Cricket : हार्दिकने पराभवाचे खापर फोडले अर्शदीप सिंग याच्या डोक्यावर | पुढारी

Cricket : हार्दिकने पराभवाचे खापर फोडले अर्शदीप सिंग याच्या डोक्यावर

रांची, वृत्तसंस्था : महेंद्रसिंग धोनीचे शहर रांचीमध्ये झालेल्या मालिकेतील पहिल्या टी-20 सामन्यात भारताचा 21 धावांनी पराभव झाला. या पराभवाचे खापर कर्णधार हार्दिक पंड्याने अर्शदीप सिंग याच्या डोक्यावर अप्रत्यक्ष फोडले आहे. अर्शदीपने शेवटच्या षटकांत दिलेल्या 27 धावा महागात पडल्या, असा त्याचा म्हणण्याचा रोख होता. पहिल्या टी-20 सामन्यात प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंडने 176 धावा केल्या होत्या. उत्तरादाखल टीम इंडियाला 155 धावा करता आल्या. या विजयामुळे न्यूझीलंडने मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे.

खराब गोलंदाजी आणि आघाडीच्या फलंदाजांचे अपयश हे भारताच्या पराभवाचे कारण ठरले. सामना झाल्यानंतर कर्णधार हार्दिक पंड्याने याबद्दल त्याचे मत स्पष्टपणे सांगितले. मला अंदाज नव्हता की या पिचवर चेंडू इतका टर्न होईल. आम्ही कोणीच विचार केला नाही की अशी विकेट असेल. पिच पाहून दोन्ही संघांना आश्चर्य वाटले. न्यूझीलंडचा संघ आज छान खेळला. नवा चेंडू जुन्या चेंडूपेक्षा अधिक वळत होता. ज्यापद्धतीने चेंडू वळत होता आणि उसळी घेत होता. त्याने हैराण झालो. मी आणि सूर्यकुमार फलंदाजी करत होतो तेव्हा वाटले की आम्ही विजयाचे लक्ष्य गाठू. अखेरच्या षटकात आम्ही 25 हून अधिक धावा दिल्या. हा एक युवा खेळाडूंचा संघ आहे आणि अशा गोष्टीतून आम्ही शिकू.

भारतीय गोलंदाजीत 20 व्या षटकात अर्शदीप सिंगने 27 धावा दिल्या. 19 षटकापर्यंत न्यूझीलंडने 149 धावा केल्या होत्या. त्यानंतर अर्शदीपने 27 धावा दिल्या आणि न्यूझीलंडला 176 पर्यंत मजल मारता आली. विशेष म्हणजे त्याआधीच्या दोन षटकांत म्हणजे 18 व्या आणि 19 व्या षटकात भारताने प्रत्येकी 2 आणि 8 धावा दिल्या होत्या. 20 व्या षटकातील खराब गोलंदाजी भारताला महागात पडली आणि कर्णधार पंड्याने देखील याच गोष्टीकडे लक्ष वेधले. 20 वे षटक हे भारतीय गोलंदाजीच्या डावातील सर्वात महाग षटक ठरले.

भारतात टी-20 क्रिकेटमध्ये 200 पेक्षा कमी धावांचे टार्गेट असताना भारताचा न्यूझीलंडकडून झालेला हा चौथा पराभव आहे. दोन्ही संघांतील मालिकेतील दुसरी लढत रविवारी (दि. 29) लखनौ येथे होणार आहे.

अर्शदीपमुळे विझला विजयाचा ‘दीप’

अखेरच्या षटकात खराब गोलंदाजी करण्याची अर्शदीपची ही पहिली वेळ नाही. याआधी त्याने अशी खराब गोलंदाजी केली आहे. विशेष म्हणजे 18 व्या षटकात त्याने फक्त 2 धावा दिल्या होत्या आणि त्याच ओव्हरमध्ये 2 विकेटस्देखील पडल्या होत्या. तेव्हा असे वाटत होते की न्यूझीलंडचा संघ फक्त 160 धावांपर्यंत पोहोचेल, पण अखेरच्या ओव्हरमध्ये अर्शदीपची जोरदार धुलाई झाली.

काय घडले शेवटच्या षटकात

अर्शदीपने शेवटच्या षटकांत 27 धावा दिल्या. त्याने पहिलाच चेंडू नो बॉल टाकला आणि डॅरेल मिशेलने षटकार मारला. त्यानंतरच्या 3 चेंडूंवर त्याने 2 षटकार आणि 1 चौकार मारत 23 धावा काढल्या. तर अखेरच्या 3 चेंडूंत 4 धावा दिल्या.

रैनाला टाकले मागे

या खराब ओव्हरनंतर अर्शदीप सिंग याने एक नकोसा विक्रम स्वत:च्या नावावर केला. आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटमध्ये 20 व्या षटकात सर्वात जास्त धावा देणारा भारतीय गोलंदाज ठरला आहे. याआधी हा नकोसा विक्रम सुरेश रैनाच्या नावावर होता. त्याने 20 व्या षटकात 26 धावा दिल्या होत्या. अर्शदीपने श्रीलंकेविरुद्ध झालेल्या पुण्यातील सामन्यात दोन ओव्हरमध्ये 5 नो बॉल टाकले होते.

अर्शदीपची फलंदाजीतही चूक

भारताचे आघाडीचे फलंदाज झटपट बाद झाले. त्यानंतर सूर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या आणि वॉशिंग्टन सुंदर यांनी संघाला पुन्हा एकदा सामना झुकवला. अखेरच्या 18 चेंडूंत भारताला 50 धावांची गरज होती आणि सुंदर चांगली फटकेबाजी करत होता. अशात 18 व्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर कुलदीप बाद झाला आणि त्याच्या जागी अर्शदीप फलंदाजीला आला. त्याचे काम इतक होते की एक धाव घेऊन सुंदरला स्ट्राईक द्यायचा, पण त्याला लॉकी फर्ग्युसनच्या 5 चेंडूंवर एकही धाव घेता आली नाही. 18 वे षटक निर्धाव गेले. टीम इंडियाला 12 चेंडूंत 50 धावा हव्या होत्या. तेव्हा सुंदरने 29 धावा केल्या. जर सुंदरला 18 व्या षटकात स्ट्राईक मिळाला असता तर सामन्याचा निकाल वेगळा लागला असता.

Back to top button