मालिका सुरू होत आहे. यासाठी भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही देशांनी आपले संघ जाहीर केले आहेत. दोन्ही देशांनी पहिल्या दोन सामन्यांसाठी आपल्या संघांची घोषणा केली आहे. ऑस्ट्रेलियाचा स्टार खेळाडू ग्लेन मॅक्सवेल भारत दौर्‍यावर येणार नाही. कारण त्याला दुखापतीमुळे ऑस्ट्रेलिया संघात स्थान मिळालेले नाही.

ग्लेन मॅक्सवेल म्हणाला, माझ्या सहकार्‍यांना विशेषतः भारतात खेळताना पाहण्याची संधी मिळणे चांगले आहे. मला वाटते की त्यांना (ऑस्ट्रेलिया) भारत दौर्‍यासाठी सर्वोत्तम संघ सापडला आहे. मॅक्सवेलने आपल्या कारकिर्दीत फक्त सात कसोटी सामने खेळले आहेत, त्यापैकी 4 भारताविरुद्ध खेळले आहेत. 2013 आणि 2017 मध्ये भारतीय भूमीवर खेळलेल्या कसोटी मालिकेत तो कांगारू संघाचा भाग होता.

मॅक्सवेलला गेल्या वर्षी झाली होती दुखापत

ग्लेन मॅक्सवेल दुखापतीशी झगडत आहे. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये मित्राच्या वाढदिवसाच्या पार्टीत त्याच्या डाव्या पायाला गंभीर दुखापत झाली होती. या घटनेमुळे मॅक्सवेलला काही महिने क्रिकेटपासून दूर ठेवले आहे. सध्या तो रिकव्हरी करत आहे.

Back to top button