IND vs NZ T20 : सूर्याच्या निशाण्यावर शिखर धवनचा विक्रम!

पुढारी ऑनलाईन डेस्क : IND vs NZ T20 : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेतील दुसरा सामना आज लखनऊमध्ये खेळवला जाणार आहे. पहिल्या टी-20 सामन्यात पराभव पत्करल्यानंतर टीम इंडियाला या सामन्यात मालिका बरोबरीत आणायची आहे. मालिकेत टिकण्यासाठी भारताला हा सामना कोणत्याही परिस्थितीत जिंकावाच लागेल. या सामन्यात विजयासाठी सूर्यकुमार यादवची फलंदाजी खूप महत्त्वाची आहे. सूर्यकुमार यादवने पहिल्या टी-20 सामन्यात 47 धावांची खेळी केली. यादरम्यान त्याने भारताचे माजी खेळाडू एमएस धोनी आणि सुरेश रैना यांना मागे टाकले होते. आता दुसऱ्या टी-20 मध्ये सूर्याच्या निशाण्यावर शिखर धवनचा एक विक्रम आहे. हा विक्रम मोडण्यासाठी त्याला दमदार खेळी करावी लागेल.
रेकॉर्ड काय आहे?
सूर्यकुमार यादवने 44 टी-20 डावांमध्ये 178.76 च्या स्ट्राइक रेटने 1625 धावा केल्या आहेत. सूर्या हा टी-20 क्रिकेटमधील सर्वोत्तम खेळाडू असून त्याच्या खात्यात एकूण 13 अर्धशतके आणि तीन शतके आहेत. टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या भारतीय खेळाडूंच्या यादीत तो पाचव्या स्थानावर आहे. गेल्या सामन्यातच त्याने धोनी आणि रैनाला मागे टाकत हे स्थान मिळवले. आजच्या सामन्यात तो या यादीत चौथ्या क्रमांकावर येऊ शकतो. यावेळी सूर्याला स्फोटक खेळी करण्याची गरज आहे. जर त्याने न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात 135 धावा केल्या तर तो या यादीत चौथ्या क्रमांकावर येईल. शिखर धवन सध्या या यादीत चौथ्या स्थानावर आहे. त्याने एकूण 1759 धावा केल्या आहेत.
भारतासाठी करो या मरो सामना
भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दुसऱ्या टी-20 सामन्यात टीम इंडियासाठी करो या मरो अशी परिस्थिती आहे. मालिकेत बरोबरी साधण्यासाठी भारताला हा सामना जिंकावाच लागेल. हार्दिकच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने एकही मालिका गमावलेली नाही, त्यामुळे त्याच्यासमोर हा विक्रम कायम राखण्याचे आव्हान आहे. टी-20 मध्ये टॉप ऑर्डर सतत अपयशी ठरत असून भारताला हा सामना जिंकायचा असेल तर संघाने आपल्या फलंदाजीबाबत विचार करणे आवश्यक आहे.
आंतरराष्ट्रीय टी-20 मध्ये भारतासाठी सर्वाधिक धावा करणारा खेळाडू
विराट कोहली – 4008
रोहित शर्मा – 3853
केएल राहुल – 2265
शिखर धवन – 1759
सूर्यकुमार यादव – 1625